
>> आशुतोष बापट
अंकोर म्हणजे ‘शहर’ आणि थॉम म्हणजे ‘राजधानी.’ राजधानीचे शहर ते अंकोर थॉम. सीएम रीप या शहरात अंकोर रीजनमध्ये अंकोरवाट मंदिराच्या खालोखाल महत्त्वाचे ठिकाण कुठले असेल तर ते अंकोर थॉम हे होय. कंबोडियामध्य इ.स.च्या 12 व्या शतकात जयवर्मा सातवा हा ख्मेर साम्राज्यातील एक बलाढय़ सम्राट होऊन गेला. त्याच्या कारकीर्दीत त्याने आपली राजधानी अंकोरथॉम इथे वसवली. 3 कि.मी. लांब आणि 3 कि.मी. रुंद अशी तटबंदी या शहराला केलेली आहे. बौद्ध धर्माचा अनुयायी असलेल्या या सातव्या जयवर्माची कारकीर्द मोठी देदीप्यमान होती.
हिंदुस्थानच्या आग्नेयेला असलेला कंबोडिया हा देश हिंदुस्थानी संस्कृतीची अनेक मानचिन्हे आपल्या अंगावर मोठय़ा अभिमानाने मिरवतो आहे. एकेकाळी अज्ञातवासात असलेला हा सगळा परिसर आता ख्मेर स्थापत्यशैलीत बांधलेल्या अनेक मंदिरांमुळे उजेडात आला आहे. कंबोडिया आणि अंकोरवाट मंदिर हे समीकरण अगदी रूढ झालंय आणि ते काही अंशी खरंही आहे. त्या प्रचंड महाकाय मंदिरामुळे कंबोडियाची जगाला ओळख झाली. तरीही अंकोरवाट म्हणजेच काही कंबोडियाचे सर्वस्व नव्हे. इतरही अनेक आश्चर्यकारक गोष्टी कंबोडियात बघायला मिळतात. सीएम रीप या शहरात ‘अंकोर रीजन’ नावाचा एक वेगळा भागच आहे ज्यात विविध सम्राटांनी त्यांच्या कारकीर्दीत बांधलेली देवळे, राजवाडे आणि इतर स्थापत्य आपल्याला पाहता येते. ‘अंकोरथॉम’ हे त्यातलेच एक महत्त्वाचे आणि सुंदर असे ठिकाण.
अंकोरथॉमचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे इथे असलेले बयोन हे राजमंदिर आणि त्यावर असलेले मानवी चेहरे. मानवी चेहरे ही इथल्या स्थापत्याची खास ओळख म्हणावी लागेल. फेस टॉवर्स असे यांना म्हटले जाते. या मानवी चेहऱयांवर एकप्रकारचे गूढ आणि मंद स्मित झळकते. या स्मितहास्याला ‘अंकोर स्माईल’ असे नाव मिळालेले आहे. बयोन मंदिरावरचे हे फेस टॉवर्स हे इथले खास आकर्षण. कंबोडियाची ओळख जशी अंकोरवाट मंदिरामुळे आहे, तशीच इथल्या बयोन मंदिरावर असलेल्या फेस टॉवर्समुळेही झालेली आहे. याचा प्राकार अगदी विस्तीर्ण. सुरुवातीलाच असलेल्या भिंतींवर चारही बाजूंनी शिल्पकाम केलेले. माणसाच्या रोजच्या जीवनातील प्रसंग, विविध लढायांचे प्रसंग यांनी या भिंती सजल्या आहेत. हे शिल्पकाम पाहून तत्कालीन समाजजीवनाची संपूर्ण कल्पना ही येते. इथून लाकडी जिना चढून वर आल्यावर किंवा येतानाच समोर दिसायला लागतात ते जगप्रसिद्ध अंकोर स्माईल म्हणून ओळखले गेलेले चेहरे. त्यांची संख्या सध्या 37 आहे. परंतु पूर्वी इथे 49 ते 54 फेस टॉवर्स होते असे संशोधक सांगतात.
प्राचीन अंकोर साम्राज्याच्या राजधानीच्या अवतीभवतीदेखील अनेक ऐतिहासिक निसर्गरम्य ठिकाणे आज पर्यटकांची वाट पाहत आहेत. कबाल स्पीअन हे त्यातलेच एक सुंदर ठिकाण. जलाशय आणि शेषशायी विष्णू यांचा संबंध आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. मग ती रानी की वाव इथली शिल्पसमृद्ध विहीर असो, किंवा विविध मंदिरांच्या समोर असलेल्या पुष्करिणी असोत. विहिरी, जलाशय म्हटले की, तिथे शेषशायी विष्णूची प्रतिमा ही हटकून पाहायला मिळते. कंबोडिया इथे पण अशीच एक खूप सुंदर शेषशायी विष्णूची प्रतिमा आणि त्याच्या सान्निध्यात असणारा नदीचा प्रवाह यांची सुंदर सांगड घातलेली बघायची असेल तर कबाल स्पीअन या रम्य ठिकाणाला भेट देण्याशिवाय पर्याय नाही. इथल्या नदीपात्रात विष्णू आणि इतर देवतांच्या मूर्तींचे अंकन अंदाजे इसवीसनाच्या 11-12 व्या शतकात म्हणजे राजा उदयादित्यवर्मा दुसरा याच्या कारकीर्दीत केले गेले आहे असे तज्ञांचे मत आहे. स्थानिक भाषेत कबाल स्पीअनचा अर्थ नैसर्गिक दगडाचा पूल असा होतो. सीएम रीप पासून 40 कि.मी. अंतरावर असलेले हे ठिकाण डोंगरावर वसलेले आहे. डोंगर चढून जायला तासभर पुरतो. वर जाण्यासाठी झाडांच्या सावलीतून सुंदर पायवाट केलेली आहे. डोंगरमाथ्यावर पोचल्यावर समोरच नदीपात्रात आणि त्याच्या आजूबाजूच्या खडकांवर हजारो शिवलिंग खोदलेली दिसतात. ही शिवलिंग नदीपात्रात खोदलेली असल्यामुळे या नदीचे ‘सहस्रलिंग नदी’ असेही नामकरण केलेले आहे. या शिवलिंगांसोबतच ब्रह्मदेवाची एक सुंदर मूर्ती इथेच नदीपात्रातल्या खडकावर खोदलेली आहे. एका कमळाच्या फुलात ब्रह्मदेव पद्मासनात बसलेले दाखवलेले आहेत. ज्या खडकावरून ही नदी वाहते त्या खडकावर शेषशायी भगवान कोरलेले आहेत. पायाशी देवी लक्ष्मी दाखवली आहे.
हिंदुस्थानी संस्कृतीची मानचिन्हे मिरवणारा कंबोडिया नितांत रमणीय आहे. अंकोरवाट हा तर इथला मेरूमणी. पण त्याचसोबत तितक्याच तोलामोलाची इतर ठिकाणेही भटकंतीच्या दृष्टीने तितकीच महत्त्वाची. अंकोर थॉम आणि कबाल स्पीअन हे कंबोडियाच्या शिरपेचातले दोन मानाचे तुरे मुद्दाम वेळ काढून पाहावेत असेच आहेत.



























































