
>> वैश्विक, [email protected]
अर्टेमिस अग्निबाणावर स्वार झालेल्या ‘ओरायन’ यानातून चार अंतराळयात्री 1972 नंतर प्रथमच चंद्राचे जवळून दर्शन घेऊन पृथ्वीवर परतले. त्या प्रवासाचे महत्त्व जाणून जगाने कौतुक केले. भावी काळात चांद्र पर्यटन किंवा चांद्र वसाहत अशी स्वप्न पाहणाऱ्यांना आणि त्यांच्यासाठी कमर्शिअल मून फ्लाइट नेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ‘ओरायन’मधल्या चांद्रकक्षा यात्रींनी आणलेली माहिती (डेटा) आवश्यक होता. यानंतरही केवळ नासाच नव्हे तर इतरही देश असे प्रयत्न करतीलच. आपणही ‘गगनयान’ मोहिमेची आखणी करत आहोतच.
पृथ्वीच्या पलीकडचं शून्यवत गुरुत्वाकर्षण असलेलं अंतराळ अनुभवणं आणि वजनरहित अवस्थेत राहून वैज्ञानिक कामगिरी करणं या गोष्टींचा मुळारंभ झाला तो 1975 मध्ये रशियाचा स्पुटनिक-1 अवकाशात उडाला तेव्हापासून. नंतर युरी गागारिन नावाचा पहिला माणूस माणसांच्या ज्ञात इतिहासात प्रथमच सदेह अंतराळात जाऊन पृथ्वीवर सुखरूप परतला तेव्हा तर वैज्ञानिक जगताचा आनंद अंतराळात मावेनासा झाला. सर्वसामान्यांचे जग या विलक्षण प्रवासाकडे पुतूहलाने पाहू लागले. नंतर अमेरिकेची 1969 मधली यशस्वी समानव चांद्रमोहीम आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय ‘स्पेस-स्टेशन’वर अनेक दिवसांचा अंतराळी मुक्काम या घटना एकापाठोपाठ एक घडत गेल्या.
आता अंतराळ प्रवासाचं तेवढं कुतूहल कदाचित जेन-झी आणि त्याहीपुढच्या पिढय़ांना राहणार नाही. त्यांच्या ‘उद्याच्या प्रवासाचा’ तो नेहमीचा (रुटीन) भागही असेल. अर्थात असं सगळं ‘गुलाबी चित्र रंगवताना अंतराळ यात्रा करणं सोपं नाही हे कायमच लक्षात ठेवावं लागेल. कुणी म्हणेल पृथ्वीवरचा विविध प्रकारचा प्रवास तरी पुठे शंभर टक्के सुरक्षित आणि सोपा आहे? ही गोष्ट खरीच, पण त्यासाठी नैमित्तिक प्रवासाला लागते तेवढीच तयारी करून भागतं. अंतराळ प्रवासाची तयारी ‘प्रशिक्षण’ घेऊनच (अजून तरी) करावी लागणार. मनात आलं आणि खिशात पैसा आहे म्हणून अंतराळ यात्रा करता येईलच असं नाही. एखादाच ‘स्टीफन हॉकिंग’ विलक्षण जिद्दीने ते साध्य करू शकतो. (अर्थात 2007 मध्ये त्यांनी विकलांग अवस्थेतही 65 व्या वर्षी मोठय़ा जिद्दीने ‘शून्यवत’ गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतला होता.)
आजवर एकूण 781 माणसांनी अंतराळात जाऊन येण्याचा विक्रम केलाय. 40 देशांपेक्षा जास्त देशांमधल्या व्यक्तींनी अंतराळानुभव घेतलाय. त्यात हिंदुस्थानचे अंतराळयात्री राकेश शर्मा आणि शुभांशू शुक्ला यांचाही समावेश आहे. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त महिलासुद्धा अंतराळात जाऊन आल्या आहेत. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स हिंदुस्थानी वंशाच्या हे सर्वांना ठाऊक आहे.
अंतराळाकडे झेपावताना अनेकदा उड्डाणासाठीचे ‘काऊंटडाऊन’ थांबवून उड्डाणं लांबवली गेली याचं एकमेव कारण म्हणजे त्यातील माणसांची आणि इतर यंत्रणांचीही सुरक्षितता. प्रचंड निधी खर्चून असे प्रकल्प हाती घेतले जातात त्या वेळी त्यांच्या यशस्वी उड्डाणाबरोबरच यशस्वी अंतराळ प्रवासाचा आणि यान समानव असेल तर परतीच्या प्रवासाचा क्षणाक्षणाचा आराखडा तयार असावा लागतो. काही क्षणांची गफलत एखादं यान भरकटवू शकते किंवा नष्ट करू शकते.
गेल्या 11 एप्रिल रोजी चंद्राभोवती फेऱ्या मारून परतलेल्या ‘ओरायन’ यानाने चार अंतराळयात्रींसह पॅसिफिक महासागरात सॅन डिअॅगोजवळ यशस्वी जलावतरण केलं. त्यासाठी ‘स्प्लॅश डाऊन’ हा शब्द रुढ झालाय. कारण काही हजार किलोमीटरच्या वेगाने येणारी ‘कॅप्सूल’ सागरपृष्ठावर धडकते तेव्हा अर्थातच जे पाणी उसळतं तो ‘स्प्लॅश’ मोठा असतो. अमेरिकेच्या मर्क्युरी, जेमिनी, अपोलो, ओरायन, स्पेसएक्स, ड्रगन वगैरे अंतराळातून पृथ्वीवर परतलेल्या ‘कुप्या’ (कॅप्सुल) अशाच प्रकारे ‘स्प्लॅशडाऊन’ करत पाण्यात उतरल्या.
परंतु अंतराळातून अवनी अवतरणाचं रशियन तंत्र अमेरिकेपेक्षा निराळंच. त्याचं सोयुझ, तसंच चीनचं शेनझॉऊ आणि रशियाची इतरही अनेक अंतराळयानं पृथ्वीवर परतताना जलावतरण न करता वाळवंटात उतरली. काही रशियन अंतराळयात्रींनी ठरावीक वेळी घट्ट भूपृष्ठावर पॅऱ्याशूटच्या सहाय्याने अवतरण केलं.
यापेक्षा वेगळा आणि तिसरा मार्ग म्हणजे अंतराळात जाऊन पृथ्वीवर परतताना विमानासारखं ‘रन-वे’ किंवा धावपट्टीवर उतरणं. अमेरिकेची ‘स्पेस-शटल’ मोहीम त्याचाच भाग. उद्या सर्वसामान्य माणसांना अंतराळात नेऊन आणायचं असेल तर उड्डाण आणि अवतरण (लॅण्डिग) सोपं असायला हवं तरच ‘प्रवासी’ न धास्तावता या प्रवासाला तयार होतील. स्पेस-शटल ही संकल्पना कालांतराने सर्वच देशांत वापरली जाईल. अर्थात चंद्रावर जाऊन परतणाऱ्या ‘स्पेस-शटल’चं अवतरण पृथ्वीवर कसं होईल ते त्या वेळी प्रयोगांती ठरेल.
पुढच्या वर्षी (2027) 4 ऑक्टोबरला माणसाने अंतराळात यान पाठवलेल्या पहिल्या प्रवासाला 70 वर्षे पूर्ण होतील. या काळात आपण म्हणजे माणसाने बरंच काही अंतराळात धाडलंय. काही वेळा तर पृत्रिम उपग्रहांच्या गर्दीचं आणि निकामी उपग्रहांच्या ‘डेब्री’ किंवा कचऱ्याचं काय करायचं असा प्रश्न पडतोच. अशा अडचणी असल्या तरी ‘स्पेस ट्रव्हल’ आता स्वप्नातून सत्यात येणार हे नक्की!






























































