>> अश्विनी नांदेडकर
रंगभूमी – रंगभूमीचा वैचारिक प्रवासनाटक म्हणजे अभिव्यक्ती, पण या अभिव्यक्तीच्या पलीकडे जाऊन नाटक म्हणजे परिवर्तनाचे मानवीय उन्मुक्त दर्शन आहे. या सिद्धांत अनुसार प्रेक्षक आमच्यासाठी रसिक नाहीत जे केवळ उपभोग घेतील, टाळ्या वाजवतील आणि निघून जातील. तर प्रेक्षक हे आमच्यासाठी पहिले आणि सशक्त रंगकर्मी आहेत जे नाटकाच्या प्रस्तुतीनंतर कलाकारांशी संवाद साधतात. आपले विचार मांडतात. एक ठोस भूमिका घेऊन बाहेर पडतात.
रसिक प्रेक्षक हो… आपल्यासमोर प्रस्तुत होत आहे नाटक…’ अशा घोषणेनंतर पडदा उघडला जातो आणि नाटक सुरू होते. या रटाळ पद्धतीला छेद दिला तो थिएटर ऑफ रेलेवन्स या सिद्धांताने. नाटक म्हणजे अभिव्यक्ती पण या अभिव्यक्तीच्या पलीकडे जाऊन नाटक म्हणजे परिवर्तनाचे मानवीय उन्मुक्त दर्शन आहे. या सिद्धांत अनुसार प्रेक्षक आमच्यासाठी रसिक नाहीत जे केवळ उपभोग घेतील, टाळ्या वाजवतील आणि निघून जातील. तर प्रेक्षक हे आमच्यासाठी पहिले आणि सशक्त रंगकर्मी आहेत, जे नाटकाच्या प्रस्तुतीनंतर कलाकारांशी संवाद साधतात. आपले विचार मांडतात. एक ठोस भूमिका घेऊन बाहेर पडतात. या खरेदी विक्रीच्या काळात प्रेक्षक केवळ ग्राहक नाहीत, तर ते वैचारिक परिवर्तनाचे वाहक बनतात. इथून बदलाची प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेतून एक कलाकार आणि व्यक्ती म्हणून मी आकार घेत होते. पडदा नसणे म्हणजे पारदर्शी असणे. आम्ही जसे आहोत तसेच प्रेक्षकांसमोर येतो आणि त्या पारदर्शकतेने नाटकांचे विषय मांडतो. नाटकांचे विषय प्रेक्षकांना आवडतील असे नसतात. तर समाजातील प्रत्येक व्यक्तीला प्रेरित करणारे आणि जीवनातील आव्हानांना सामोरी जाण्याची ताकद देणारे असतात.
आर्थिक स्वावलंबन हा कलाकारांचा सर्वात जिकिरीचा विषय. माझं स्वप्न आहे कलाकार म्हणून जगायचं. पण माझ्या जीवनाची व्यावहारिक बाजू कशी सांभाळणार? अनहद नाद या नाटकाने कलाकारांच्या अस्मितेची, अस्तित्वाची जाणीव करून दिली. अस्तित्व निर्माण म्हणजे स्वनिर्णय क्षमता. माझ्या आयुष्यातील प्रत्येक पावलावर निर्णय माझा असणे. पण आज रंगभूमीवर असे किती कलाकार आहेत जे स्वनिर्णय घेतात किंवा त्यांच्या निर्णयाची मान्यता असते? विषय, भूमिका, संवाद, नाटकाची प्रस्तुती कुठे करायची, प्रेक्षक कोण? याचे निर्णय आम्ही कलाकार घेतो. वैचारिक नाटक चालत नाही अशी भूमिका घेणाऱयांना आम्ही रंगकर्मींनी प्रेरित केले आणि गेली दहा वर्षे वैचारिक नाटकांची प्रस्तुती केली. नाटकासाठी प्राइम वेळ हवी, ठराविक दिवस असावा तर प्रेक्षक येतात असे गैरसमज किंवा भ्रम पसरवले जातात. नाटक केवळ मनोरंजनापुरते सीमित केले जाते. पण नाटक हे पूर्णकालीन विचारनिर्मितीचे कारक आहे.
नाटक तयार होण्यापासून ते प्रस्तुत होईपर्यंत सगळय़ा बाजूने तयारी हवी असते. आर्थिक, वैचारिक, समग्र समज, अभिनय . आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी नाटकाला एक निर्माता असतो. पण गेल्या दहा वर्षात थिएटर ऑफ रेलेवन्स या प्रक्रियेत कोणत्याही प्रोडय़ुसरशिवाय, कोणतेही सरकारी किंवा गैरसरकारी अनुदानाशिवाय आम्ही कलाकार केवळ आणि केवळ प्रेक्षकांच्या सहभागामुळे पाठीचा मणका ताठ ठेवून उभे आहोत.
या प्रक्रियेत रंगकर्मी असण्याची जाणीव झाली. रंग म्हणजे विचार म्हणून रंगकर्म म्हणजे विचारांचे कर्म. ‘छेडछाड क्यों?’ या नाटकापासून स्त्र्ााr असण्याचा अभिमान ‘गर्भ’मधून माणूस असण्याची जाणीव, कला आणि कलाकाराला उन्मुक्त करणारे नाटक ‘अनहद नाद – Unheard Sounds of Universe ते जनमानसात रुजलेले नाटक ‘लोक-शास्त्र्ा सावित्री’पर्यंत आम्ही स्वतःला, रंगभूमीला आणि रंगप्रेक्षकांना घडवले. कुठल्याही अवाजवी तांत्रिक बाजू, कृत्रिमता न आणता केवळ अभिनयाच्या बळावर आणि वैचारिक संकल्पनेच्या जोरावर आमच्या नाटकांचे हाऊसफुल्ल प्रयोग केले.
राजकारण आणि नाटकाचा संबंध असतो का? कलाकारांचे आणि राजकारणाचे काय देणे घेणे, असे म्हणणारे खूपजण आहेत. पण कलाकार हा समाजाचा आरसा आहे. समाजात घडणाऱया घटनांचे विश्लेषण निष्पक्ष रीतीने समाजासमोर मांडणे हे कलाकाराचे दायित्व आहे. आणि समाजात घडणाऱया घटनांचा राजकारणाशी थेट संबंध असतोच. म्हणून ‘राजगति’ या नाटकाने गर्दी होऊ घातलेल्या जनसामान्याला संविधानिक स्वरूपाने नागरिक म्हणून घडवले आणि राजनैतिक प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाची सहभाग अनिवार्य आहे ही दृष्टी दिली.
माणूस आणि पशुमध्ये फरक आहे. पशु आणि माणसामध्ये संवेदना असतात. पण विचार करण्याची कुवत फक्त माणसात आहे. म्हणून विचार हा नाटकाचा सर्वोतोपरी भाग आहे. मनोरंजनाचे गाजर दाखवून केवळ उथळ आणि वरवर असणारे विषय आणि अशा नाटकांची अर्थहीन नावं नाटकाचा हा मूळ गाभा म्हणजेच वैचारिकतेला उद्ध्वस्त करतात. गेली दहा वर्षं आम्ही सतत वैचारिक विषय घेऊन नाटक प्रस्तुत करत आहोत. विचारांचे नाटक प्रस्तुत करताना अनेक आव्हानं येतात. अनेक भ्रम, गैरसमज, मानसिकता असतात. परंतु त्या आव्हानांना सातत्याने सामोरे जात आणि जड झालेल्या मानसिकतांना खोडून काढत रंगभूमीवर वैचारिकतेच्या रंगआंदोलनाची ठिणगी पेटवली आहे.





























































