अर्णब गोस्वामीची पोलिसांकडून चौकशी होणार, ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ने केली आहे तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची बदनामी करणारा रिपब्लिक चॅनेलचा पत्रकार अर्णब गोस्वामी याची आता पोलिसांकडून चौकशी होणार आहे. शिवसेना, शिवशक्ती-भीमशक्ती’च्या तक्रारीनंतर संबंधित प्रकरणाची चौकशी करावी असे निर्देश वरळी विभाग सहायक पोलीस आयुक्तांनी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याला दिले आहेत. शिवशक्ती-भीमशक्ती विचार मंचचे अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक चेतन कांबळे यांनी पोलिसांकडे कंगना आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

केंद्रातील भाजप सरकार बँका, रेल्वे, विमान, विमा कंपन्यासारख्या आस्थापनांचे खासगीकरण करून राष्ट्रीय संपत्तीचा अपहार करीत आहे. तर आरक्षणावरून नाहक गरळ ओकणारी कंगना आणि अर्णब गोस्वामी ठाकरे सरकार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची नाहक बदनामी करीत आहेत. देशवासीयांची दिशाभूल करण्यासाठीच केंद्र सरकारने अर्णब, कंगना यांना हाताशी धरून हा डाव आखला आहे, असा आरोप करीत कंगना आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात चेतन कांबळे यांनी वरळी विभाग सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. यामध्ये कंगना हिच्यावर अ‍ॅट्रोसिटी तर अर्णब याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. यानुसार ही चौकशी होणार असल्याचे कळते.

…तर रिपब्लिक चॅनेलवर आंदोलन

अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत हे ‘आरएसएस’चे ‘हस्तक’ आहेत असा आरोपही चेतन कांबळे यांनी केला आहे. केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आणि खासगीकरणाचा डाव साधण्यासाठीच हे षडयंत्र सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र अशा बेजबाबदार पत्रकाराच्या वक्तव्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार पत्रकारावर- रिपब्लिक चॅनेलवर न्यायालयाने आणि  प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाने निर्बंध घालावेत अशी मागणी करतानाच रिपब्लिक चॅनेलच्या कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशाराही चेतन कांबळे यांनी दिला आहे.