
ट्रव्हल व्यावसायिकाला 20 लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी देणाऱ्याला समतानगर पोलिसांनी अटक केली. सुमित प्रकाश उतेकर असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
वीस लाख रुपयांची खंडणी न दिल्यास मुलाचे अपहरण करू अशी धमकी देणारा फोन ट्रव्हल व्यावसायिकाला अज्ञात नंबरवरून वारंवार येत होते. धमकीप्रकरणी तक्रारदार यांनी समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. समतानगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक आनंद हाके यांच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना धमकी देणाऱयाची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सुमितला अटक केली. कसून चौकशी केल्यावर त्याने खंडणीसाठी फोन केल्याची कबुली दिली. वडिलांच्या उपचारासाठी पैसे हवे असल्याने त्याने तो फोन केल्याचे तपासात समोर आले आहे.




























































