सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सोमवारी राज्यसभेमध्ये कलम 370 रद्द करण्याचे विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर मंगळवारी हे विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आले. यावर दीर्घ चर्चा सुरू आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आमच्यासाठी हा सौभाग्याचा दिवस असल्याचे म्हटले. तसेच कलम 370 रद्द करण्यास विरोध करणाऱ्या काँग्रेसवर निशाणा साधला.
कश्मीरी पंडितांना कश्मीरमध्ये वसवण्यासाठी तुम्ही काय केले? असा सवाल त्यांनी काँग्रेससह विरोधकांना केला. 370 मुळे दहशतवाद वाढला. कश्मीरमधील मुलं दगडफेक करू लागले तेव्हा तुम्हाला दु:ख झाले नाही? कश्मीरमध्ये तिरंगा जाळल्यास गुन्हा नव्हता. तिथे पाकिस्तानचा झेंडा फडकावला जातो तेव्हा दु:ख होत नाही? असा तिखट सवालही सावतं यांनी विरोधकांना केला.
कश्मिरीयत, जमुरीयत या मोठ्या, मोठ्या शब्दांचा वापर करता, परंतु खरंच तिथे हे राहिलंय का? 370 कलमामुळे कश्मीरमध्ये वेगळा झेंडा, वेगळा पंतप्रधान होता. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही तिथे लागू होत नव्हता. आरटीआय, शिक्षणाचा अधिकार लागू नाही, परंतु शरियत मात्र लागू आहे. देशातील कोणत्याही नागरिकाला तिथे जमिन खरेदी करू शकता येत नव्हती. 370 कलमामुळे सर्व काही विस्कळीत झालं, तेथील जनतेचे यामुळे नुकसान झालं, असेही सावंत यावेळी म्हणाले.
मोदींनी हे कलम हटवलं याचा आम्हाला गर्व असल्याचेही सावंत म्हणाले. यावेळी जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन जाऊ आणि जे येणार नाही त्यांना रगडून पुढे जाऊ, अशी गर्जना त्यांनी केली. भाषणाच्या शेवटी त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कश्मीरसंबंधातील कविताही वाचून दाखवली.
शिवसेनास्थापनेआधी बाळासाहेबांनी मुद्दा मांडला
शिवसेनेची स्थापना 1966 रोजी झाली. त्याआधी ते व्यंगचित्रकार होते. शिवसेनेच्या स्थापनेआधी 6 सप्टेंबर, 1949 ला, त्यावेळी जनसंघाची स्थापना झाली नव्हती तेव्हा एका इंग्रजी वर्तमानपत्रात एका व्यंगचित्र काढलेले. यात त्यांनी कश्मीरची समस्या मांडली होती आणि कश्मीरला कसे रगडले जात आहे हे सांगितले. तेव्हापासून शिवसेनेने कश्मीरचा मुद्दा उचलून धरलेला आहे. आज शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना किती आनंद झाला असता.
मुलाखतीमध्ये म्हणाले होते…
बाळासाहेबांच्या व्यंगचित्रामध्ये, भाषणामध्ये हिंदुत्व, कश्मीरच्या प्रश्नाचा उल्लेख असायचा. राजीव शुक्ला यांनी घेतलेले एका मुलाखतीमध्ये त्यांनी बाळासाहेबांना देशाचे पंतप्रधान झाल्यावर पहिला निर्णय काय घ्याल असा प्रश्न केला होता. त्यावेळी देशाचे पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदा कश्मीरचा मुद्दा निकाली काढला असता असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. आज त्यांना काय वाटत असेल. त्यांचे हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी पूर्ण केली. ते असते तर तुमच्यावर फुलांचा वर्षाव केला असता.
घोषणापत्रातील आश्वासन पूर्ण
कलम 370 रद्द केल्यानंतर ‘नरेंद्र मोदींच्या रुपाने पोलादी पुरूष मिळाला आहे’, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली याचीही आठवण खासदार अरविंद सावंत यांनी करून दिली. लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही वेगळे घोषणापत्र जाहीर केले नाही. भाजप-शिवसेनेच्या संयुक्त घोषणापत्रात 370 कलम रद्द करण्याचे आश्वासन होते. त्यामुळेच म्हणतात, ”मिले सूर हमारा, तो सूर बने हमारा.” यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी विरोधकांनाही देशहिताच्या सुरामध्ये सूर मिसळण्याचे आवाहन केले.






















































