मोरपंखी अनुवादक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

अनुवाद म्हणजे निव्वळ भाषांतर नव्हे. दोन भाषा, संस्कृतींमधील ते एक स्थित्यंतर, एकत्रिकरण असते. म्हणूनच अनुवाद आणि अनुवादक यांनाही साहित्य क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. कवी अस्लम मिर्झा हे त्यापैकीच एक मान्यवर नाव. त्यांच्या ‘मोरपंख’ या उर्दूत अनुवादित कवितासंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.

अनुवाद दोन भाषांना, संस्कृतींना जोडण्याचे काम करतो; तर अनुवादक हा दोन भाषांत सेतू बांधणारा असतो. त्याच्या अनुवाद कार्यामुळे दोन्ही भाषा वाङ्मयसमृद्ध होतात. त्या त्या भाषेतील शब्दांची देवाण-घेवाण होते. अर्थात अनुवादकासाठी हे काम सोपे नसते. एकेक शब्द गुंफावा लागतो. परकायाप्रवेश यानुसार कवितांचे अनुवाद तर त्या त्या कवींची प्रकृती पाहून करावे लागतात. अनुवाद करणे म्हणजे नवीन आयुष्य जगण्यासारखे असते. मूळ आशयाला धक्का न लावता अनुवाद करणे आणि तो वाचकांना पसंत पडणे ही अनुवादकासाठी तारेवरची कसरतच असते. अशी कसरत संभाजीनगरातील पेशाने वकील असलेले कवी, अनुवादक तथा मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी साहित्याचे अभ्यासक ऍड. अस्लम मिर्झा वयाच्या 75व्या वर्षीही करीत आहेत. व्यवसायाने अभियंता असलेल्या अकोला येथील कवी प्रशांत असनारे यांच्या ‘मीच माझा मोर’ या कवितासंग्रहाचा मिर्झा यांनी उर्दूत 2017 साली ‘मोरपंख’ या नावाने अनुवाद केला आणि त्यास यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार लाभला.

अनुवाद कार्यासोबतच मिर्झा यांचे समीक्षा, शोध निबंध आणि शायरी या क्षेत्रांत लक्षणीय कार्य आहे. मिर्झा मूळ नगरचे. व्यवसायाच्या निमित्ताने वीसेक वर्षे मुंबईत आणि 1977/78 पासून वास्तव्यास संभाजीनगरात आहेत. मिर्झा यांना आपल्या आवडीच्या कार्यास घरातच पोषक वातावरण लाभले. मिर्झा यांनी 9 वीच्या वर्गात असतानाच गझलचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. हाच प्रवास पुढील काळात विविध टप्प्यांवर विस्तारला. अस्लम मिर्झा यांची ‘आईना-ए- मानिनुमा’, ‘इत्र-ए-गुल-ए-मेहताब’, ‘गुलदास्ता-ए-खुराबास’ ही संशोधनात्मक लेखनाची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘गीले पत्तोsं की मुस्कान’ हा कविता संग्रह तसेच ‘हम जंजीर में रहते है’, ‘लुकनात’, ‘पश्तों के अवाबी नगमे’ आदीं उर्दू भाषांतरित कवितांची पुस्तके आहेत. ‘सिराज औरंगाबादी (जीवन व्यक्तित्व आणि संकलित गझल हे पुस्तक गतवर्षी प्रकाशित झाले. ते सांगतात, ‘‘उर्दूत मी अन्य साहित्य प्रकारात लिहीत असलो तरी माझ्यासाठी अनुवादाचे क्षेत्र हे अधिक आवडीचे आहे. याच आवडीमधून मिर्झा यांनी मराठीतील पाचशेच्या वर कवींच्या कविता उर्दूमध्ये अनुवादित केल्या. ज्ञानेश्वरीतील ओव्या, समर्थ रामदासस्वामींचे मनाचे श्लोक (मनसमझावन), संत नरहरी सोनार यांचे अभंग उर्दूत नेले. संत ज्ञानेश्वरांच्या ओवीतील काही शब्द पर्शियन असून त्याचा दाखला म्हणून ‘अंगुष्ठरी’ या शब्दाचा उल्लेख करतात. मराठीतील कितीतरी कवींच्या कविता मिर्झा यांनी उर्दूत अनुवादित केल्या.

मिर्झा यांनी धाराशीव येथील कवी डी.के. शेख यांच्या ‘दंगल आणि इतर कविता’चाही अनुवाद उर्दूमध्ये ‘फसाद और दिगर नजमें’ या नावाने नुकताच केला आहे. अशाच कवींमध्ये मिर्झा यांचा अकोला येथील कवी प्रशांत असनारे यांच्याशी परिचय झाला. त्यात असनारे यांचा ‘मीच माझा मोर’ हा कवितासंग्रह 2010 मध्ये प्रसिद्ध झाला. त्याला तब्बल अकरा पुरस्कार मिळाले. 2017 मध्ये मिर्झा यांनी त्याचा उर्दूत अनुवाद केला तो ‘मोरपंख’ नावाने प्रसिद्ध झाला. ‘मीच माझा मोर’ या कवितासंग्रहात असनारे यांनी माणसाचे बोलणे आणि प्रत्यक्षात जगणे यातील अंतर नेमकेपणाने टिपले आहे. हरवत चाललेल्या माणुसकीचा शोध घेत माणुसकी अधोरेखित केली आहे आणि त्यांच्या कवितेने समाजाच्या दांभिकतेवरही प्रहार केले आहेत. एकूण 80 कविता संग्रहात समाविष्ट आहेत. संवेदनशील मनास अस्वस्थ करणाऱया या संग्रहाचा भावानुवाद मिर्झा यांनी सक्षमपणे उर्दू भाषेत केला आहे. तोच हा संग्रह, ज्याला अनुवादाचा साहित्य अकादमीचा सन्मान लाभला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार घोषित झाल्यानंतर मिर्झा यांनी कृतज्ञता व्यक्त केली; आनंद व्यक्त केला. उर्दूचा जन्मच महाराष्ट्रात झाला असून मराठी व उर्दू या दोन्ही भाषांचा परस्परांवर प्रभाव असल्याचे सांगितले. या दोन भाषा-भगिनी असून त्यांनी यानिमित्ताने दोन्ही बहिणींना अधिक जवळ आणण्याचे काम करतो असे नमूद केले.

[email protected]