लेख – शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन

आजवर हिंदुस्थानी वायुसेनेपाशी लांब पल्ल्याची हत्यारे, क्षेपणास्त्रे नसल्यामुळे पाकिस्तान व चीनच्या तुलनेत आपली बाजू कमकुवत पडत असे. उच्च दर्जाचे सेन्सर्स, वेपन्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि एअर डिफेन्स, ग्राऊंड सपोर्ट कॅपॅबिलिटी आणि इन डेप्थ स्ट्राईक कॅपॅबिलिटी असणारी राफेल्स हिंदुस्थानी वायुसेनेत दाखल झाल्यामुळे आता परिस्थिती बदलली आहे. ‘शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे’ (शस्त्रच राष्ट्राचे रक्षण करतात) या उक्तीनुसार हिंदुस्थानची संरक्षण क्षमता सक्षम व सुदृढ झाली आहे. त्यामुळे आगामी हवाई युद्धामध्ये आकाशातील वर्चस्व मिळवण्यात आता आपल्या वायुसेनेला ना पाकिस्तानचा अडसर आहे ना चीनची चिंता.

हिंदुस्थानच्या वायुसेनेत दाखल झालेल्या राफेल्समुळे आता हिंदुस्थानच्या भौगोलिक सार्वभौमत्वाकडे डोळे वटारून पाहण्याची हिंमतही कोणी करणार नाही. हिंदुस्थानच्या शत्रूंकडून सीमेवर निर्माण झालेली/केली गेलेली परिस्थिती आणि तेथील संवेदनशील अस्थिरतेला चाप लावण्याचं कामही विमानं करतील. राफेल हिंदुस्थानच्या वायुसेनेत दाखल झाली आहेत आणि यापुढे सीमेवर तुमच्या गमजा चालणार नाही ही या विमानांद्वारे हिंदुस्थानच्या शत्रूंना मिळालेली तडक सूचना असे स्पष्ट प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मध्यंतरी चीन किंवा पाकिस्तानचे नाव न घेता केले होते, ते योग्यच आहे.

आता राफेल लढाऊ विमान अधिकृतपणे हिंदुस्थानी वायुसेनेत दाखल झाल्यावर या मीडियम, मल्टिरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट्सची सामरिक तैनाती हिंदुस्थानी सीमांच्या रक्षणासाठी कशी, कुठे व केव्हा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राफेल विमान त्यांच्या सटीक व अचूक मारक क्षमतेमुळे आकाशात वर्चस्व स्थापन करण्याच्या क्षमतेसाठी वाखाणली जातात. हिंदुस्थानने रशियाकडून सुखोई 30 मार्क 1 विमान खरेदी केल्यानंतर आता राफेलच्या आगमनामुळे आपल्या वायुसेनेत तेवीस वर्षांनंतर पहिल्यांदाच नवी विमाने दाखल झाली आहेत. राफेलची अतितीव्र गतीने हवाई हालचाली करण्याची क्षमता ( हायस्पीड मॅनुव्हरेबिलिटी), कमी जागेतून उड्डाण व लहान जागेत उतरण्याची खुबी (शॉर्ट टेक ऑफ/लँडिंग) आणि एकाच उड्डाणात अनेक कार्य पार पाडण्याची क्षमता (मल्टिरोल टास्किंग/केपेबिलिटी) या गुणांमुळे राफेल्स शत्रूवर भारी पडतात. म्हणूनच हिंदुस्थानी संरक्षणासंदर्भात या विमानांच्या उपस्थितीमुळे आपल्या वायुसेनेच्या मारक क्षमतेत लक्षणीय वृद्धी होऊन राफेल्स सामरिक बाजी पलटवण्याचे (गेम चेन्जर) काम करतील असे संरक्षण तज्ञ म्हणतात.

हिंदुस्थानची राफेल्स, पाकिस्तानची ‘एफ-16’ आणि चीनची ‘जे-20/17’ या विमानांची तुलना केली तर असे प्रत्ययाला येते की, अ) चीनच्या ‘जे-17’ या चौथ्या आणि ‘चेंगडू जे-20’ या पाचव्या जनरेशन विमानाच्या तुलनेत राफेल हे साडेचार जनरेशन विमान असले तरी ‘जे-17/20’ विमानांनी आजमितीला कुठल्याही प्रकारच्या प्रत्यक्ष हवाई युद्धात (रिअल टाईम एरियल कॉम्बॅट) भाग घेतलेला नाही. त्यामुळे कोणीच त्यांच्या प्रत्यक्ष हवाई युद्धातील कामगिरीबद्दल छातीठोकपणे सांगू शकत नाही किंवा खात्री देऊ शकत नाही.

उलटपक्षी, फ्रान्सची राफेल्स अफगाणिस्तान/ लिबिया/माली/इराक/सीरिया येथील हवाई युद्धात तावून सुलाखून निघाली आहेत. ‘जे-20’ विमानांच्या तुलनेत राफेल्समध्ये जास्त प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि इंधन नेण्याची क्षमता आहे. त्यावरील क्षेपणास्त्रे वेगवान जेट विमानांपासून ते लहान ड्रोन आणि क्रूझ मिसाईलपर्यंत सर्वांचा सहजसुलभ वेध घेऊ शकतात. मल्टिमिशन एअरक्राफ्ट असल्यामुळे राफेल्स एका उड्डाण भरारीत चार-पाच वेगवेगळी कार्ये करू शकतात. ‘जे-20/17’मध्ये मात्र ही क्षमता नाही. ते एकावेळी एकच काम करू शकतात; ब) पाकिस्तानच्या ‘एफ- 16’वर पंच्याहत्तर किलोमीटर्स पल्ला असलेली आमराम एअर टू एअर/ग्राउंड मिसाईल्स आहेत, तर राफेलवर शंभर किलोमीटर्स पल्ला असलेली मेटेऑर एअर टू एअर/ग्राऊंड मिसाईल्स आहेत. राफेल आवाजापेक्षा दुप्पट वेगाने तर ‘एफ-16/जे-17’ आवाजापेक्षा केवळ थोडय़ाच जास्त वेगाने उड्डाण करतात. डॉग फाईटसाठी राफेल ‘एफ-16’पेक्षा कितीतरी जास्त कुशल, चपळ आणि उपयुक्त आहे. एक राफेलचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला दोन ‘एफ-16/जे-17’ विमाने वापरावी लागतील. पाकिस्तानकडे असलेल्या ‘जे-17’ विमानांची अवस्था चिनी विमानांसारखीच आहे. राफेल विमान हिंदुस्थानी वायुसेनेत सामील झाल्यानंतर धाबे दणाणलेल्या पाकिस्तानने चीनकडे अत्याधुनिक ‘जे-35’ विमान देण्याची मागणी केली आहे; क) राफेलवर 100-150 किलोमीटर्स पल्ल्याची नजरेआडून डागता येणारी मेटेऑर आणि स्काल्प क्रूझ क्षेपणास्त्रे बसवली असल्यामुळे शत्रूच्या विमानांसाठी ‘ग्रेटर नो एस्केप झोन’ निर्माण होतो.आजमितीला या विमानांचा एकूण कॉम्बॅट फ्लाइंग एक्सपिरियन्स 35,800 तासांचा आहे; ड) चीन/पाकिस्तानच्या 400-550 किलोमीटर्सच्या तुलनेत राफेलची ‘एनिमी ट्रकिंग रेंज’ 780 – 1055 किलोमीटर्स असल्यामुळे चीन/पाकिस्तानमधील लक्ष्य त्यांच्या रडार्सच्या पल्ल्यात न येता ध्वस्त करण्याची क्षमता राफेल्समधे आहे.

नवीन विमानांचे स्वागत आणि वायुसेनेतील समावेश नेहमी याच कार्यप्रणालींतर्गत केला जातो. 29 जून 1985मधे याच प्रकारे विंग कमांडर मसंदच्या नेतृत्वात मिराज विमानांचा समावेश वायुसेनेच्या नंबर 7 बॅटल एक्स स्क्वॉड्रनमधे करण्यात आला होता. त्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला ग्वाल्हेरमधे ब्रिगेड मेजर असताना लाभले होते. त्यामुळे आता अंबाला येथे झालेल्या राफेलच्या समारंभाचे गांभीर्य आणि शूचितेची मला जाणीव आहे. आगामी काळात सर्व 36 राफेल विमाने हिंदुस्थानी वायुसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांची सामरिक शक्ती प्रचंड प्रमाणात वाढेल. हिंदुस्थानचा विचार करता राफेल्स आणि त्याच्या शस्त्र्ाास्त्र्ाांमुळे शत्रूबरोबर कराव्या लागणाऱया हवाई चकमकीच्या संकल्पनेत (एअर टू एअर कॉम्बॅट कॉन्सेप्ट) लक्षणीय बदल होईल. आजवर हिंदुस्थानी वायुसेनेपाशी लांब पल्ल्याची हत्यारे, क्षेपणास्त्रे नसल्यामुळे पाकिस्तान व चीनच्या तुलनेत आपली बाजू कमकुवत पडत असे. उच्च दर्जाचे सेन्सर्स, वेपन्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि एअर डिफेन्स, ग्राऊंड सपोर्ट कॅपॅबिलिटी आणि इन डेप्थ स्ट्राईक केपेबिलिटी असणारी राफेल्स हिंदुस्थानी वायुसेनेत दाखल झाल्यामुळे आता परिस्थिती बदलली आहे. ‘शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे’ (शस्त्रच राष्ट्राचे रक्षण करतात) या उक्तीनुसार हिंदुस्थानची संरक्षण क्षमता सक्षम व सुदृढ झाली आहे. त्यामुळे आगामी हवाई युद्धामध्ये आकाशातील वर्चस्व मिळवण्यात आता आपल्या वायुसेनेला ना पाकिस्तानचा अडसर आहे ना चीनची चिंता.