
सामना ऑनलाईन । श्रीनगर
सोमवारचा दिवस हिंदुस्थानसाठी ऐतिहासिक ठरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये जम्मू-कश्मीर राज्याला विशेष अधिकार देणारा कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला. याला काँग्रेस आणि पीडीपीने विरोध केला आहे. जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असून हिंदुस्थानने बाटलीतील राक्षस बाहेर काढला असून त्याला पुन्हा बाटलीत घालणे अवघड असल्याचे म्हणाल्या. ‘बीबीसी हिंदी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे विधान केले आहे.
मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, मी या निर्णयामुळे हैराण आहे. काय बोलावे हे मला कळत नाहीये. या निर्णयामुळे मला झटका बसला आहे. लोकशाहीसाठी हा काळा दिवस आहे. जे कश्मिरी नागरिक, नेते दोन राष्ट्रांची थेअरी अमान्य करत मोठ्या विश्वासाने हिंदुस्थानमध्ये आले, पाकिस्तान ऐवजी हिंदुस्थानची निवड केली ते चुकीचे होते, असेही त्या म्हणाल्या. संविधानावर आमचा विश्वास होता, परंतु तो खोटा ठरला असेही त्या यावेळी म्हणाल्या. या निर्णयाचे भविष्यात परिणाम होतील, असेही त्या म्हणाल्या.
मोठ्या षड्यंत्राचा भाग
कश्मीरमधून कलम 370 हटवणे हे मोठ्या षड्यंत्राचा भाग असल्याचे मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या. जम्मू-कश्मीर मुस्लिम बहुल राज्य असून यामध्ये ते बदल करू इच्छित असल्याचा आरोप मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला. तसेच त्यांना कश्मीरची जमिन हवी असून लोकांना वाऱ्यावर सोड़ल्याचे मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या. आम्हाला अल्पसंख्यांक बनवून कमकुवत करण्याचा हा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राक्षसाला बाटलीतून बाहेर काढले
त्यांनी (केंद्र सरकार) राक्षसाला बाटलीतून बाहेर काढले आहे. परंतु त्यांना हे माहिती नाही की त्याला आता पुन्हा बाटलीत कसे बंद करायचे, असे मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या. तसेच मुस्लिम दहशतवादाची सुरुवात कशी झाली हे तुम्ही जाणून आहातच, आता हे माहिती नाही की त्याला कसे बाटलीत बंद करायचे. आता हेच आपल्या देशात होणार आहे, कारण कलम 370 हटवून राक्षसाला बाटलीतून बाहेर काढण्यात आले आहे्, असे त्या म्हणाल्या.
























































