
श्रीनगर विमानतळावर एका लष्करी अधिकाऱ्याने स्पाईस जेट एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या अधिकाऱ्याने वेटिंग एरियाच्या स्टँडने कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यात एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे.
View this post on Instagram
ही घटना 26 जुलैला श्रीनगर विमानतळावर घडली. सदर अधिकारी हा दिल्लीला निघाला होता. विमानात सात किलोच्या वरच्या वजनाच्या बॅगसाठी अधिक पैसे आकारले जातात. सदर अधिकाऱ्याकडे दोन मोठ्या बॅग होत्या ज्यांचे दोन्ही मिळून वजन 30 किलोच्या वर होते. जे ठरवून दिलेल्या वजनाच्या दुप्पट होते. त्यामुळे स्पाईस जेटच्या कर्मचाऱ्यांनी त्याला अधिक पैसे भरायला सांगितले. मात्र अधिकाऱ्याने ते पैसे भरण्यास नकार दिला. त्या वरून त्याच्यात व कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला.
स्पाईस जेटच्या कर्मचाऱ्यांनी सुरवातीला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकारी ऐकत नव्हता व त्याने थेट सामानासहीत आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विमानतळावरील सुरक्षा रक्षकांना बोलावून त्याला तिथून हटवण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या अधिकाऱ्याने तेथील वेटिंग रोचा स्टँड उचलून कर्मचाऱ्यांना मारहाण करायला सुरुवात केली.
या घटनेनंतर पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच लष्कराने देखील या घटनेची गंभीर दखल घेत या घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.