बुलबुल तरंग

126

>> विद्या कुलकर्णी

छोटासा… देखणा… बुलबुल आनंदात कसं जगावं हे आपल्याला सहज शिकवून जातो.

बुलबुल हे पक्षी आपल्याकडे शहरात, ग्रामीण भागात अतिशय सहजपणे दृष्टीस पडतात. बुलबुल लहान आकाराचे पक्षी असून त्यांच्या सुमधुर आवाजासाठी ओळखले जातात. विशेष म्हणजे फक्त नरच मादीला आकर्षित करण्यासाठी गातात.

जगामध्ये बुलबुल पक्ष्यांच्या 140 प्रजाती आहेत. हे पक्षी गटागटाने राहणारे, गोंगाट करणारे, मुख्यत्वे फिक्या रंगांचे, लांब, मऊ आणि हलक्या पिसांचे असतात. यांची चोच लहान ते मध्यम आकाराची आणि थोडी बाकदार असते. पाय लहान असून तुलनेने अशक्त असतात. पंख लहान आणि गोल असून शेपटी लांब असते. बुलबुल नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. हिमालयन बुलबुल, काळा हिमालयन बुलबुल आणि पहाडी बुलबुल. या तिन्ही प्रजाती ‘डोक्यावरचा तुरा सोडल्यास’ रंगरूपाने दिसावयास भिन्न आहेत. त्यांचे राहणीमान, त्यांच्या सवयी, प्रजनन मात्र बरेचसे सारखे असते. हे सर्व फोटो मी सत्ताल-उत्तराखंड येथे काढले.

हिमालयन बुलबुल – हे बुलबुल त्यांच्या गालावर पांढरा पट्टा असल्याने पांढऱया गालाचा बुलबुल म्हणून ओळखले जातात. डोक्यावर बाकदार तुरा असून डोके तपकिरी रंगाचे असते. डोळय़ाभोवती काळे वर्तृळ असते. गळा व हनुवटी काळय़ा रंगाची असते. गळय़ाच्या बाजूला चमकणारा पांढरा पट्टा असतो. लांब तपकिरी शेपटी व त्याच्या टोकावर पांढऱया रंगांची पखरण असते. चोच व पाय काळय़ा रंगाचे असतात. हे जोडीने अथवा छोटय़ा गटाने राहतात. काळा हिमालयन बुलबुल – प्रदेशानुसार त्यांच्या अंगाचा रंग राखाडी ते काळा चमकदार असतो. चोच व पाय नारिंगी रंगाचे असतात. डोक्यावर पिसारलेल्या काळय़ा केसांचा तुरा असतो. या पक्ष्यांचा आवाज कर्कश्य असून मध्येच शीळ घातल्यासारखा तर कधी किलबिलाटासारखा असतो.
पहाडी बुलबुल – त्यांच्या अंगावर निसर्गाने अनंत रंगांची उधळण केलेली आहे. तेजस्वी ‘हिरवट, तांबूस, तपकिरी’ असे यांचे रूप बघून आपण अवाक होतो. चोच लांब असून मजबूत असते. या पक्ष्यांची साद देवळातील घंटा वाजवल्याप्रमाणे असते.

राहणीमान व प्रजनन
या पक्ष्यांचे प्रमुख अन्न फळे, कीटक, फुलांच्या कळय़ा, फुलांतील मधुरस असे असते. नर-मादी दोघेही झाडावर कमी उंचीवर, फांदीच्या बेचक्यात कपाच्या आकाराचे गोलाकार घरटे विणतात. हे घरटे झाडांची मुळे, पाने यापासून बनवलेले असते आणि आतमध्ये पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी कापूस, कोळय़ाची जाळी असे तलम अस्तर वापरलेले असते. मादी साधरणतः 3 किंवा 4 अंडी घालते. अंडी फिकट गुलाबी रंगाची असून त्यावर गडद लाल रंगाचे ठिपके असतात. नर-मादी दोघेही बारा दिवस अंडी उबवण्याचे आणि पिल्लांचे संगोपन करण्याचे काम बरोबरीने करतात. या जातीतील इतर पक्ष्यांप्रमाणेच यांची पिल्ले जन्मजात पिसेविरहीत आणि डोळे बंद असलेली असतात. पिल्लांच्या जन्मानंतर नर आणि मादी बुलबुलांचे हावभाव बदललेले दिसतात. अगदी पाच-पाच मिनिटांनी दोघेही आलटूनपालटून बाहेर जातात आणि पिल्लांसाठी चोचीत किडे, छोटीशी फळे घेऊन येतात. माता-पिता-पिल्लांचा ममतेचा झरा घरटय़ात वाहत असतो. पिल्ले 9-11 दिवसांची झाली की घरटय़ातून बाहेर उडू लागतात. उंदीर, मांजर, साप, पाली, शिकारी पक्षी हे या पक्ष्यांचे नैसर्गिक शत्रू आहेत.

बुलबुल पक्ष्यांचे आयुष्य फक्त तीन वर्षे असते, पण आयुष्यभर ते त्यांच्या गाण्याने सर्वांना आनंद देतात. बुलबुल हे जात्याच चंचल प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांचे फोटो काढणे हे एक आव्हानच होते. या पक्ष्यांचे विविध रंग व लकबी माझ्या कॅमेरात टिपताना ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी माझ्या मनाची अवस्था होऊन गेली.

आपली प्रतिक्रिया द्या