
शहरात 15 दिवसांपूर्वी दरोडा टाकणाऱ्या टोळीला जामखेड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेला मुद्देमाल आणि दरोडय़ासाठी वापरली जाणारी शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
नितीन ऊर्फ कव्या धनसिंग पवार (मूळ रा. गोरोबा टॉकीज, जामखेड, हल्ली रा. पोखरी, ता. आष्टी, जि. बीड), जटा सुखलाल पारधी (रा. जमनीटोला, सोहादपूर, जि. होशिंगाबाद, मध्य प्रदेश), अक्षय ऊर्फ काळ्या लाखन पवार, सूरज कान्हू पवार (दोघे रा. मिलिंदनगर, जामखेड), अनिल ऊर्फ लखन रतन ऊर्फ रवि काळे (रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा), संतोष ऊर्फ बुट्टय़ा कंठीलाल पवार (रा. खंडोबावस्ती, जामखेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विजय खुपसे (रा. शिक्षक कॉलनी, जामखेड) यांनी फिर्याद दिली आहे.
27 डिसेंबर 2021 रोजी विजय खुपसे यांच्या घरावर दरोडा टाकून घरातील पैसे व सोने असा मुद्देमाल चोरीला गेला होता. याबाबत जामखेड पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला होता. तपासादरम्यान उपनिरीक्षक राजू थोरात व गुन्हे शोध पथकाने वरील सहा दरोडेखोरांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेल्या सोन्याच्या तीन अंगठय़ा, सोने पेटी, रिंग, नथ, बुशी, अंगठी, मंगळसूत्र असा मुद्देमाल, तर दरोडा टाकण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत.
जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू थोरात, पोलीस नाईक अविनाश ढेरे, कॉन्स्टेबल संग्राम जाधव, संदीप राऊत, विजय कोळी, आबा आवारे, अरुण पवार, संदीप आजबे, सचिन देवढे यांनी ही कारवाई केली आहे.




























































