
>> आशुतोष पाटील
निसर्गरम्य वीर गाव असा आडवाटेच्या कोकणात दडलेला आहे. रमणीय असे हे स्थान पर्यटनाच्या नकाशावर येऊ पाहते आहे.
शिल्पसमृद्ध कोकणात आपण विष्णू, महिषासुरमर्दिनी, सूर्य, कार्तिकेय अशा देवदेवतांच्या मूर्ती बघतो. त्यातही विष्णुमूर्तींची संख्या जास्त वाटते, पण कोकण हा खरंच एक मोठा खजिना आहे. जितके आपण शोधत जाऊ, तितक्या एक से एक गोष्टी इथे सापडतात. आता हेच बघा ना. कृष्णाची मूर्ती म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर देहुडा पावली उभा असलेला, बासरी वाजवणारा, डोक्यात मोरपीस खोचलेला असा देव उभा राहतो, पण आपण आता जे कोकणातले कृष्णाचे रूप बघणार आहोत ते सर्वथैव निराळे आहे. हा कृष्ण आहे राक्षसांचे निर्दालन करणारा. त्यांना मारणारा म्हणून याचे नाव पडले मल्लमर्दन. यामागे एक पौराणिक कथा आहे.
हे गाव आहे चिपळूण तालुक्यातील वीर. चिपळूण-सावर्डे-वहाळ-शिरंबे अशा मार्गाने आपण वीर गावात येऊन पोचतो. गावात मल्लमर्दन बस थांबा आहे. तिथून आत 10 मीटर चालत गेल्यावर डावीकडे खालच्या भागात मंदिर दिसते. कौलारू सभामंडप आणि उंच गाभारा यामुळे हे मंदिर उठून दिसते. हे वीर गाव अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी, डोंगराच्या ऐन मध्यात वसले असून या मंदिराच्या चारही बाजूने उंच डोंगर आहेत. डोंगरावरून वाहत येणारे पाण्याचे ओहोळ पाहताना मन प्रसन्न होते. मंदिराच्या जवळच खळाळत वाहणारा प्रवाह आणि तीन कुंडे आहेत.
मंदिराच्या गाभाऱयात एका चौथऱयावर अंदाजे 6 फूट उंच आणि 6 फूट रुंद असा मोठा पाषाणखंड आहे. यावर मधोमध श्रीकृष्ण व त्याच्या सभोवती गोलाकार रचनेत 8 मल्ल दाखवलेले आहेत अशी ही मूर्ती. कंसाला मारायच्या आधी कृष्णाने अनेक मल्लांना मारले म्हणून तो मल्लमर्दन झाला. हे आठही मल्ल त्याच्याभोवती फेर धरल्यासारखे दाखवले आहेत. ही मूर्ती दुर्मिळच म्हणायला हवी. कृष्णाचे असे स्वरूप इतरत्र कुठे दिसत नाही. कृष्णाच्या मूर्तीला चार हात असून त्यातल्या एका हातातली गदा स्पष्ट दिसते. मूर्तीच्या बाजूंनी शंख व चक्र कोरले आहेत. कृष्णाच्या एका हातात गदा असून दुसऱया हाताने त्याने एका मल्लाला पकडले आहे. देवाच्या डावीकडे खाली हात जोडलेला गरुड दाखवला असून उजवीकडे खाली हातात नांगर धरलेला बलराम आहे. कंसाला मारायला हे दोघे भाऊ बरोबरच गेले असल्याचे इथे शिल्पकाराने खूप सुंदर शिल्पांकित केलेले दिसते. गाभाऱयाची उंची 10 मीटर आहे. मूर्ती एका चौथऱयावर प्रस्थापित केलेली आहे. मूर्तीच्या मागे एक प्रभावळ असून त्याच्या माथ्यावर मकर तोरण आहे. त्या तोरणात विष्णू-लक्ष्मीची मूर्ती आहे. आता ही मूर्ती खूपच झिजली आहे. मधली मूर्ती कृष्णाची व बाजूंनी ज्या आठ आकृती आहेत त्या कृष्णाने मारलेल्या चाणूर इत्यादी आठ राक्षसांच्या आहेत. शिवाय प्रभावळीत लक्ष्मीचे शिल्पांकन असल्यामुळे या देवाला ‘लक्ष्मीमल्लीमर्दन’ असे नाव पडले. अभ्यासकांच्या मते ही मूर्ती इ.स.च्या 12-13 व्या शतकातील म्हणजे शिलाहार काळातील असावी.
ही मूर्ती इथे कशी आली याची एक कथा सांगतात. त्यानुसार कराड भागातून आलेल्या वीरकरांच्या देवपाटकर घराण्यातील कोणा पुरुषाला ‘‘मी वीर येथील खाडीत पडलो आहे. तेथून मला काढ व देऊळ बांध’’ असा दृष्टांत लक्ष्मीमल्लमर्दनाने दिला. त्याप्रमाणे त्या गृहस्थांनी ही मूर्ती खाडीतून काढून आणली व तिची स्थापना केली. त्यानंतर काही काळाने गावातील लोकांना दृष्टांत झाला म्हणून त्या ठिकाणाहून मूर्ती हलवून इथे लहान देऊळ बांधून मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली.
या मूर्तीबद्दल स्थानिक मंडळी अजून काही माहिती सांगतात. त्यानुसार पूर्वी ही मूर्ती पांढऱयाशुभ्र रंगाची होती. या देवाला कोणताही भ्रष्टाचार चालत नसे. काही भ्रष्टाचार झाला तर हा देव स्वतःला जाळून घेई. देवाने स्वतःला अशा तऱहेने 2-3 वेळा जाळून घेतल्याने ही मूर्ती सध्याच्या विटकरी रंगाची झाली आहे, तर काही जणांच्या मते अनेक वर्षे पाण्यात राहिल्यामुळे या मूर्तीची झीज होऊन सध्याचा ‘रंग’ तिला प्राप्त झालेला आहे. काही भ्रष्टाचार झाला तर येथील कुंडाचे पाणी आटते. मग सर्व लोक एकत्र जमून देवाची क्षमा मागतात. त्या कुंडात पंचगव्य टाकतात. त्यानंतर परत कुंडात पाणी येते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. पेशवाईपासून या मंदिराला 25 रुपये वर्षासन आहे. त्याबद्दलची एक सनददेखील आहे. सध्या या मूर्तीला वज्रलेप करत असून मूर्तीला परत सुबक रूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कार्तिक शुद्ध एकादशी ते त्रयोदशी हा इथला मुख्य उत्सव असतो. हा देव म्हणजे गोपाळकृष्णाचे रूप असल्याने गोकुळाष्टमीचा उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा करतात. रमणीय असे हे गाव डोंगराच्या मध्यावर वसले आहे. निसर्गरम्य असे आडवाटेच्या कोकणात दडलेले हे वीर गाव पर्यटनाच्या नकाशावर येऊ पाहते आहे.





























































