श्री दत्त पादुका असलेले राजस्थानचे ‘गुरूशिखर’

>> निळकंठ कुलकर्णी

श्री गुरुदेव दत्त

अरवली हा हिंदुस्थानातील सर्वात प्राचीन पर्वत आहे. तो राजस्थानात नैर्ऋत्य – ईशान्य पसरलेला आहे. नैर्ऋत्य भागात ‘माऊंट अबू’ (अबूपर्वत) हे या पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची सुमारे 1700 मीटर आहे. त्याला ‘ गुरुशिखर असे म्हणतात. हे शिखर अबूपासून सात मैलांवर आहे. अबूपासून पाच मैलांवर व 500 फूट अधिक उंचीवर ‘ओरिया’ या नावाचे गाव आहे. हे ‘गुरुशिखराच्या’ मुख्य टोकाखाली स्थित झालेले आहे. या गावापासून गुरुशिखर तीन मैलांवर आहे. अबुपेक्षा हे अधिक थंड असून या ठिकाणी हिंदू व जैनांची मंदिरे आहेत. या ठिकाणी ‘कंखलेश्वर’ महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.

ओरियापासून थोड्या अंतरापर्यंत रस्ता आहे, परंतु त्यापुढे अशी पाऊलवाट (पगदंडी) सुरू होते, ती पर्वतावरून आणि नाल्यातून गुरूशिखरपर्यंत जाते. चढाव जरा जास्त आणि अवघड आहे. श्री भगवान दत्तात्रेयांनी या स्थानी निवास केला होता. त्या स्मरणार्थ खडकांच्या शिळेवर कोरलेल्या पादुका या शिखरावर एका लहानशा मंदिरात स्थापण्यात आल्या आहेत. या ठिकाणी मोठ्यात मोठी अशी घंटा असून तिचा आवाज फार दूरपर्यंत ऐकू येतो.

या शिखरावर महान योगींनी तपश्चर्या करण्यासाठी वास्तव्य केलं होतं. या ठिकाणी हिंसक प्राणी आहेत. हे शिखर उंचावर असल्याने दूरपर्यंतचा परिसर नजरेला पडतो. दूरचे घनदाट जंगल हिरवळ तसेच वृक्षराजी व शितील वाऱ्याच्या मंद मंद लहरी मनाला आनंदित करतात. या ठिकाणी अनेक यात्रेकरू येतात. रस्ता जरा कठीण असल्याने यात्रेकरूंच्या रक्षणासाठी एक पोलीस शिपाई सकाळ सायंकाळ ओरिया गावापर्यंत येतो. ओरियापासून मार्गदर्शक घेणे अधिक हितावह आहे.

या ठिकाणी यात्रेकरूची धर्मशाळा आहे. तसेच कित्येक गुहा पण आहेत. या ठिकाणी राहत असलेले संत साधू यात्रेकरुच्या व्यवस्थेची पूर्ण काळजी घेतात. येथे साधू संन्याशाना तसेच गरीब माणसांना मोफत भोजन देण्यात येते. येथे एक सुंदर विहीर व बाग आहे. हिंदू धर्माचे उद्धारक रामानंद याच्या पण पादुका येथे आहेत. याठिकाणी श्रीमंत तुकडोजी महाराज होळकर यांना श्रीस्वामी समर्थ (अक्कलकोट) यांनी दर्शन दिले आहे.

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या