गृहकर्जाची मुदतपूर्व – परतफेड आणि नियोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक कुळकर्णी

बरेच गृहकर्जदार त्यांच्या गृहकर्जाच्या संपूर्ण मुदतीअंतापर्यंत न थांबता परतफेड करतात. जेव्हा गृहकर्जदार अशाप्रकारे मुदतपूर्व त्यांच्या कर्जाची रक्कम फेडतात तेव्हा धनको वित्तसंस्थेच्या नफा क्षमतेवर विपरीत परिणाम होत असतो. म्हणूनच मुदत पूर्ण होण्याआधी कर्ज फेडताना त्या त्या वित्तसंस्थांच्या अशा परतफेडीबाबतच्या अटी आणि शर्ती समजून घेणे आवश्यक ठरते.

बरेच गृहकर्जदार त्यांच्या गृहकर्जाच्या संपूर्ण मुदतीअंतापर्यंत न थांबता परतफेड करतात. जेव्हा गृहकर्जदार अशाप्रकारे मुदतपूर्व त्यांच्या कर्जाची रक्कम फेडतात तेव्हा धनको वित्तसंस्थेच्या नफा क्षमतेवर विपरीत परिणाम होत असतो. म्हणूनच मुदत पूर्ण होण्याआधी कर्ज फेडताना त्या त्या वित्तसंस्थांच्या अशा परतफेडीबाबतच्या अटी आणि शर्ती समजून घेणे आवश्यक ठरते. गृहकर्जाची रक्कम आणि कर्जाचे हप्ते कर्जदारास कायम ताणतणावयुक्त वाटतात. या परतफेडीचे नेमके नियोजन केले तर ते गृहकर्जदारास आर्थिकदृष्टय़ा लाभकारी आणि मनशांतीदायी ठरते. हे नियोजन खरे तर गृहकर्ज स्वीकारतानाच सुरू होते.

बहुसंख्य लोक 20 वर्षे मुदतीचे कर्ज मिळत असतानाही 10 किंवा 15 वर्षांची मुदत स्वीकारतात, परंतु 20 वर्षांचे कर्ज 13 ते 10 वर्षांत 15 वर्षांचे कर्ज नऊ ते सात वर्षांत फेडता येणे नियोजनाने शक्य होते. जेव्हा आपण 20 वर्षे मुदतीचे गृहकर्ज स्वीकारतो तेव्हा पहिल्या वर्षी भरलेल्या 12 समान मासिक हप्त्यांच्या हिश्श्यात गृहकर्जावरील व्याजाचा घटक 91-92 टक्के असतो तर उर्वरित 8-9 टक्के हिस्सा गृहकर्जावरील मुद्दलाच्या घटकाचा असतो. दुसऱया, तिसऱया व चौथ्या वर्षी अनुक्रमे 90 टक्के व 10 टक्के, 88 टक्के व 12 टक्के आणि 87 टक्के व 13 टक्के आढळते अर्थात बँक आणि वित्त संस्थेनुसार यात थोडा बदल दिसून येत़ो 20 वर्षांच्या कर्जाच्या बाबतीत गृहकर्ज फेडीचा ‘ब्रेक इव्हन पॉइंट’ साधारणतः चौदाव्या किंवा पंधराव्या वर्षी असतो. याचाच अर्थ मुद्दलाचा घटक आणि व्याजाचा घटक समप्रमाणानजीक असतात. उदा. 41 टक्के-59 टक्के किंवा 45 टक्के – 55 टक्के. ‘ब्रेक इव्हन पॉइंट’ जितक्या लवकर येईल तितकी तुमच्या व्याजाच्या परतफेडीच्या रकमेत मोठी बचत होते. पहिल्या वर्षी मुद्दलाच्या घटकाची असलेली नऊ-दहा टक्के रक्कम समान मासिक हप्त्याव्यतिरिक्त मुद्दलाची अंशात्मक परतफेड म्हणून भरली असता तुमचे 12 समान मासिक हप्ते कमी होऊ शकतात. दुसऱया वर्षाच्या मुद्दलाच्या हिश्श्याची रक्कम एकरकमी जादा भरली तर अजून 12 किंवा 13 हप्ते कमी होऊ शकतात. अशाप्रकारे 20 वर्षे मुदतीचे कर्ज घेऊन एकीकडे व्याज आणि मुद्दलाच्या फेडीवर आयकराचा लाभ उठवत गृहकर्जाची परतफेड अवघ्या 10 वर्षांपर्यंत करता येते. ज्या वेळी रिझर्व्ह बँक रेपो दरात घट करते त्या वेळी बहुसंख्य बँक्स आणि वित्त संस्था त्यांच्या विविध कर्जावरील व्याजदरात कपात करतात. अशा वेळी त्वरित ज्या बँकेकडून किंवा वित्त संस्थेकडून गृहकर्ज घेतले आहे त्यांच्याकडून कमी झालेल्या व्याजदर त्वरित लागू करण्यासाठी गृहकर्जाच्या शिल्लक रकमेच्या साधारणतः पाव टक्के मुद्रांक शुल्क भरून नवीन व्याजदराने शिल्लक कर्जाच्या परतफेडीची आखणी करावी. अर्थातच जर व्याजदरातील कपात किमान अर्धा टक्का असेल तरच असे करणे उपयुक्त ठरते. या प्रक्रियेत देय समान मासिक हप्त्यांची कपात होऊन कर्ज लवकर फेडण्यास मदत होत असते. त्यासाठी तुमचे गृहकर्ज बदलत्या व्याजदरावरच (Variable Rate of Interest) असणे यासाठी आवश्यक असते.

गृहकर्जाच्या परतफेडीची मुदत जर 15 वर्षे असेल तर पहिल्या, दुसऱया, तिसऱया व चौथ्या वर्षी व्याजाचा हिस्सा व मुद्दलाचा हिस्सा अनुक्रमे 82 टक्के व 18 टक्के, 80 टक्के व 20 टक्के, 78 टक्के व 22 टक्के आणि 76 टक्के व 24 टक्के समान मासिक हप्त्यात असतात. पहिल्या वर्षीच 15 टक्के मुद्दलाची एकरकमी अतिरिक्त परतफेड केली तर 12 समान मासिक हप्ते कमी होऊ शकतात. याप्रमाणे परतफेडी करून 15 वर्षे मुदतीचा ‘ब्रेक इव्हन पॉइंट’ जो सातव्या वर्षी अंदाजे येतो तो लवकर येऊन आपले 15 वर्षे मुदतीचे कर्ज सात ते नऊ वर्षांत पूर्णतः फेडले जाऊ शकते. अर्थात हे नियोजन करण्यासाठी ज्या बँक किंवा वित्त संस्थेकडून गृहकर्ज घेतले आहे त्यांच्याकडून संपूर्ण कर्जाच्या मुदतीतील समान मासिक हप्त्यांचे ईएमआय वेळापत्रक (Schedule) दिले जात असते. जर ते दिले नाही तर कर्जदाराने ते मागून घेणे आवश्यक ठरते. या वेळापत्रकांवरून कर्जदाराला दरवर्षीचे समान मासिक हप्त्यातील मुद्दल आणि व्याजाचे प्रमाण लक्षात येऊन स्वतःच्या कर्जफेडीचे नियोजन करता येते.

ज्या महिन्याच्या विशिष्ट तारखेस ही संपूर्ण परतफेड करावयाची आहे त्या तारखेस अंदाजे शिल्लक कर्जाची मुद्दल आणि शिल्लक देय व्याज किती असू शकेल याचा नेमका अंदाज काही दिवस आधी घ्यावा. शक्यतो समान मासिक हप्ता (EMI) ज्या तारखेस देय असतो त्या तारखेच्या किमान तीन-चार दिवस आधी हा अंदाज घ्यावा. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शिल्लक कर्ज आणि त्यावरील व्याजाचा एकत्रित चेक देऊन आपल्या घराची मूळ कागदपत्रे घेण्यास कधी यायचे ते विचारावे. सर्वसाधारणपणे आपण दिलेला चेक वटल्यानंतर म्हणजे चार-पाच दिवसांनी धनको वित्त संस्था कागदपत्रे नेण्यास बोलावतात. ज्या दिवशी ही कागदपत्रे घ्यायची असतात त्यावेळी आपण जर कर्ज घेताना त्या वित्त संस्थेला घरासंबधित कोणकोणती कागदपत्रे तारण म्हणून आणि अनुषांगिक सुरक्षा म्हणून दिली आहेत याची केलेली यादी किंवा वित्त संस्थेने त्यांच्याकडे स्वीकारलेल्या यादीची पावती सोबत घेऊन जावी. सर्वप्रथम वित्त संस्था त्यांच्या कर्जाची परतफेड केल्याने तारण करार रद्द केल्याचे पत्र देते. त्यासोबत ना हरकत प्रमाणपत्र गृहनिर्माण संस्था तसेच अन्य कारणासाठी देते. जर कर्जदाराकडून स्वीकारलेले पुढील दिनांकित (Post dated) काही चेक्स असतील तर तेसुद्धा परत केले जातात. वित्त संस्थेकडून यादीनुसार प्रत्येक कागदपत्राची शहानिशा करून आपल्या घराची सर्व मूळ कागदपत्रे स्वीकारल्याच्या पत्रावर सही करून घेतले जाऊन त्याची एक प्रत आपल्याला दिली जाते.

वित्त संस्थेने दिलेले तारण रद्द केल्याच्या पत्राचे दोन झेरॉक्स प्रती काढून एक प्रत ज्या गृहनिर्माण संस्थेत घर आहे तिला द्यावी. ती प्रत आणि आपले पत्र सोबत जोडून गृहनिर्माण संस्थेच्या सचिव किंवा तत्सम जबाबदार पदाधिकाऱयाकडून त्याची पोच घ्यावी. जर विमा पॉलिसीज, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे वगैरे अनुषंगिक तारण ठेवलेली कागदपत्रे वेगळी काढून विमा कंपनीला वित्त संस्थेने दिलेले पत्र देऊन पॉलिसीवरील आपला हक्क प्रस्थापित करतानाच रद्द झालेले नामांकन पुन्हा करण्याची प्रक्रिया त्वरित करावी. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राबाबत संबधित पोस्टात वित्त संस्थेने दिलेले पत्र देऊन स्वतःचा हक्क प्रस्थापित करावा.

[email protected]