
>> प्रवीण दाभोळकर
जिथे सोशल मीडियाबाबत नेहमी टीकेची झोड उठवली जाते तिथेच काही स्वयंसंस्थांच्या चांगल्या उपक्रमाची बीजंही रुजली गेली आहेत. फॅण्ड्री फाऊंडेशन ही त्यापैकीच एक संस्था. आदिवासी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या विकासासाठी सर्वतोपरी सहाय्य करणाऱया या संस्थेकडून जून-जुलैच्या कालावधीत पाडय़ावरील मुलांसाठी शालेय साहित्य पुरवले जाते. विशेष म्हणजे या उपक्रमांमध्ये तरुणवर्ग जास्तीत जास्त सहभागी झालेला दिसून येतो.
फॅण्ड्री फाऊंडेशन ही संस्था गेल्या पाच वर्षांपासून आदिवासी पाडय़ातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य करत आहे. या संस्थेद्वारे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आदिवासी पाडय़ावरील मुलांच्या शिक्षणासाठी राबवण्यात येणाऱया उपक्रमास सोशल मिडियाद्वारे आवाहन केले जात आणि याला चांगला प्रतिसादही लाभतो. जिथे सोशल मिडियाबाबत नेहमी टीकेची झोड उठवली जाते तिथेच अशा काही चांगल्या उपक्रमाची बीजंही रुजली गेली आहेत, हे विशेष. म्हणूनच फॅण्ड्री फाऊंडेशनच्या अनेक उपक्रमांमध्ये तरूणवर्ग जास्तीत जास्त सहभागी झालेला दिसून येतो. तरुणाईच्या ऊर्जेला सकारात्मक वळण देणाऱया फॅण्ड्री फाऊंडेशनचा बोलबाला मे-जून-जुलैमध्ये अधिक असतो.
पाच वर्षांपूर्वी पाच मित्रांनी गरीब, गरजूंना कपडे देण्याचे आवाहन फेसबुकवर केले. त्यानंतर सोशल मीडियातील सजग तरुण पुढे सरसावले. कपडय़ांसोबतच शैक्षणिक साहित्यही देऊ केले. पहिल्याच उपक्रमात सोशल मीडियातील साधारण 60 जणांनी प्रत्यक्ष सहभाग दर्शवला. ‘फॅन्ड्री’ सिनेमातून प्रेरित होऊन ठाण्यात राहणाऱया रवी चाचे यांना ही संकल्पना सुचली. आता दीडशेहून अधिक ऍक्टिव्ह सदस्य असून संस्था नोंदणीकृत आहे. डहाणू, इगतपुरीसोबतच कोल्हापूर, रत्नागिरी अशा ठिकाणी संस्थेचे स्वयंसेवक आहेत. यात कोणीही व्यक्ती पगारावर काम करत नाही. सर्व कार्यक्रम व्हॉटस्ऍप ग्रुपवर ठरतात. वेगवेगळय़ा क्षेत्रांत काम करणारे स्वयंसेवक आपल्या क्षेत्रातील योगदान संस्थेस देत असतात. त्यामुळे एकमेकांची प्रत्यक्ष भेट कमी होत असली तरी समाजकार्य जोरात सुरू असते.
सध्या ‘प्रोजेक्ट होप’ हा शैक्षणिक उपक्रम सुरू आहे. जानेवारीमध्ये या उपक्रमाबद्दल आवाहन करण्यात आले. याद्वारे वह्या आणि शैक्षणिक साहित्य गोळा करण्याचे आवाहन करण्यात आले. वेगवेगळय़ा ठिकाणी राहणाऱया आणि सहकार्य करू इच्छिणाऱया व्यक्ती संपर्कात आल्या. मुंबईतल्या वेगवेगळय़ा भागात राहणाऱया स्वयंसेवकांनी दात्यांकडे जाऊन स्टेशनरी साहित्य जमा केले. साधारण साडेतीन हजारांहून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळणार आहे. त्यासाठी फॅण्ड्री फाऊंडेशनच्या दीडशेहून अधिक स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभाग नोंदवला.
फॅण्ड्री फाऊंडेशन ही संस्था गेल्या पाच वर्षांपासून आदिवासी पाडय़ातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य करत आहे. तसेच गावकऱयांना स्वयंरोजगारदेखील दिला जात आहे. गावकरी स्वतःच्या पायावर उभे राहिले तर गावाचा विकास करू शकतील या उद्देशाने त्यांना बारमाही पिकांसंदर्भात सहाय्य केले जाते. डहाणूच्या पाडय़ातील गावकऱयांना कडकनाथ कोंबडी पालन करण्यास उद्युक्त करण्यात आले आहे. इगतपुरी येथील कुरुंग किल्ल्याच्या पायथ्याशी कुरुंगवाडी नावाची वस्ती आहे. इथल्या आदिवासी भागालाही स्वयंरोजगारासाठी सहकार्य करण्यात येते. फॅण्ड्री फाऊंडेशनने 99 हॅकर्स ग्रुपच्या मदतीने कुरुंग किल्ला येथे पर्यटन सुरू केले आहे. यामध्ये इथल्या गावकऱयांना सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे एक रोजगाराचा मार्ग खुला झालाय. या ठिकाणी संस्थेतर्फे जांभूळवन तयार करण्यात आले आहे, ज्याचा फायदा गावकऱयांना भविष्यात होणार आहे.
सालाबादप्रमाणे या वर्षीही जानेवारी सुरू झाला आणि फॅण्ड्री फाऊंडेशनच्या सर्व स्वयंसेवकांना प्रोजेक्ट होपचे वेध लागले. वर्ष 2019च्या प्रोजेक्ट होपचे लक्ष्य स्वयंसेवकांना देण्यात आले. ते म्हणजे 6 जिह्यांतील 53 शाळा, ज्यामध्ये साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यासाठी अंदाजे 7.5 लाख इतका खर्च येणार होता. सर्व स्वयंसेवकांचे आपापल्यापरीने प्रयत्न सुरू झाले आणि 15 मे रोजी हे टार्गेट यशस्वीपणे पूर्ण झाले. मुंबई आणि इतर भागांतील नागरिकांनी वह्या आणि पट्टी, पेन्सिल असे इतर शैक्षणिक साहित्य देऊ केले. संस्थेच्या स्वयंसेवकांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन ते गोळा केले. त्यानंतर कळव्यातील एका शाळेत हे साहित्य नेण्यात आले. ज्या ज्या शाळांनी आपल्याकडे गरज नोंदवली होती, त्याप्रमाणे साहित्याचे वर्गीकरण करण्यात आले आणि ठरलेल्या तारखांप्रमाणे सर्व साहित्य त्या त्या शाळांना पोहोचवण्यात आले.
संस्थेकडून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जात असले तरी त्यात शिक्षण घेणाऱया मुलांसाठी उपक्रम राबवणाऱया अधिक भर दिला जातो. गेल्या पाच वर्षांतील संस्थोच्या कार्याचा लेखाजोखा मांडायचा तर संस्थेच्या या कामाचा कितीतरी गावं आणि विद्यार्थ्यांना लाभ झाल्याचे दिसून येते. सहा जिल्हे आणि साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर हास्य फुलवण्याचं, त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचं काम संस्थेने केले आहे. नाशिक, पालघर तालुका, डहाणू, शहापूर तालुका, कोल्हापूर, ठाणे तालुका, रत्नागिरी या जिल्हा व तालुक्याच्या परीघातील अनेक विद्यार्थ्यांना संस्थेच्या उपक्रमांचा लाभ होत आहे. त्यांचं शिक्षण सुकर होण्यास संस्था सर्वतोपरी मदत करत आहे.





























































