
सुधीर नागापुरे, माजलगाव
ग्रामीण भागातून परिवहन महामंडळाच्या बसमधून शिक्षण घेण्यासाठी धडपडत जाणाऱ्या शालेय विद्यार्थिनींशी आपल्या महामंडळाचे सौजन्याने वागण्याचे ब्रीदवाक्य विसरून अरेरावी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील पाटोदा आगाराच्या महिला वाहकावर चांगलंच गंडांतर आलं आहे. विध्यार्थीनींनी थेट परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनाच तक्रार केल्याने या मुजोर वाहकाची चौकशी करून त्यात दोषी आढळल्याने तडवी या वाहकास निलंबित करण्यात आले आहे.
प्रवाशांशी सौजन्याने वागावे हे परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य असतांना बहुतांश वेळा परिवहन महामंडळाच्या बस मध्ये प्रवास करणाऱ्या पासधारक विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, अपंग अशा सवलतीच्या प्रवाशांना पाहताच वाहकांच्या कपाळावर आठ्या पडतात. खेकसून अपमानास्पद वागणूक देऊन कसेतरी तिकीट देतात हे नेहमीचेच चित्र बसमध्ये दिसून येते. बीड-परळी राज्यमार्गावरील फकीर जवळा येथून दिंदृड येथे अनेक विध्यार्थीनी शिक्षण घेण्यासाठी बसने ये-जा करतात. त्यांचाकडे महामंडळाचे पासेस आहेत. फकीर जवळा या गावास सर्व बसेससाठी अधिकृत थांबा आहे. शनिवार दि.२० रोजी दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास वैष्णवी बाळासाहेब मिसाळ व अन्य विद्यार्थिनी दिंदृड येथे थांबलेल्या पाटोदा-परळी क्र. एम एच २०-२६८० बसमध्ये चढल्या असता महिला वाहक तडवी यांनी गाडी जवळा येथे थांबत नाही. तुम्ही उतरा, असे म्हणून विद्यार्थिनी बरोबर अरेरावी केली. तरीही विद्यार्थिनी आमच्या गावास थांबा आहे, असे म्हणत ठाम राहिल्या असता या वाहकाने वैष्णवी हिला केसांना धरून उद्धट वर्तणूक करून धमकी दिली.
अखेर विद्यार्थीनी जवळा येथे उतरल्यावर त्यांनी कुटुंबातील सदस्यांना या प्रकाराची माहिती दिली. यावर बाळासाहेब मिसाळ यांनी थेट परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना भ्रमणध्वनीवर ही घटना सांगितली. अन अवघ्या काही तासात सूत्रे हलली. बीड विभाग नियंत्रक सुपेकर यांना संबंधित घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिल्याने सोमवारी माजलगाव येथील आगारप्रमुख काळम पाटील यांनी जवळा येथे जाऊन वैष्णवी व इतर विद्यार्थिनींचे जवाब नोंदवून घेतले. तसेच वाहक तडवी यांचाही जवाब घेण्यात आला. यातून तडवी यांचा चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर केला. या चौकशीत तडवी दोषी आढळून आल्याने त्यांना परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकानी निलंबनाची कारवाई केली आहे.
summary- arrogant conductor got dismissed


























































