
रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टरचा उजवा हात म्हणजे परिचारिका. रुग्णांची अखंड सेवा हेच त्यांचे व्रत. कोविड योद्धा म्हणून त्याही या लढाईत उतरल्या आहेत.
सुरक्षित कपडे, मास्क आणि ग्लोव्हज् परिधान करून डॉक्टरांच्या बरोबरीने कोरोना रुग्णांना मानसिक आधार देणं, त्यांचा औषधोपचार पाहणं, त्यांची काळजी घेणं या सर्व सेवा आपल्या परिचारिकांनी मनापासून कोरोना काळात केल्या. आजही करत आहेत. सुरुवातीला अत्यंत भीतीचे वातावरण होते. तरीदेखील स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता त्या रुग्णांकरिता लढत होत्या. कुटुंबाचे रक्षण व्हावे म्हणून या काळात काही परिचारिका आपल्या परिवारापासून दूरही राहिल्या. दररोज विविध आव्हानांचा सामना करत स्वतःबरोबर इतरांचे मनोबल टिकवून ठेवण्यात यशस्वी झालेल्या कस्तुरबा रुग्णालयातील परिचारिका विनया साटम यांचा अनुभव…
रुग्णांना मानसिक आधार देता आला…
कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यावर औषधोपचारांबरोबरच त्याचं मानसिक धैर्य टिकून राहणं आवश्यक असतं. याकरिता आम्ही आलेल्या रुग्णांना घाबरू नका असं सांगतो. त्यांची भीती दूर होईल हे पाहतो. कारण रुग्ण घाबरलेले असतात. त्यांची भीती जाणं महत्त्वाचं असतं. त्याकडे लक्ष ठेवावं लागतं. कोरोनाचं प्रमाण जास्त नसेल तर ऍण्टिबायोटिक, सिरप, गरम पाणी, वाफ घेणे अशी उपचारांची सुरुवात होते. आता सध्या रुग्ण बरे होऊन घरी जातायत. मार्च महिन्यात हे प्रमाण जास्त होतं.
पीपीई किट, मास्क, ग्लोव्हज्, सॅनिटायझरचा वापर आम्ही कटाक्षाने करतोच. मगच कोरोना रुग्णाजवळ जातो. कस्तुरबा रुग्णालयापासूनच कोरोना रुग्णांच्या उपचारांची सुरुवात झाली. तरीही अगदी सुरुवातीला आमच्याही मनात भीती होती, पण त्या रुग्णांबरोबर काम करत असताना त्यांना धीर देऊन आम्हाला बळ मिळालं.
शासनाकडून आम्हाला काही कमी पडलं नाही. संरक्षणाच्या वस्तू म्हणजे पीपीई किट, मास्क, ग्लोव्हज् हे सारंच आवश्यक त्या प्रमाणात मिळालं. आयसीयू विभागात काम करण्याची संधी मिळाली. आता लोकही सजग झाले आहेत. स्वतःची काळजी घेऊ लागले आहेत.
मला एक लहान मुलगा आहे. त्यामुळे मुलासाठी रोज घरी यावं लागायचं. घरी आल्यावरही इतरांना, स्वतःला त्रास होऊ नये याकरिता काळजी घ्यायचे. हॉस्पिटल आणि घरचे कपडेही वेगवेगळे ठेवले आहेत. घरी आल्यावर आधी अंघोळ करून मगच घरात वावरते.
सध्याच्या काळात केव्हाही काहीही होऊ शकतं. या काळात इतरांचा आधार होणं, त्यांना मानसिक बळ देणं गरजेचं आहे हे मला या दिवसांत शिकायला मिळालं. आधी आम्हालाही भीती, नैराश्य यायचे, पण रुग्णांची काळजी घेताना आमची भीतीच निघून गेली. मास्क, ग्लोव्हज् आणि सॅनिटायझरचा सुयोग्य वापर आपण सगळ्यांनीच करायला हवा. शेजाऱयांनीही मला सहकार्य केले. करी रोड साफल्य इमारतीत मी राहते, तिथल्या रहिवाशांनी माझा सत्कार केला तेव्हा खूप आनंद मिळाला.


























































