
शब्दांकन- राज चिंचणकर
फड गाजवणाऱया लावणीसम्राज्ञी सीमा पोटे नारायणगावकर सांगत आहेत त्यांच्या आयुष्यातली एक संवेदनशील आठवण…
वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशा मंडळात आम्ही सर्वजण काम करत होतो. 1993 या वर्षातली ही घटना आहे. माझे आई-वडील, माझी बहीण, माझे पती सुधाकर पोटे असे आम्ही सर्वजण त्यात होतो. नंदुरबार तालुक्यातल्या गावात आमचा यात्रेचा एक प्रयोग होता. आमच्या त्या प्रयोगाच्या दरम्यान माझ्या वडिलांच्या छातीत दुखायला लागले. त्याआधी त्यांना हृदयविकाराचे दोन झटके येऊन गेले होते. त्यामुळे आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो, पण प्रयोग तर करायचाच होता.
संध्याकाळी कार्यक्रम सुरू झाला. राजीव गांधी यांच्या जीवनावरचे ते नाटय़ होते. त्यात मी, माझे पती यांच्यासह माझ्या वडिलांनाही छोटीशी भूमिका होती. माझ्या वडिलांचा आणि पतींचा प्रसंग प्रयोगात सुरू असतानाच वडिलांच्या छातीत कळ आली. त्यांना खूप घाम फुटला, पण त्यांनी घेतलेली ‘एन्ट्री’ पूर्ण केली. नंतर माझ्या पतीने माझ्या वडिलांना उचलून आमच्या तमाशाच्या राहुटीत आणून झोपवले. रंगमंचावर वगनाटय़ाचा प्रयोग सुरूच होता. आता वडिलांना दवाखान्यात न्यायचे कसे, असा आम्हाला प्रश्न पडला. यात्रेत कुणी डॉक्टर आहे का, हे पाहण्यासाठी आम्ही काही लोकांना पाठवले. त्याच वेळी रंगमंचावर सुरू असलेल्या वगनाटय़ात माझी, माझ्या पतींची आणि माझ्या बहिणीची अशी तिघांची ‘एन्ट्री’ होती. पाठीवर बॉम्ब बांधून राजीव गांधी यांची हत्या जिने केली होती तिची भूमिका मी करत होते. शेवटचे दोन प्रसंग राहिले होते. आम्ही रंगमंचावर प्रसंग सादर करत होतो आणि रंगमंचाच्या मागे माझी आई रडत होती. आम्ही तो प्रयोग पूर्ण केला. प्रयोग संपताना डॉक्टर आले. डॉक्टरांनी वडिलांना तपासल्यानंतर आम्हाला खरे काय ते कळून चुकले. इतका वेळ वडील बेशुद्ध आहेत असेच आम्हाला वाटत राहिले, पण नंतर समजले की, माझ्या आईला वेगळेच काही जाणवले होते. कारण तिच्या खांद्यावरच त्यांनी प्राण सोडला होता.
आमच्याच कुटुंबावर तो पूर्ण तमाशा चालत होता. पुढेही यात्रांमध्ये आम्हाला प्रयोग करायचे होते. वडिलांच्या अंत्यविधीसाठी आम्हाला सोलापूर जिह्यातल्या माढा तालुक्यातल्या रोपळे या गावी जावे लागणार होते, पण आमचा तमाशा होता तो गुजरातच्या सीमेवर. त्यामुळे 16 ते 18 तासांचा प्रवास होता. वडिलांचे पार्थिव जीपमध्ये ठेवून आम्ही रात्री प्रवास सुरू केला आणि दुसऱया दिवशी रात्री एक वाजता आम्ही त्या गावी पोहोचलो. रात्री दोनच्या सुमारास वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. दुसऱया दिवशी पहाटे साडेपाचला आम्ही राख सावडली. तसेच राखेचे हात घेऊन आम्ही नांदेड जिह्यात भरणाऱया पंधरा दिवसांच्या एकमेव यात्रेसाठी हजर झालो.
वडील गेले होते व आईला सांभाळायचे, स्वतःला सांभाळायचे की, आपले रंगमंचावरचे काम पूर्ण करायचे असा प्रश्न पडला होता. आम्हा दोघी बहिणींचे डोळे सुजलेले दिसू नयेत म्हणून काळे चष्मे घालून आम्ही नृत्य केले आणि तो कार्यक्रम पूर्ण केला. कार्यक्रम करून वडिलांच्या दहाव्याला आम्ही पुन्हा गावी आलो आणि दहावे करून पुन्हा आम्ही तमाशात पोहोचलो. ऐन रंगमंचावर वडील गेले तेव्हा रसिकांना काहीच कळले नाही. किंबहुना, आम्ही मायबाप रसिकांना काही जाणवू दिले नाही. माझ्या वडिलांचे म्हणणे असायचे की, स्टेजवरच मरण यायला हवे आणि खरोखरच त्यांना तसेच मरण आले. माझ्या जीवनातली ही अशी घटना आहे, जी मरेपर्यंत मी कधी विसरू शकणार नाही.






























































