
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
लग्नाचे आमिष दाखवून २२ वर्षीय तरुणीवर चार वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या छावणी येथील सैनिक सुनील पांढरेविरुद्ध सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने त्यास तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
जालना जिल्ह्यातील भोकरदन आव्हाणा येथील सुनील तुकाराम पांढरे (२६) हा सैन्य दलातील जवान आहे. कन्नड तालुक्यातील तरुणी शहरात शिक्षण घेत होती. एन-९ मधील एका रुग्णालयात रिस्पेशनिस्ट म्हणून काम करत होती. दोन वर्षांपूर्वी सुनील हा रुग्णालयात गेला असता तिची तरुणीसोबत ओळख झाली. ओळखीनंतर दोघे वारंवार एकमेकांना भेटू लागले. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सुनीलने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध तरुणीच्या बहिणीच्या घरी बलात्कार केला. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या ठिकाणी तरुणीला बोलावून संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरुणीने सुनील यास लग्नाचा तगादा लावला असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. २४ सप्टेंबर रोजी तरुणी थेट छावणी येथील कार्यालयात धडकली. सुनील यास लग्नाचा तगादा लावताच त्याने साफ शब्दात नकार दिला.
त्यानंतर मुलीने घटनेची माहिती वडिलांना दिली. वडिलांनी थेट सिडको पोलीस ठाण्यात सुनीलविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे पाटील यांनी ब्रिगेडीयर यांना पत्र लिहून तरुणीच्या तक्रारीचा उल्लेख करीत सुनील यास सिडको पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे सांगितले. पोलिसांनी समेट घडवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुनील याने तरुणीसोबत लग्नास नकार दिला. मुलीच्या तक्रारीवरून विश्वनाथ झुंजारे पाटील यांनी सुनील पांढरेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.






























































