
बीकेसी येथील अमेरिकन दूतावासाला धमकीचा फोन करणाऱयाला अखेर बीकेसी पोलिसांनी पश्चिम बंगाल येथून अटक केली. मोहम्मद तारिक जमान ऊर्फ मोहम्मद अली असे त्याचे नाव आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले जाणार आहे. तारिकच्या अटकेसाठी बीकेसी पोलिसांनी मुर्शिदाबाद येथील एका संवेदनशील ठिकाणी जीव धोक्यात टाकून फिल्डिंग लावली होती.
बीकेसी येथे अमेरिकेचे दूतावास कार्यालयात आलेल्या धमकीच्या फोनची गंभीर दखल घेत बीकेसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. परिमंडळ 8 चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक सचिन राणे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मछिंद्र सानप, अरविंद होळकर, किरण खरटमोल यांच्या पथकाने तपास सुरू केला. तो फोन पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथून केल्याचे उघड झाले. त्यानंतर सानप आणि त्याचे पथक मुर्शिदाबाद येथील एका संवेदनशील ठिकाणी गेले. तेथे पोलिसांनी एक दिवस फिल्डिंग लावली. शुक्रवारी रात्री तारिक हा आला असता त्याला बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतले.

























































