
>> सीए अभिजित कुळकर्णी
अर्ध हलासन आणि उत्थित वक्षासन यानंतर ओघानेच येणारे तिसरे आसन म्हणजे नौकासन. हे पाठीवरती झोपून आणि पोटावर झोपून अशा दोन्ही प्रकारे केले जाते. आज आपण पाठीवर झोपून करावयाच्या नौकासनाचा परामर्श घेणार आहोत. अर्ध हलासन आणि उत्थित वक्षासन दोन्ही एकाच वेळी केले तर जे आसन होते ते म्हणजे नौकासन.
सर्वप्रथम पाठीवर सरळ झोपावे. पाय जुळवून ठेवावेत. हात शरीराला चिकटवून ठेवावेत. हाताचे तळवे जमिनीला लावून ठेवावेत. त्यानंतर सावकाशपणे आपले दोन्ही पाय एकत्रपणे जमिनीपासून 60 अंशापर्यंत वर उचलावेत. नंतर शरीराचा वरचा भाग हा जमिनीपासून 60 अंशापर्यंत वर उचलून ठेवावा. आपले दोन्ही हात पायांना समांतर राहू द्यावे.
आपल्या शरीराचे सर्व संतुलन हे केवळ आपल्या नितंबांवरती या आसनामध्ये होते. आसनाच्या स्थितीमध्ये गेल्यानंतर 40 ते 50 क्षणपावेतो किंवा शक्य असल्यास जमल्यास त्याहीपेक्षा अधिक काळ या आसनात स्थिर राहावे. थोडय़ा वेळानंतर सावकाशपणे सर्वप्रथम आपले हात खाली आणावेत, नंतर डोके जमिनीवरती आणावे आणि नंतर सावकाशपणे आपले पाय जमिनीवरती ठेवावे. थोडा वेळ विश्रांती घेऊन या आसनाची पुनरावृत्ती करावी. या आसनाची दोन ते तीन आवर्तने अवश्य केली पाहिजेत. या आसनामध्ये श्वसन चालू ठेवणे अवघड असते.
या आसनामध्ये आपल्या शरीराची आकृती नौकेसारखी दिसते म्हणून या आसनाला नौकासन असे म्हणतात.
आसनाचे लाभ
अर्ध हलासन आणि उत्थित वक्षासनात मिळणारे सर्व लाभ या आसनामध्ये मिळतात. सर्वप्रथम आपल्या पोटाचे स्नायू मजबूत होतात. पोटांचे आरोग्य सुधारते. पचन संस्था सुधारते, पाचन सुधारते आणि पोटही साफ चांगल्या प्रकारे होते. भूक चांगली लागते. या आसनाच्या अभ्यासामुळे आपला ‘स्टॅमिना’ वाढतो. कमरेचे स्नायू मजबूत होतात. हे आसन केल्यामुळे छातीच्या स्नायूंना आणि मानेला उत्तम व्यायाम मिळतो.
– योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
www.bymyoga.in




























































