राफेलची नांदी

rafel-deal

>>  कर्नल अभय बा. पटवर्धन  

36 राफेल विमाने वायुसेनेला आवश्यक असणार्‍या 126 लढाऊ विमानांची कमतरता भरून काढू शकणार नाही हे जरी खरे असले तरी भविष्यात हिंदुस्थानात तैनात होणार्‍या रशियन एस 400 क्षेपणास्त्र आणि विमानभेदी सुरक्षा प्रणालीच्या कवचाखाली राफेल विमाने सुखोईच्या समन्वयाने शत्रूचा कर्दनकाळ ठरतील हेदेखील तेवढेच खरे आहे. राफेलच्या आगमनामुळे हिंदुस्थानी वायुसेनेने ’नव्या आक्रमण युगा’त (न्यू कॉम्बॅट एरा ) प्रवेश केला आहे. त्या अर्थाने पाच राफेल विमानांचे आगमन हिंदुस्थानी वायुसेनेच्या नव्या युगाची नांदी आहे.   

राफेलवरील क्षेपणास्त्र

राफेलवर पुढील चार प्रकारच्या क्षेपणास्त्रांसाठी एकाच प्रकारचे लाइटनिंग पॅड्स बसवण्यात येतील. अ) या विमानांवर असणारी मेंटॉर एअर टू एअर मिसाईल्स याआधीच अंबाला एअरबेसमधे आली आहेत.  या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रामुळे राफेल हिंदुस्थानी हद्दीतूनच चीन/पाकिस्तानी विमानांचा वेध घेऊ शकेल. पुन्हा मेंटॉर क्षेपणास्त्राला हवेतच ध्वस्त करण्याची कुठलीही उलट प्रणाली (काउंटर मेझर्स) या दोन्ही देशांकडे नाही. ब) 600 किलोमीटर्स लांब पल्ला आणि 40 कोटी रुपये किंमत असलेले स्काल्प हे राफेलवरील दुसर्‍या प्रकारचे अतिशय अचूक मारक क्षेपणास्त्र आहे. चीन आणि पाकिस्तानच्या 600 किलोमीटर्स आत असलेल्या कुठल्याही लक्ष्याचा वेध हे क्षेपणास्त्र हिंदुस्थानी हद्दीतून घेऊ शकते. स्काल्प क्षेपणास्त्र आत घुसून (पेनिट्रेशन), आघात (इम्पॅक्ट) आणि/किंवा हवेतील स्फोटाच्या (एअर बर्स्ट ) माध्यमातून आपल्या लक्ष्याला ध्वस्त करते.  त्याचा नायनाट करते.  मध्यम/लांब पल्ल्याची ही दोन्ही क्षेपणास्त्र राफेल विमानाबरोबरच येतात. क) कमी अंतरावर मारा करण्यासाठी आपल्या वायुसेनेने 60 किलोमीटर्स पल्ल्याची, हवेतून जमिनीवर मारा करणार्‍या हॅमर या मध्यम अंतराच्या क्षेपणास्त्राची निवड केली आहे. बंकर्स/हार्डन्ड शेल्टर्स/रणगाडे अशा छोटय़ा ‘पिनपॉइंट टार्गेट्स’ना उध्वस्त करण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. ड) मिराज 2000वर असलेली एअर टू एअर एमआयसीए क्षेपणास्त्र राफेलवरही बसवलेली आहेत आणि इ) हिंदुस्थानी वायुसेनेने 2018-19मध्ये आपल्या सुखोई-30 आणि मिग-29 या विमानांसाठी घेतलेल्या इस्रायली लाइटनिंग पॅड्सची निवड सेन्सॉर कॉमनॅलिटी शाबूत ठेवण्यासाठी राफेल विमानांसाठीही केली आहे, पण भविष्यात मात्र राफेलसाठी टॅलिकोज लाइटनिंग पॅड्स खरेदी केल्या जातील.  

इसवी सन 1953 मध्ये तुफानी फायटर विमाने हिंदुस्थानी वायुसेनेत आल्यापासून वायुसेनेच्या मिस्टीयर, जग्वार, मिराज 2000 आणि नौसेनेच्या अलिझेनंतर आता ‘कनार्ड डेल्टा विंग’ असलेल्या राफेल्स विमानांपर्यंत फ्रान्सच्या ‘दसॉल्ट एव्हिएशन’ कंपनीने हिंदुस्थानला नेहमी दर्जेदार लढाऊ विमाने पुरवली आहेत. 1947-48चे पहिले हिंदुस्थान-पाक युद्ध व 1962चे चीन युद्ध सोडता बाकीच्या सर्व युद्धांमध्ये या फ्रेंच विमानांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. सप्टेंबर,2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फ्रान्स भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये तीस सिंगल सीटर फायटर आणि सहा ट्विन सीटर ट्रेनर अशा 36 राफेल विमान खरेदी करण्यासाठी करार झाला होता. दरवर्षी 12च्या हिशेबाने 2019पासून ही विमाने हिंदुस्थानला सुपूर्द करण्यात येतील. गेल्या ऑक्टोबरमध्ये दोन विमाने हिंदुस्थानात आली होती. या वर्षी फ्रान्स उर्वरित 10 विमाने देणार आहे. त्यापैकी पाच विमाने 29 जुलैला आली. चार विमाने आपल्या वैमानिकांना प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्येच ठेवण्यात आली असून हिंदुस्थानी वैमानिक आणि तंत्रज्ञ दहाव्या विमानाची चाचणी फ्रान्समध्ये करीत आहेत. सर्व 36 राफेल विमाने आल्यानंतर हिंदुस्थानी वायुसेनेच्या मारक क्षमतेत प्रचंड वृद्धी होईल. फ्रान्सची दसॉल्ट एव्हिएशन कंपनी या विमानांची निर्मिती करते. फ्रेंच भाषेत ‘दसॉल्ट राफेल’चा अर्थ ‘गस्ट ऑफ विंड अँड बर्स्ट ऑफ फायर’ हा आहे.

राफेल हे 15.30 मीटर्स लांब, 10.90 मीटर्स रुंद, 5.30 मीटर्स उंचीचे आणि 10 टन वजनाचे लढाऊ विमान आहे. उड्डाण करतांना 14.5 टन अतिरिक्त वजन (9.5 टन हत्यार/दारुगोळा व 4.7 टन इंधन) नेण्याची क्षमता या विमानात आहे. आवाजाच्या वेगापेक्षा 1.8 पटींनी उड्डाण करणारे हे विमान, 60 हजार फूट उंची (सिलिंग हाइट) पर्यंत जाऊन अंबाला-लाहोर अंतर आठ मिनिटांत,  हाशिमारा-तिबेट अंतर तीन मिनिटांत आणि हाशिमारा- ल्हासा अंतर सात मिनिटांत पार करू शकेल. कुठल्याही स्टॅण्डर्ड रन वेवर उतरू शकणारे राफेल 120 नॉट्सच्या बिना ड्रग शूट लँडिंग स्पीडने दौलत बेग ओल्डी यासारख्या 1500 फूट लांबीच्या वायुपट्टीवरदेखील उतरू शकते. राफेल विमान कमी संख्येतही क्विक रिऍक्शन अलर्ट, एयर डिफेन्स,एयर सॉव्हर्निटी/सुपिरियॉरिटी फंक्शन, पॉवर प्रोजेक्शन आणि डिप्लॉयमेंट फॉर एक्सटर्नल मिशन, डीप स्ट्राइक मिशन, सपोर्ट फॉर ग्राउंड फोर्सेस, रिकॉनिसन्स मिशन, पायलट ट्रेनिंग सॉर्टीज, न्यूक्लीयर डेटरण्ट मिशनसारखी अनेक प्रकारची कामे (रोल) करतात. आपल्या मित्र राष्ट्रांच्या सिस्टमशी समन्वय साधून, त्यांच्याशी जुळवून घेत, त्यांच्याबरोबर काम करण्याची क्षमताही या विमानात आहे.

इतकेच नाही तर, वर उल्लेखलेली सर्व कामेही हे विमान एकाच उड्डाणादरम्यान करू शकत असल्यामुळे धोरणकर्त्याच्या (डिसिजन मेकर) मागणीनुसार,  शत्रूचा नायनाट करणार स्ट्राईक मिशन, शत्रूच्या छातीत धडकी भरवणारे प्रिव्हेंटिव्ह मिशन आणि लो लेव्हल हायस्पीड शो ऑफ फोर्स या सर्व गोष्टी एकसाथ  करण्याची धमक या विमानात आहे. याचबरोबर शेवटच्या क्षणी मिशन रद्द करण्याची (रीव्हर्सिबिलिटी) क्षमतादेखील या विमानात आहे. महाप्रगत तंत्रज्ञानामुळे राफेल आकाशातील अतिशय धोकादायक परिस्थितीतही स्वतःचा बचाव करू शकते. हिंदुस्थानच्या संरक्षण सज्जतेत ही विशाल क्षमता असलेली लढाऊ विमाने ‘फासा आपल्या बाजूनी पलटवण्याचे’ (गेम चेंजर) काम करतील. साधारणपणे खरेदीनंतर कोणत्याही लढाऊ विमानाला सामरिकदृष्टय़ा कार्यक्षम होण्यासाठी (फुल ऑपरेशनल डिप्लॉयमेंट) सहा महिन्यांचा अवधी लागतो. कारण,‘ट्रेनिंग मोड’मधे असलेल्या वैमानिकाला ‘मल्टिपल कॉम्बॅट ट्रेनिंग फ्लाइंग मोड’मध्ये येत सामरिक दृष्टिकोनातून कार्यक्षम होण्यासाठी एवढा काळ आवश्यक असतो. पण लडाख सीमेवरील तणाव व स्फोटक परिस्थिती लक्षात घेता जरूर पडल्यास एक आठवडय़ाच्या आत ही विमाने लडाखमध्ये चीन आणि पाकिस्तान यांच्या दुहेरी संभाव्य हल्ल्याचा पलटवार करण्यासाठी तैनात केली जाऊ शकतात.

51 अपग्रेडेड मिराज – 2000च्या जोडीला ही 36 राफेल विमानेदेखील आण्विक अस्त्र वाहून नेण्याचे काम करणार आहेत. अर्थात पुढील 15 वर्षे तरी अपग्रेडेड मिराज-2000 ही विमानेच आपल्या अण्वस्त्र साठ्याचे वाहक असतील. मात्र ब्राह्मोस अण्वस्त्रांसाठी राफेल विमानांचे मोडिफिकेशन 2022च्या शेवटापर्यंत पूर्ण केले जाईल. यामुळे हिंदुस्थानी वायुसेनेला राफेल या एकाच विमानावर सुपर सॉनिक ब्राह्मोस आणि सब सॉनिक स्काल्प ही दोन्ही प्रकारची अण्वस्त्रं वापरता येतील. याप्रकारची सुविधा जगातील दुसर्‍या कुठल्याही वायुसेनेकडे उपलब्ध नाही. यासाठी थेल्स आणि दसॉल्टच्या समन्वय/सहभागात राफेलचे मॉडिफिकेशन, कोडिंग एक्स्टेन्शन आणि टेस्टिंग केले जाईल. मिराज-2000 विमानांच्या कालबाह्य प्रशिक्षण प्रणालींची जागा राफेल विमानांचे ‘टच स्क्रीन सिम्युलेटर्स’ घेतील. वायुसेनेचे धोरणकर्ते खर्‍या नकाशावरील माहितीवर हत्यार/इंधनाचे वजन आणि क्षेत्रीय आकाराचे गतिमान प्रतिबंध या टच स्क्रीन सिम्युलेटरवर टाकून/लावून आपल्या वैमानिकांना आभासी सामरिक प्रशिक्षण देतील.अंबाला व हाशीमारामधील ही राफेलसंबंधीची मॉडय़ुल्स थेट ग्वाल्हेरमधील ऑपरेशन/ट्रेनिंग सेंटरशी संलग्न करण्यात येतील.

36 राफेल विमाने वायुसेनेला आवश्यक असणार्‍या 126 लढाऊ विमानांची कमतरता भरून काढू शकणार नाही हे जरी खरे असले तरी भविष्यात हिंदुस्थानात तैनात होणार्‍या रशियन एस 400 क्षेपणास्त्र आणि विमानभेदी सुरक्षा प्रणालीच्या कवचाखाली राफेल विमाने सुखोईच्या समन्वयाने शत्रूचा कर्दनकाळ ठरतील हेदेखील तेवढेच खरे आहे. राफेलच्या आगमनामुळे हिंदुस्थानी वायुसेनेने ’नव्या आक्रमण युगा’त (न्यू कॉम्बॅट एरा ) प्रवेश केला आहे. त्या अर्थाने पाच राफेल विमानांचे आगमन हिंदुस्थानी वायुसेनेच्या नव्या युगाची नांदी आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या