भटकंती – मोक्षधाम तिरुवल्लूर मंदिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्षा चोपडे

देशातील दक्षिण भागात शिवाची अनेक स्वयंभू मंदिरे आहेत. त्यापैकी अत्यंत सुबक आणि डोळ्याचे पारणे फिटेल असे मोक्षधाम तिरुवल्लूर मंदिर शिवभक्तांसाठी महादेवाचा आशीर्वादच आहे. केरळात सौंदर्याची मुक्तहस्तपणे लयलूट करीत असलेला निसर्ग, अत्यंत सुंदर मंदिरे, सागरी वैभव आणि देवभूमीचे पावित्र्य याचा अनुभव घेणे म्हणजे स्वर्ग गाठण्यासारखे आहे.

मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असलेली धार्मिक स्थळे आणि प्रत्येक सणवार यावर  प्रभाव पाडणाऱ्या दैवी शक्ती, मंदिरात, मशिदीत किंवा चर्च किंवा कोणत्याही धार्मिक स्थळांत आढळतात. देवावरची प्रचंड श्रद्धा जगातील अनेक समाजांत आढळते. मंदिरात दैवी शक्ती व सामर्थ्य असल्याची मनुष्यजातीची धारणा आहे. मानसिक स्थैर्य आणि पावित्र्य जपण्यासाठी अतिप्राचीन काळापासून जगात सर्वत्र मंदिरे बांधलेली दिसतात. मात्र त्यांच्या स्वरूपात फार मोठे वैविध्य आढळते. हिंदूंची आराध्य देवता भगवान शिव सर्वशक्तिमान आहे. हिंदुस्थानात आणि विदेशातही शिवाची अनेक रूपे आहेत आणि त्यानुसार त्याची पूजा केली जाते. देशातील दक्षिण भागात शिवाची अनेक स्वयंभू मंदिरे आहेत. त्यापैकी अत्यंत सुबक आणि डोळ्याचे पारणे फिटेल असे मोक्षधाम तिरुवल्लूर मंदिर शिवभक्तांसाठी महादेवाचा आशीर्वादच आहे. केरळात सौंदर्याची मुक्तहस्तपणे लयलूट करीत असलेला निसर्ग, अत्यंत सुंदर मंदिरे, सागरी वैभव आणि देवभूमीचे पावित्र्य याचा अनुभव घेणे म्हणजे स्वर्ग गाठण्यासारखे आहे. तिरुवल्लूर केरळ येथील महादेवाचे मंदिर एर्नाकुलम जिह्यातील अलंगड गावातील तिरुवल्लूर, कारा येथे आहे. हे मंदिर भारतातील केरळमधील प्रसिद्ध शिव मंदिरांपैकी एक मानले जाते.

या मंदिरातील महादेवाचे सत्त्व आणि तेज फार दैवी असल्याचे जाणवते. कारण भारतातील या एकमेव मंदिरात भगवान शिवाचा तिसरा डोळा अस्तित्वात आहे. येथील मूर्ती ही अग्निप्रतिष्ठा आहे. मंदिरातील  मूर्तीच्या पूर्व दिशेला तलाव आहे. असे मानले जाते की, महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यातून आणि मूर्तीतून निघणारा अग्नी आणि तेज साधारण मनुष्यासाठी  घातक ठरू शकते. तो प्रभाव सौम्य करण्यासाठी तशा पद्धतीने मंदिराबाहेरील तलावाचे बांधकाम केले आहे. शिवपुत्र गणेशाला येथे महत्त्व असून दुसरी मूर्ती गणपतीची आहे. मंदिराच्या अगदी शेजारी  विष्णू, भगवती आणि नागांच्या मूर्ती आहेत. अतिशय सुंदर मंदिर आणि देखणा निसर्गात शिवमय होणे यासारखे सुख नाही. शिवलिंगासमोरचा नंदी अत्यंत कोरीव आणि आकर्षक आहे. मंदिरावरील गर्भगृह आणि सभामंडपातील दशावतारी उच्चकोटीची नक्षी आणि रामायणातील काही प्रसंग तसेच इतर कोरीव मूर्तिकला त्या वेळच्या अद्भुत कलेची साक्ष देतात. मंदिरातील द्वारपाल मूर्ती तर फारच देखण्या आहेत.

संपूर्ण मंदिरासभोवतालच्या नक्षी त्या काळातील अद्भुत कलाकारांच्या कलेचे जिवंत दर्शन घडवतात. मंदिराच्या आतमध्ये आजूबाजूला काही खोल्या आहेत. बहुधा त्या काळी मंदिरात वास्तव्यास येणाऱ्या संतांची राहण्याची व्यवस्था त्यात होत असावी. मंदिराच्या आतमध्ये प्राचीन काळची विहीर अस्तित्वात आहे. ती पाण्याने तुडुंब भरलेली असते. त्याच पाण्याने महादेवाला अभिषेक केला जातो. मंदिराशी संबंधित महत्त्वपूर्ण  विधी म्हणजे ‘मूनंबला दर्शन’ हा आहे. तिरुवल्लूर महादेव मंदिर, कटुंगल्लूर नरसिंहस्वामी मंदिर आणि अलुवा शिव मंदिर या तिन्ही मंदिरांना एकाच दिवशी भेट दिली जाते अशी ही परंपरा आहे. भगवान शिवाशी संबंधित ‘पंतीरुनाळी’ हा येथील अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. हे मंदिर अलुवा शिव मंदिरापासून सुरू होते आणि कडुंगल्लूर येथे भगवान नरसिंहस्वामींना नमन केल्यावर, तिरुवल्लूर शिवमंदिर दर्शन आणि अलुवा कोची शिवमंदिरात परत येऊन समाप्त होते. परमेश्वराचा जन्मदिवस असलेल्या धनुमास महिन्यात मंदिरात जाणे अत्यंत शुभ मानले जाते. मंदिरातील धार्मिक उत्सवात शेकडो लोक सहभागी होतात.

केरळातील देखण्या मंदिरापैकी एक असे हे सुप्रसिद्ध भव्य मंदिर भगवान शिवाचे अस्तित्व असल्याची साक्ष देते. हे मंदिर हिंदुस्थानातील मंदिर वास्तुकला आणि स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहे. हिंदुस्थानातील प्रत्येक मंदिराचे वैशिष्टय़ आणि रचना वेगवेगळी आणि मनाला भुरळ पाडणारी आहे. अशा पावन ठिकाणी महादेवाचे अस्तित्व जाणवते यात काहीच नवल नाही. केरळला गेलात तर हे मंदिर आवर्जून भेट देण्यासारखे आहे.

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल  सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

[email protected]