
>> आशुतोष बापट
ओडिशातील अनेक कला जगन्नाथ या देवालाच अर्पण करण्यासाठी केल्या जातात. या प्रांती अगणित कलाकार वसलेले असून कलेची जोपासना करत आहेत. अशा ओडिशामध्ये रघुराजपूर हे संपूर्ण गावच कलाकारांचे आहे. जगन्नाथपुरी या सुप्रसिद्ध ठिकाणापासून अवघ्या 10 कि.मी.वर असणाऱया या गावाला ओडिशा सरकारने ऐतिहासिक वारसा गाव म्हणजेच ‘कलाग्राम’ असा दर्जा दिलेला आहे. नर्तक, वादक, शिल्पकार, चित्रकार, लाकडावर काम करणारे, रंगकाम करणारे आणि पट्टचित्र हे खास ओडिशाचे वैशिष्टय़ असलेली कला जोपासणारे असे सगळे लोक या गावात नांदतात.
निसर्ग आणि मंदिरे यांनी समृद्ध असलेल्या ओडिशा राज्याला एक मोठी देणगी लाभलेली आहे ती म्हणजे या भूमीमधे जन्मलेले कलाकार. विविध कलांनी हा प्रदेश संपन्न आहे आणि ती संपन्नता प्राप्त करून देण्याचे सगळे श्रेय या प्रांतातल्या असंख्य कलाकारांना द्यावे लागेल. नृत्य-नाटय़-वादन या कलांमध्ये तरबेज असणारी मंडळी तर इथे आहेतच, परंतु त्याचसोबत शिल्पकला, चित्रकला, लाकडी वस्तू, पट्टचित्रे या सर्व कलांमध्ये अत्यंत कुशल असलेले कलाकार या भूमीमधे विपुल प्रमाणावर आढळतात. पुरीचा जगन्नाथ हा तर संपूर्ण ओडिशाचा कुलदैवत. ओडिशातील कलाकारांच्या विविध कलाकृतींमधून या देव जगन्नाथाचे दर्शन वेळोवेळी दिसत असते. अगदी छोटय़ाशा घरावर रंगवलेले चित्र असू देत किंवा भव्यदिव्य पट्टचित्र असू देत सर्वत्र जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांचे मुखवटे दिसणारच. जगन्नाथ त्याच्याशी निगडित असलेल्या विविध कथा, त्याची रथयात्रा या गोष्टींचा प्रभाव इथल्या माणसाच्या मनावर-आयुष्यावर फार मोठय़ा प्रमाणावर पडलेला दिसतो. ओडिशातील अनेक कला जगन्नाथ या देवालाच अर्पण करण्यासाठी केल्या जातात. कोणतीही कला त्या भगवंताला अर्पण करणे हेच जणू इथल्या प्रत्येक कलाकाराचे ध्येय असते. मग ते नृत्य असो, मूर्तिकाम असो वा पट्टचित्र असो. जगन्नाथाचा रथ तयार करणे, त्या रथावर विविध नक्षीकाम केलेल्या, चित्रे काढलेल्या कापडांचे आवरण करणे या सगळ्या गोष्टी इथले कलाकार तल्लीन होऊन करीत असतात. केलुचरण महापात्र यांच्यासारखे ‘पद्मविभूषण’ या पुरस्काराने गौरवलेले नर्तक हे तर ओडिशाचे वैभव आहेच, परंतु अगणित अज्ञात कलाकार या प्रांती वसलेले असून अत्यंत साधेपणाने एकमार्गी कलेची जोपासना करत आहेत. एखादे राज्य, एखादा प्रदेश हा विविध कलाकारांनी व्यापलेला आहे हे एकवेळ आपण समजू शकतो. परंतु एक अख्खे गावच कलाकारांचे आहे असे सांगितले तर नक्कीच आश्चर्य वाटेल नाही का, पण इथे ओडिशामधे एक गावच कलाकारांचे आहे. या गावातील सगळे रहिवासी हे कलाकार आहेत.
रघुराजपूर हे त्या गावाचे नाव. जगन्नाथपुरी या सुप्रसिद्ध ठिकाणापासून अवघ्या 10 कि.मी.वर आणि भुवनेश्वरपासून 50 कि.मी.वर असलेले, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 203 ला लागूनच असलेले एक नितांत रमणीय, टुमदार असे हे अत्यंत सुंदर ठिकाण. आंबा, फणस, नारळ, सुपारी, चिक्कू अशा झाडांच्या गर्द राईमधे वसलेले सुंदर गाव. ओडिशा सरकारने या गावाला ऐतिहासिक वारसा गाव म्हणजेच ‘कलाग्राम’ असा दर्जा दिलेला आहे. मुख्य रस्त्यावरून गावात जाणाऱया फाटय़ावर हा हेरिटेज व्हिलेजचा नीलफलक लावलेला दिसतो. ओडिशाचे सुप्रसिद्ध नर्तक गुरू केलुचरण महापात्र यांचे हे जन्मगाव. हे गाव इंग्रजी ‘वाय’सारख्या दोन रस्त्यांमध्ये विभागले आहे. एका रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि दुसऱया रस्त्याच्या उजव्या बाजूला 60-60 घरे आहेत. आणि या घरांच्या दोन रांगांमधे मंदिरांची एक सुंदर रांग आहे. गणपती, देवी, जगन्नाथ अशी विविध देवतांची ही मंदिरे आहेत. इतकी सुंदर गावाची रचना दुसरीकडे कुठे पाहण्यात आली नाही. गावाच्या मधोमध मंदिरांची रांग आणि त्याच्या दोन्ही बाजूला घरांच्या रांगा. खरोखर एखादे टुमदार, चित्रात दाखवावे ना असे हे गाव दिसते. बरं सगळ्याच ओडिशामधे आहेत तशी भरपूर झाडे या गावातसुद्धा दिसतात.
या गावात जवळजवळ 120 घरे आहेत आणि इथे राहणारी ही सगळी मंडळी कलाकार आहेत. नर्तक, वादक, शिल्पकार, चित्रकार, लाकडावर काम करणारे, रंगकाम करणारे आणि पट्टचित्र हे खास ओडिशाचे वैशिष्टय़ असलेली कला जोपासणारे असे सगळे लोक या गावात नांदतात. कला ही इथल्या लोकांच्या रक्तात इतकी भिनलेली आहे की, अत्यंत स्वच्छ असलेल्या या गावात सगळ्या घरांवर बाहेरून सुंदर सुंदर चित्रकला केलेली दिसते. दगडामधे किंवा लाकडामधे काम करणाऱया कारागिरांच्या घराबाहेर लाकडी किंवा पाषाणाच्या मूर्ती करून ठेवलेल्या, कोणी पट्टचित्राची तयारी करतोय, कोणी आपल्या कलेसाठी लागणारा कच्चा माल घेऊन येतोय अशा प्रकारे कलाकारांची वर्दळ असलेले असे हे अगदी मनमोहक गाव आहे. पाहताक्षणी प्रेमात पडावे असे हे गाव.
गावात पट्टचित्र करणारी काही घरे आहेत. जगन्नाथ मंदिराच्या इतिहासाची निगडित आणि तेवढीच पुरातन अशी ही कला आहे. उंदराच्या केसांचा ब्रश इथे अगदी बारीक चित्रे काढण्यासाठी मुद्दाम वापरला जातो. काही चित्रे मात्र अगदी हुबेहूब आपल्या वारली चित्रांसारखी दिसतात. साबुदाणा भिजवून त्याचा डिंक कापडाला लावून त्यावर कृष्णलीला, रामायण, महाभारत आणि जगन्नाथाची चित्रं अशी अनेक चित्रं इथे काढली जातात. चित्रांमधले रंग सगळे नैसर्गिक असतात. हिंगुळ जातीचा दगड आणून त्याची पावडर करतात त्याचा लाल रंग होतो तो या चित्रांमध्ये वापरला जातो. तसेच निळ्या रंगासाठी काही स्फटिक आणून ते दळून त्याची अगदी भुकटी करतात आणि मग त्यात पाणी घालून त्याचा रंग तयार केला जातो. त्याचबरोबर हळद, समुद्राचा फेस, खडूची भुकटी, चिंचेचा डिंक, काजळ या वस्तू पट्टचित्र कलेमध्ये वापरल्या जातात. डॉ. जगन्नाथ महापात्र यांनी जात्रीपटी ही एक अनोखी शैली विकसित केली आणि त्या शैलीनुसार आता बरेचसे पट्टचित्राचे काम केले जाते.
याचबरोबर आपल्याकडे दशावतार असतात तसाच इथे गोट्टीपो नावाचा नृत्यप्रकार आहे. गुरू मागुणीदास यांनी हा प्रकार इथे रूढ केला. ओडिया नृत्यशैलीमधली ही अगदी प्राचीन परंपरा आहे. या प्रकारात मुले स्त्रियांची वेशभूषा करून नृत्य सादर करतात. अगदी लहानपणापासूनच या मुलांना हे नृत्य शिकवले जाते. थोर नर्तक केलुचरण महापात्र यांनीसुद्धा आपली नृत्याची कारकीर्द गोट्टीपो या नृत्यापासूनच सुरू केल्याचे सांगतात. रघुराजपूर हे या नृत्यप्रकारचे उगमस्थान असल्याचे मानले जाते. स्त्राrपात्र उत्तमरीत्या वठवण्यासाठी मुले आपले केस कापत नाहीत तर ते मुलींसारखे लांब वाढवतात. त्यामध्ये फुले माळतात, तोंडावर लाल आणि पांढरा रंग लावतात. काजळाने भुवया अजून लांब रंगवतात. तोंडावर विविध चित्रे रंगवतात. पोषाखामध्ये कांचुला आणि कमरेला निबिबंध बांधून नृत्य केले जाते. गोट्टीपो नृत्यकलेचे जन्मस्थान, हस्तकलेनी समृद्ध आणि फक्त कलाकारांचे निवासस्थान असलेले हे रघुराजपूर ओडिशा सहलीमधे मुद्दाम वेळ काढून पाहिले पाहिजे.



























































