विशेष – चित्रतपस्वी राजदत्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशीष निनगुरकर

राजदत्तजी यांच्या कार्याने मराठी चित्रपटसृष्टी खऱया अर्थाने जगाच्या पडद्यावर आली. त्यांच्या कष्टाची आणि चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने राजदत्त यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा सविस्तर आढावा.

राजदत्तजी हे मराठी चित्रपटसृष्टीतले एक ज्येष्ठ-श्रेष्ठ दिग्दर्शक. आत्यंतिक राष्ट्रप्रेम, सामाजिक प्रश्नांची जाण आणि चित्रपटातून प्रबोधन या त्रिसूत्रीवर जीवपाम आचरणारे, तारुण्यात असताना मुक्ती संग्रामात स्वतला झोकून देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि तोच सेनानीपणा समाजकार्यात जपणारे सच्चे नागरिक म्हणजे चित्रतपस्वी ‘राजदत्त’.

आपल्याला परिचित असणारे राजदत्त चित्रपटसृष्टीत ‘दत्ताजी’ या नावाने ओळखले जातात. वडील अंबादास मायाळू रेल्वेत नोकरी करत असल्यामुळे लहानग्या दत्ताजींचे शालेय शिक्षण अनेक गावांतून पार पडले, पण मॅट्रिक व त्यानंतरचे बी.कॉम पदवीपर्यंतचे शिक्षण मात्र वर्ध्यातील जी. एस. महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात असतानाच त्यांनी नाटकांमधून आवड म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा पुढे आपण या क्षेत्रात आपली कारकीर्द घडवू, अशी पुसटशी कल्पनाही त्यांना आली नाही. शिशू अवस्थेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात ते जात. तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक संघ बंदीच्या काळात दोन महिने 18 दिवस त्यांनी कैद भोगली. सत्याग्रहात भाग घेऊन लहानपणापासून गणेशोत्सव, मेळा, शाळा व कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये नाटकात भूमिका केल्या. त्यांच्या कुसुमाग्रज यांच्या ‘दूरचे दिवे’, आचार्य अत्रे यांच्या ‘उद्याचा संसार’, ‘साष्टांग नमस्कार’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’मधील भूमिका चांगल्या झाल्या.

तरुण वयात नोकरीच्या शोधात दत्ताजी मद्रासला गेले होते. तिथे त्यांना ‘चांदोबा’ या मुलांच्या मासिकाच्या संपादकाची नोकरी मिळाली. राजा परांजपे यांनी मद्रासच्या चित्रपटासाठी ‘सहाय्यक दिग्दर्शक’ म्हण्tान बोलावले. राजाभाऊंचा प्रभाव दत्ताजींच्या विषय निवडीपासून ते काम करण्याच्या पद्धतीवर पडलेला दिसतो. मद्रास इथला कालखंड त्यांच्या जीवनाची दिशा ठरवणारा होता. राजाभाऊ परांजपे यांच्याकडे ‘बाप बेटे’ चित्रपटादरम्यान उमेदवारी सुरू झाली. जवळ जवळ 13 चित्रपटांसाठी राजाभाऊंचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले.

1967 मध्ये स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनाला सुरुवात केली. पहिला चित्रपट ‘मधुचंद्र’ आणि या पदार्पणातच यांनी एक यशस्वी प्रयोग केला. अशा वेळी भालजी पेंढारकर व लता मंगेशकर यांनी मदत केली आणि चित्रपट तयार झाला ‘घरची राणी!’ राजदत्त यांनी या मदतीचे चीज केले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि मग राजदत्त यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 1969 साली ‘अपराध’ चित्रपटाला पुन्हा एकदा राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. त्यानंतर सतत 28 चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. त्यापैकी नऊ चित्रपटांना प्रथम, तीन चित्रपटांना द्वितीय, दोन चित्रपटांना तृतीय आणि एका चित्रपटाला विशेष असे राज्य शासनाचे एकूण 14 पुरस्कार मिळाले आहेत. एवढे पुरस्कार मिळवणारे मराठीतले ‘राजदत्त’ हे एकमेव.

त्यांचा संत गाडगेबाबा यांच्या जीवनावरचा ‘देवकीनंदन गोपाला’ हा चित्रपट ताश्कंदमधील महोत्सवात दाखवला गेला. तसेच ‘शापित’ चित्रपटासाठी रशियन कौन्सिलने त्यांचा सत्कार केला. राजदत्त यांच्या तीन चित्रपटांना ताश्कंद, व्हेनिस आणि कॉर्क फेस्टिव्हलमध्ये स्थान मिळाले. राजदत्त यांनी ‘इरिया’ हा हिंदी चित्रपट केला. चित्रपटाबरोबरच दूरदर्शन मालिका आणि अनेक टेलिफिल्मचे दिग्दर्शन केले. ‘एक कहाणी’ ही हिंदी मालिका युनेस्कोच्या लायब्ररीत आहे. समाजातल्या प्रश्नांबाबत चर्चा करणारी ‘इन सर्च ऑफ सोल्युशन’ हीसुद्धा हिंदीतील मालिका करण्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी राजदत्त यांना सांगितले होते. जनसामान्यांत अतिशय लोकप्रिय झालेल्या ‘गोटय़ा’ या मालिकेस ‘रापा पुरस्कार’ मिळाला आहे.

राजदत्त यांच्यासारखा माणूस चित्रपटसृष्टीत असणे हेच मुळात आश्चर्य आहे. खादीचा अर्ध्या बाह्यांचा सदरा, धुवट धोतर, खांद्याला झोळी, दाढी वाढलेली अशी ही असामी शूटिंगच्या कुठल्या तरी कोपऱयात एखाद्या बाकडय़ावर डोळे मिटून चिंतन करताना, कधी फिल्म सिटीतल्या एखाद्या झाडाखाली दुपारची चक्क झोपलेली दिसायची. प्रत्यक्ष सेटवरही खूप हळू आवाजात बोलत सावकाश काम करताना दिसत. शूटिंग सुरू असलेल्या चित्रपटाचे हे दिग्दर्शक आहेत हे कुणाला सांगूनही खरे वाटले नसते. या माणसाचे दिग्दर्शकीय मोठेपण असे की, ज्या काळात मराठी चित्रपटांना घरघर लागली होती, वर्षातून दहा ते बारा चित्रपट कसेबसे बनायचे. त्या काळात त्यांनी उत्तम चित्रपट देऊन मराठी चित्रपटसृष्टीची लाज राखली. ऐंशीचे दशक होते. ‘राघूमैना’, ‘शापित’, ‘पुढचं पाऊल’, ‘देवकीनंदन गोपाला’, ‘माझं घर माझा संसार’, ‘हेच माझं माहेर’, ‘अरे संसार संसार’, ‘मुंबईचा फौजदार’ असे वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या प्रकृतीचे चित्रपट त्यांनी केले. चित्रपटसृष्टीतला मानाचा फिल्मफेअर पुरस्कारही राजदत्त यांना मिळाला.

त्यांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांना असलेली चित्रपट कथेबद्दलची विलक्षण समज. आपला मुद्दा ते शांतपणे, अनाग्रही राहत, तरीही प्रभावीरीत्या समजून देतात. दुसरी त्यांची खासियत म्हणजे सामाजिक प्रश्नांविषयी त्यांना असलेली कमालीची आस्था. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘संस्कार भारती’चे ते अध्यक्ष आहेत. मात्र त्यांच्या ठायी अभिनिवेश कधीच नसतो. वनवासी कल्याण आश्रमशाळांसाठी ते ज्या तळमळीने फिरतात, मुलांमध्ये काम करतात ते पाहून चित्रपट क्षेत्र अधिक प्यारे आहे की समाजसेवा? असा प्रश्न पडतो. त्यांना ‘गदिमा पुरस्कार’ मिळणे म्हणजे योग्य माणसाकडे योग्य पुरस्कार जाणे आहे. स्वामी चिन्मयानंद पुरस्कार, सुधीर फडके स्मृतिप्रीत्यर्थ ‘स्वरतीर्थ पुरस्कार’, ‘चित्रभूषण पुरस्कार’, लोकमान्य टिळक व्याख्यानमालेचा ‘तेजस पुरस्कार’, महाराष्ट्र राज्याचा ‘जीवन गौरव पुरस्कार’, दूरदर्शन सह्याद्रीचा ‘चित्ररत्न पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी राजदत्त यांना सन्मानित करण्यात आले आहे.

आत्यंतिक राष्ट्रप्रेम, सामाजिक प्रश्नांची जाण आणि चित्रपटातून प्रबोधन या त्रिसूत्रीवर जीवपाम आचरणारे चित्रतपस्वी म्हणजे राजदत्त. राहण्या-वागण्या-बोलण्यातील साधेपणा, समाजात घडणाऱया व सामान्य माणूस म्हणून दुखावणाऱया तरी तारतम्य भावाने विचार करायला लावणाऱया घटना सूक्ष्म निरीक्षणांद्वारे शोधणे, त्या घटनांना अभिव्यक्त करतील अशा कथानकांचा शोध घेणे, आपल्या दिग्दर्शकीय दृष्टिकोनातून त्या लालित्यपूर्ण, पण सामाजिक आशय संप्रेषित करणाऱया बनवणे व त्या प्रेक्षकांसमोर ठेवणे अशी अनेक पातळीवरची कसरत राजदत्त यांनी आपल्या कारकीर्दीत सातत्याने व यशस्वीपणे केलेली आहे. अशा दिग्गज व्यक्तिमत्त्वाला आता केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा मानाचा पद्मभूषण पुरस्कार प्राप्त होतोय याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन!

[email protected]