
सामना ऑनलाईन। श्रीनगर
जम्मू-कश्मिरातील नागरिकांना विशेष हक्क देणाऱ्या देशाच्या राज्यघटनेतील कलम ३५ अ या कलमासंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कश्मीर खोऱ्यात तणाव असून खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारनंतर रात्रभरात जमात-ए-इस्लामी जम्मू-काश्मीर या संघटनेच्या जवळपास दीडशे जणांची धरपकड करण्यात आली आहे.
राज्यघटनेच्या कलम ३५अ अन्वये जम्मू-कश्मिरातील नागरिकांना काही विशेष हक्क देण्यात आले आहेत. १९५४ मध्ये ही तरतूद राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली होती. या कलमाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ही सुनावणी सोमवारी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात तणाव स्पष्ट दिसत असून सुरक्षा बंदोबस्तही कडक करण्यात आला आहे. निमलष्करी दलाच्या अतिरिक्त शंभर तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
“जमात”वरील पहिलीच महत्वाची कारवाई
“जमात”च्या कार्यकर्त्यांची धरपकड हा नियमित कारवाईचा भाग असल्याचे पोलिस सांगत असले, तरीही या घडामोडींची माहिती असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, जमात-ए-इस्लामीवरील ही पहिलीच महत्त्वाची कारवाई आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर फुटीरतावाद्यांच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली असून जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक यालाही शुक्रवारी रात्री ताब्यात घेण्यात आले होते.




























































