
>>माधव गोठोस्कर
सध्या आशिया कपची रंगत तमाम क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळत आहे. क्रिकेटचा थरार हा कुठेही असो हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच ठरतो. मात्र यावेळी या स्पर्धेच्या वेळापत्रकावर नजर टाकल्यास आंतरराष्ट्रीय नियमाला अनुसरून हे सामने होत नाहीत याची प्रकर्षाने जाणीव होते. सर्वसाधारणपणे कोणत्याही स्पर्धेत सुरुवातीला साखळी फेरीच्या आणि नंतर बाद फेरीच्या लढती होत असतात. पण आशिया कपच्या कार्यक्रमानुसार सुरुवातीला जवळपास बाद पद्धतीने सामने खेळवण्यात आले. त्यानंतर आता सुपर फोर या फेरीच्या लढती होताहेत. मात्र या नव्या आराखडय़ामुळे श्रीलंका व हाँगकाँग यांना पुढल्या फेरीत पोहोचण्याची जास्त संधीच उपलब्ध झाली नाही. इतर संघांविरुद्ध त्यांना खेळायलाच मिळाले नाही.
आशिया कपच्या यंदाच्या वेळापत्रकानुसार बांगलादेशला दोन सामन्यांमध्ये चार दिवस, पाकिस्तानला दोन दिवस आणि श्रीलंकेला एक दिवस अशी विश्रांती होती. हिंदुस्थानला मात्र 18 व 19 ऑगस्ट या लागोपाठच्या दिवशी सामने खेळावे लागले. असे का? याचसोबत सर्वसाधारण क्रिकेटरसिकांना असा प्रश्न पडतो की, गेल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी, या वर्षी आशिया कप आणि पुढल्या वर्षी होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थान व पाकिस्तान एकाच गटात कसे? हा योगायोग नव्हे. रसिकांच्या मनात असा विचार येतो की, असे होण्यासाठी काही खास कारण असावे. उदाहरणार्थ या दोन संघांचा निराळय़ा गटात समावेश करण्यात आला, तर कदाचित पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार नाहीत अन् त्यामुळे प्रेक्षकवर्ग येणार नाही म्हणून तर ही तरतूद नसेल ना? आशिया कपमधील हिंदुस्थान – पाकिस्तान सामन्याला स्टेडियम खचाखच भरलेले होते. पण इतर लढतींना मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. रसिकांच्या मनात जे येते त्याला यामुळे पुष्टी मिळाल्यासारखीच आहे.
एमसीसी हे क्रिकेटचे मूलभूत कायदे बनवते आणि आयसीसी स्पर्धेचे कायदे बनवते. काही कायदे अलिखित असतात. उदाहरणार्थ कसोटी आणि प्रत्येक देशांतील रणजीप्रमाणे कौंटी स्पर्धेच्या लढतीत खेळाडू पांढऱया वेशात असतात. तसेच पंच काळी पॅण्ट, पांढरा कोट, टोपी अशा रूपात असतात. वन डे व ट्वेण्टी-20 यामध्ये मात्र चित्र बदललेले दिसते. क्रिकेटच्या झटपट प्रकारात खेळाडू व पंच रंगीत कपडय़ांमध्ये दिसतात. तसेच सीमारेषेबाहेरील पडदेही रंगीत असतात. शिवाय लालऐवजी पांढरा चेंडू यामध्ये वापरण्यात येतो. हे नियम सर्व देशांत पाळले जातात. याचसह साखळी सामने राऊंड रॉबिनप्रमाणे खेळवले जातात. यामधून येणारे चार संघ बाद पद्धतीने खेळतात असा अलिखित नियम आहे, पण आशिया कपमध्ये मात्र सगळं उलटेच झालेलं आहे. असे का?
आशिया कपच्या वेळापत्रकावर कुणी तक्रार केली नाही का? अशा पद्धतीमुळे श्रीलंका व हाँगकाँग यांच्यावर अन्याय झाल्यासारखे वाटते. वेळापत्रकच नव्हे, तर खेळाडूंच्या प्रवासामुळेही ही स्पर्धा चर्चेचा विषय ठरत आहे. श्रीलंकेचा संघ अबुधाबीत होता. त्यामुळे त्यांना प्रवास करावा लागत होता. याबाबत त्यांनी तक्रारही केली होती. शारजासारख्या ठिकाणी आणखी सामने का खेळवले गेले नाहीत. हाही प्रश्नच. शारजा, दुबई व अबुधाबी या ठिकाणी सामने खेळवले असते तर स्पर्धा आणखी आकर्षक ठरली असती. याचा कुणी विचारच करत नाही.
खेळाडूंची दमछाक
हिंदुस्थानचा संघ आगामी काळात मायदेशात वेस्ट इंडीजला भिडणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन दौऱयावर रवाना होणार आहे. आयपीएल व वन डे वर्ल्ड कपही आहेच. एकूणच काय, तर या वर्षी इंग्लंडपासून सुरू झालेला प्रवास पुढच्या जुलैपर्यंत सुरूच राहणार आहे. अशा वेळी खेळाडूंची दमछाक झाल्यास नवल ते काय!
खेळाडूंना घाण्याला जुंपतात
एप्रिल महिन्यातील आयपीएल स्पर्धेनंतर इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. याचा क्रिकेट नियामक मंडळ विचार करणार आहे का? की घाण्याला जुंपतात त्याप्रमाणे खेळाडूंना वेठीला धरल्यासारखे होत नाही ना? हे सर्व सामान्य क्रिकेटरसिकांना संभ्रमात टाकत आहे. तरी याचा पूर्ण विचार करायला हवा.
(लेखक आंतरराष्ट्रीय पंच आहेत.)
summary- article about rules in cricket




























































