आभाळमाया – पुन्हा मंगळ मिशन!

554

>> दिलीप जोशी

सध्याचा काळ मंगळ मोहिमांसाठी अनुकूल आहे. कारण मंगळ आणि पृथ्वीमधलं अंतर त्यांच्या कक्षीय भ्रमणामुळे कमी-जास्त होत असतं. तसं ते यावेळी कमी आहे. एरवी मंगळ सूर्यापासून सुमारे 22 कोटी किलोमीटर आणि पृथ्वी 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. याचा अर्थ आपल्या या बाह्य कक्षेतील शेजाऱयाचं आणि आपलं अंतर 7 कोटी किलोमीटर भरतं, परंतु दर 26 महिन्यांनी हे अंतर कमी होतं. हाच काळ पृथ्वीवरून मंगळाच्या दिशेने एखादं यान सोडण्यासाठी योग्य असतो. सुमारे दीड-दोन कोटी किलोमीटरचा प्रवास कमी झाला तर रॉकेटचं तेवढं इंधनही वाचतं. या कमी अंतराच्या ‘विंडो’चा विचार करूनच मंगळ मोहिमा आखल्या जातात.

आतापर्यंत पाथ फाइंडर, रोव्हर वगैरे यानं मंगळावर जाऊन संशोधन करत आहेत. यात अमेरिका, रशियाचा पुढाकार पूर्वीपासूनच आहे, परंतु आता हिंदुस्थानचं ‘मंगळयान’सुद्धा अवकाशात झेप घेऊ शकेल. चांद्रयान-2च्या अखेरच्या टप्प्यातील आकस्मिक अपयश आणि सबंध जगाला गेले सात-आठ महिने ग्रासणारं ‘कोरोना’चं संकट यामुळे जगाचीच अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. साहजिकच अवकाशयानांच्या कार्यक्रमांनाही उशीर होणं यात आश्चर्य नाही.

तरीही हिंदुस्थानप्रमाणेच चीन आणि इतर देशही मंगळाकडे डोळे लावून बसले आहेत. विशेष म्हणजे अरब जगतातील पहिलंच ‘अमाल’ (आशा) हे यान 19 जुलै रोजी जपानच्या प्रक्षेपण तळावरून मंगळाच्या दिशेने झेपावलं. अमेरिकेचे पर्सिव्हरन्स हे 30 जुलै रोजी अंतराळात गेलं. ते पुढच्या वर्षी 18 फेब्रुवारीला मंगळावर उतरेल. 1997 पासून मंगळ संशोधनाचा सुरू झालेला सिलसिला आता आणखी वेग घेताना दिसतोय. पर्सिव्हरन्स किंवा ‘पाठपुरावा’ अथवा चिकाटी अशा आशयाचं नाव असलेलं हे यान मंगळावर उतरताना त्याच्या रुंद चाकांमुळे त्याचं अवतरण पूर्वीच्या ‘क्युरिऑसिटी’ यानापेक्षा सोपं होईल. मंगळावरच्या ‘नीरो’ नावाच्या खळग्यात ते हेलिकॉप्टरसारखं उतरणार आहे.

या यानांना नाव देण्यासाठी नासाची स्पर्धा असते. पर्सिव्हरन्स हे नाव व्हर्जिनिया राज्यातील  बर्क येथील लेक ब्रॅडॉक माध्यमिक शाळेतल्या अलेक्झॅन्डर मॅथर या सातव्या इयत्तेत शिकणाऱया मुलाने सुचवलं. यान नामकरण स्पर्धेसाठी 29 हजार जणांनी सहभाग नोंदवला. त्या सर्वांनी सुचविलेल्या नावांची छाननी होऊन अखेर ऍलेक्झॅन्डरने जे नाव सुचवलं ते मान्य झालं. हे समजताच व्हर्जिनियातील त्या शाळेत उत्सवाचं वातावरण निर्माण झालं. या ‘नेम द रोव्हर’साठी अमेरिकेतल्या प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांकडून सूचना मागवल्या होत्या.

‘पर्सिव्हरन्स’ हे नाव स्वीकारताना ‘नासा’च्या संशोधकानी म्हटलं की, ‘‘ऍलेक्सने सुचविलेल्या नावात संशोधनाची आस, वृत्ती दिसून आली. कारण हे ‘रोव्हर’ मंगळावर काहीतरी विस्मयकारी संशोधन करेल अशी आमचीही अपेक्षा आहे.’’ अमेरिकेच्या 1997च्या स्पिरिट यानापासून सुरू झालेल्या मंगळ मोहिमेतलं हे पुढचं पाऊल आहे. 2004 मध्ये मंगळावर उतरलेली  ‘ऑपॉर्च्युनिटी’ ते ‘क्युरिऑसिटी’ ही यानं (रोव्हर) मंगळावर  उत्खनन, संशोधन करतच आहेत. मंगळपृष्ठाखाली विपुल प्रमाणात बर्फ असल्याचं म्हटलं जातं. त्याचा वापर करता आला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. आता पाठवलेल्या ‘पर्सिव्हरन्स’चं स्वरूप अधिक आधुनिक असून त्यावर सात प्रकारची वैज्ञानिक संशोधन करणारी उपकरणं बसवली आहेत. 23 कॅमेरे आणि दोन प्रभावशाली मायक्रोस्कोपद्वारे (सूक्ष्मदर्शक) मंगळाचं बारकाईने निरीक्षण आणि तेथील वातावरणाचं परीक्षण वैज्ञानिकांना करता येईल. मानवाची मंगळ ‘वारी’ अशीच कायम सुरू राहणार आहे. काळाच्या ओघात त्यात अनेक देश सामील होतील. मंगळ हा पृथ्वीचा अगदी  जवळचा असा एकमेव ग्रह आहे की, कदाचित त्यावर वस्ती करता येऊ शकते. बुधावरचं अतितप्त वातावरण, शुक्रावरचं कार्बन सल्फरचं वलय आणि गुरूसारख्या वायुरूप कवच असलेल्या ग्रहांवर वसाहत अशक्यच. त्यानंतरच्या अब्जावधी किलोमीटर दूर असलेल्या भूभागांचा विचारच करायला नको. म्हणूनच मंगळ संशोधकांना सतत साद घालत असतो.

आपली प्रतिक्रिया द्या