
सामना ऑनलाईन,नागपूर
हिंदुस्थानी लष्करासाठी नवी मार्शल टय़ून बनविण्याचा मान नागपूरची गायिका, संगीतकार महिलेला मिळाला आहे. डॉ. तनुजा नाफडे असे त्यांचे नाव असून त्या येथील धरमपेठ महाविद्यालयात संगीताच्या प्राध्यापिका आहेत. तनुजा नाफडे यांनी संगीतबद्ध केलेली धून देशाच्या लष्कराची मार्शल टय़ून म्हणून दिल्लीच्या माणेकशा सेंटर सभागृहात हिंदुस्थानी सैन्य दलाने आयोजित एका कार्यक्रमात वाजवली गेली आणि त्यानंतर लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या हस्ते तिचे देशासाठी लोकार्पण 7 ऑक्टोबर रोजी करण्यात आले. या वेळी डॉ. तनुजा नाफडे यांचा लष्करप्रमुखांच्या हस्ते ताम्रपत्र देऊन गौरवही करण्यात आला. आज नागपुरात पोहोचल्यावर प्रेस क्लबमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डॉ. नाफडे म्हणाल्या की, लष्करासाठी अशा प्रकारे संगीत तयार करण्याची जबाबदारी आजवर लष्करातील तज्ञांनाच दिली जात होती. हिंदुस्थानच्या नव्हे तर जगाच्या इतिहासात प्रथमच गैर लष्करी व्यक्तीकडून अशा प्रकारे मार्शल टय़ून बनवली गेली आहे.




























































