
अर्णव खैरे (१९) आत्महत्येप्रकरणी कोळसेवाडी आणि रेल्वे पोलिसांनी दोन पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. अर्णवच्या मोबाईलचा पासवर्ड उपलब्ध नसल्याने हा मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठ-वण्यात आला असून तो ज्या लोकलने प्रवास करीत होता त्याच लोकलमधील प्रवाशांची चौकशी सुरू केली आहे.
मराठी-हिंदीच्या वादातून महाविद्याल यीन विद्यार्थी अर्णव खैरे याला लोकलमधील काही प्रवाशांनी मारहाण केली. त्यामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या अर्णवने आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले. याप्रकरणी अर्णवचे वडील जितेंद्र खैरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा उलगडा
करण्यासाठी स्थानिक कोळसेवाडी पोलिसांसह कल्याण रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांनी अर्णवने प्रवास केलेल्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे. संबंधित लोकलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजचे विश्लेषण करून सुमारे १५ प्रवाशांची प्राथमिक ओळख पटवण्यात आली असून त्यांना कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये बोलावून चौकशी केली आहे.
अर्णववर त्याच्या मित्रांकडून काही दडपण होते का, अभ्यासाचा किंवा इतर कोणत्याही कारणाचा ताण होता का? या बाबीही पोलीस पडताळून पाहत आहेत. आत्महत्येमागील वास्तव समोर आणण्यासाठी पोलिसांनी तपास जल दगतीने सुरू केला आहे.
अर्णवच्या मोबाईल पासवर्ड ओपन झाल्यानंतर त्याला मिळालेल्या संदेशांचे स्वरूप, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडियावरील मित्र यांची माहिती उपलब्ध होणार असल्याने तपासाला गती येणार आहे.




























































