
‘मेट्रो वन’च्या मार्गावर महिला प्रवाशांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-1च्या सर्व 12 स्थानकांवर सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो प्रवासात महिला प्रवाशांची मासिक पाळीच्या काळात होणारी गैरसोय दूर झाली आहे. महिलांच्या स्वच्छतागृहांबाहेर वेंडिंग मशीन्स बसवण्यात आली आहेत.
मेट्रो प्रवासात महिला प्रवाशांना स्वच्छतेची उत्पादने सहज उपलब्ध व्हावीत, या हेतूने मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. खासगी कंपन्यांच्या सहकार्याने सुविधा कार्यान्वित केली आहे. त्यानुसार प्रत्येक वेंडिंग मशीनमध्येसॅनिटरी पॅड उपलब्ध असेल. महिला प्रवाशांना दोन सॅनिटरी पॅडचे पाकीट अवघ्या 10 रुपयांत मिळणार आहे. महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी एमएमओपीएलने पायाभूत सुविधांना चालना दिली आहे. ‘सिरोना’ कंपनीच्या भागीदारीतून मेट्रोच्या सर्व 12 स्थानकांवर सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनची व्यवस्था केली आहे.




























































