स्पेशल व्यक्तीमुळे अंतर्बाह्य बदललो!

शब्दांकन : निनाद पाटील

कोविडच्या दिवसांत एक अनामिक मरगळ प्रत्येकाच्या मनावर आणि सभोवताली होती, पण आयुष्यात आलेल्या एका स्पेशल व्यक्तीला भेटल्यानंतर माझ्यातील निगेटिव्हिटीचा निचरा झाला. मी अंतर्बाह्य बदललो. आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन अधिक स्वच्छ आणि स्पष्ट झाला… सांगताहेत अभिनेते अजय पुरकर.

लॉकडाऊनचे दिवस होते. माझ्या मैत्रिणीचा, केतकी गद्रेचा मला फोन आला. ती म्हणाली, ‘‘माझा आतेभाऊ प्रणव दिवेकर तुझा खूप मोठा फॅन आहे. तुझे काम त्याला प्रचंड आवडते आणि प्रणवला तुला भेटायची इच्छा आहे. मी लगेच भेटण्याची वेळ ठरवली आणि सकाळ-सकाळी प्रणव मला भेटायला आला. ‘‘स्पेशल चाइल्ड आहे आमचा प्रणव.’’ त्याची आई अभिमानाने म्हणाली. ‘‘तो जन्माला आल्यावर डॉक्टरने सांगितले की, खूप कठीण आहे याचे. स्वतःचे स्वतः करू शकेल की नाही, शंका आहे, पण आम्ही जिद्द सोडली नाही. आम्ही म्हटले की, जे विज्ञानाला शक्य नाही ते आम्ही करून दाखवू. फार पुढचा विचार करायचा नाही. आजचा दिवस तो आपला. उद्याचं उद्या. आज जी काही प्रगती होईल ती होईल. खंबीर राहायचे आणि आपल्या मेहनतीत सातत्य ठेवायचे. चिकाटी अजिबात सोडायची नाही. आज प्रणवची चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंगची फॅक्टरी आहे स्वतःची. तो स्वतः वेगवेगळय़ा रेसिपीज बनवतो. चॉकलेट मोल्ड धुतो, भरतो, स्वच्छ पुसून ठेवतो. सारं सारं सांभाळतो.’’ हे सांगताना त्याच्या आईच्या चेहऱयावर एक अवीट गोडवा होता. चॉकलेटमध्ये असतो ना, त्याहून कित्येक पटीने अधिक!

मला येताना आठवणीने तो चॉकलेट घेऊन आला होता. म्हणाला, ‘‘अजय सर, ही चॉकलेटस् शुगरफ्री आहेत. डायबिटीसवाल्यांनासुद्धा चालतात.’’ मला खूप कौतुक वाटले त्याच्या या विचारांचे. बोलण्याच्या ओघात हेसुद्धा कळले की, तो पट्टीचा पोहणारा आहे. विविध देशांत त्याने बक्षिसे मिळवली आहेत. पोहण्यामध्ये एक कठीण प्रकार असतो, ब्रेस्ट स्ट्रोक. त्यामध्ये तो मास्टर आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याने ही कलादेखील अवगत केली आहे.

कोविडच्या दिवसांत एक अनामिक मरगळ प्रत्येकाच्या मनावर आणि सभोवती होती, पण प्रणवला भेटल्यावर माझ्यातील निगेटिव्हिटीचा निचरा झाला. मी अंतर्बाह्य बदललो. एक वेगळीच ऊर्जा, सकारात्मकता माझ्यात रुजवून तो निघून गेला. आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन अधिक स्वच्छ आणि स्पष्ट झाला. असाच एक अनुभव पुण्याच्या एफसी रोडवर आला. तिथे एक हॉटेल आहे, ‘तेरासिन’ आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे तेथील सर्व कर्मचारी हे स्पेशल चाइल्ड आहेत, पण सर्वसामान्य माणसांप्रमाणे ते ऑर्डर घेतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यातला नम्रपणा, इंटरॅक्ट करण्याची अदब, कामाचा उरक…सारं सारं निव्वळ कौतुकास्पद! ही सारी मुलं मला एका वेगळय़ा अर्थाने, किंबहुना सर्वार्थाने स्पेशल वाटतात.

रक्तापेक्षा माणुसकीचे नाते श्रेष्ठ

सिंहगडाच्या पायथ्याशी ‘सार्थक’ नावाचे एक छोटेखानी हॉटेल आहे. अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतले पायगुडे कुटुंब त्यांचे हे हॉटेल चालवतात आणि त्यातून मिळणाऱया नफ्याच्या आधारावर ते चक्क अठरा आजी-आजोबांचा सांभाळ करतात. त्यांच्या डोक्यावर त्यांनी छत्र धरलंय मायेचं, आपुलकीचं, जिव्हाळय़ाचं! इतकं निःस्वार्थीपणे आजकाल रक्ताची माणसंसुद्धा एकमेकांसाठी करत नाहीत. अनोळखी, रक्ताच्या नसलेल्या व्यक्तींच्या सेवेत ते आपले जीवन व्यतीत करत आहेत. आपल्या मेहनतीच्या मिळणाऱया मिळकतीचा ते इतक्या सुंदर रीतीने या निराधार व्यक्तींसाठी विनियोग करतात की, पाहताना आपल्याला अचंबित व्हायला होतं. त्या वृद्धाश्रमात राहत असलेल्या बहुसंख्य वयस्कर व्यक्तींची जीवनकहाणी दुखरी आहे, पण या पायगुडे कुटुंबाने आपल्या परिसस्पर्शाने त्यांच्या वृद्धाश्रमातील साऱया व्यक्तींच्या आयुष्याची संध्याकाळ लोभस, देखणी बनवून ठेवली आहे.