आनंदी आनंद पुणे

>> अभिजित पेंढारकर

‘इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट 2020’मध्ये आनंदी शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. देशातील 34 आनंदी शहरांच्या यादीमध्ये राज्यातील तीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आनंदी शहरांच्या यादीत पुणे शहराने मुंबई आणि नागपूर शहरांना मागे टाकले आहे. देशातील वेगवेगळ्या शहरांमधील हॅपीनेस इंडेक्स म्हणजे आनंदी राहण्याच्या प्रमाणात पुणे शहर अग्रेसर ठरले आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर या यादीमध्ये 12 व्या स्थानी आहे.

पुणे हे आनंदी शहर आहे असे जाहीर झाल्यानंतर पुण्यात घरोघरी शिकरणपोळीची मेजवानी करून आनंद साजरा करण्यात आला. दिवाळीतले उरलेले आणि पोलिसांचे दंडुके बसल्यामुळे न वाजवता आलेले फटाके माळ्यावरून काढून त्यातला एक भुईनळा उडवून जल्लोष करण्यात आला अशी बातमी गोपनीय सूत्रांकडून आमच्यापर्यंत पोहोचली आहे. पुणे आनंदी असल्याबद्दल पुण्यातच आनंदी आनंद साजरा झाला असतानाही हे शहर एवढे आनंदी असण्याचे नेमके कारण काय, याचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेचे मावळते, पण स्वयंघोषित तहहयात अध्यक्ष डोनाल्डतात्या ट्रम्प यांनी आपले ट्रम्पकार्ड वापरून मंत्रिमंडळाची एक तातडीची बैठक घेतली. त्यात अमेरिकेनेही आनंदी राहणे पुणेकरांकडून कसे शिकले पाहिजे, याबद्दल त्यांनी किंचाळून किंचाळून माहिती दिल्याचेही समजते. त्या बैठकीचे फलित म्हणजे पुणे नक्की का आनंदी आहे, याबद्दल अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. ही समिती पुण्याच्या काही दिवसांच्या भेटीवर आली आणि तिचे गट करून वेगवेगळ्या भागांत अभ्यासासाठी पाठवण्यात आले. त्यांनी काढलेला गोपनीय निष्कर्ष आमच्या हाती लागला आहे. तो थोडक्यात असा ः

पुण्यात सदाशिव आणि नारायण या दोनच पेठा आहेत आणि या पेठांत जे घडते, तेच मुख्य पुण्याचे प्रतिबिंब किंवा प्राक्तन असल्याचेही या समितीच्या कानावर आले होते. त्यामुळे सर्वप्रथम त्यांनी याच भागात भेट दिली. सदाशिव पेठेत आता एक टोलेजंग मॉल उभे राहत असल्यामुळे समितीचे सदस्य भारावून गेले. ‘अमके तमके इथे राहत नाहीत, चौकशी करू नये’, ‘बेल दोनदा वाजवू नये, आमचे आडनाव ‘मुके’ असले तरी आम्ही बहिरे नाही’ अशा पद्धतीच्या पाटय़ा वाचत वाचतच सदस्य मॉलच्या शोधात फिरत राहिले. ‘तेल संपलंय, उद्या या!’, ‘एक रुपया सुट्टा नाही, तर येता कशाला दुकानात?’ अशा पद्धतीची सेवा ग्राहकांना देण्यासाठी एकेकाळी जगविख्यात असलेल्या दुकानांच्या गर्दीत ही चकचकीत मॉल संस्कृती रुळणार तरी कशी याचे सदस्यांना भारी कुतूहल. मात्र, या मॉलमध्ये गाळे घेण्याआधी ‘आम्हीही त्याच तुच्छतेच्या परंपरेचे काटेकोर पालन करू’ अशी अटच घालण्यात आल्याचे सदस्यांना समजले आणि त्यांना पेठीय भागातील आनंदाचे मर्म उलगडले. शिवाय दुपारच्या वेळी शनिपाराजवळच्या दुकानात 1 ते 4 या वेळेतही त्यांना बाकरवडी खायला मिळाल्याने ते तृप्त झाले.

डेक्कन आणि शिवाजीनगर भागात अभ्यासासाठी गेलेले सदस्य फर्ग्युसन रस्त्यावरच्या गर्दीत हरवून गेले. उजव्या बाजूला असलेल्या तीन-चार प्रसिद्ध हॉटेलांच्या बाहेरची गर्दी आणि रांगा बघून एखादा मोफत अन्नदान यज्ञ वगैरे सुरू असावा असा त्यांचा समज झाला, पण तोही खोटा ठरला. पुणेकर घरी जेवतच नसल्यामुळे कायम आनंदी असावेत असा निष्कर्ष या गटाने काढला.

विद्यापीठ परिसरात भटकंतीसाठी गेलेल्या सदस्यांना तिथल्या हिरवळीचे आत्तापर्यंत माहीत नसलेले अनेक फायदे बघायला, अभ्यासायला मिळाले. वाहतूक कोंडी फुटावी म्हणून तिथे एक पूल बांधला होता. त्याचा कंटाळा आल्यावर तो पाडून आता तिथे मेट्रो करणार आहेत असेही त्यांना समजले. या मेट्रोमुळे पुणेकर आनंदी असावेत असा निष्कर्ष त्या गटाने काढला.

पुणे हे राज्याचे ‘कल्चरल कॅपिटल’ असल्यामुळे इथेही एखादे ‘कॅपिटॉल’ असावे असे एका गटाला वाटले. तिथे एखादा सांस्कृतिक शपथविधी सुरू असल्यास आपल्याला तो पाहता येईल, तेही न जमल्यास भिंतीवरून चढून आत प्रवेश करता येईल असाही विचार या सदस्यांनी केला. वॉशिंग्टनमधील ‘कॅपिटॉल’वरच्या चढाईचा आदर्श त्यांच्या डोळ्यांपुढे होताच. अर्थात, तसंही काही आढळलं नाही. शनिवारवाडय़ाच्या भिंतींच्या आडोशाने सेल्फी काढणारी आणि त्यानिमित्ताने जगाचं भान हरपून स्वतःमध्येच हरवून गेलेली काही कपल्स एका गटाला दिसली. पुण्यातील ऐतिहासिक स्थळे किमान यासाठी का होईना, उपयोगी पडत असल्यामुळे ही मंडळी आनंदी असावीत असा अंदाज त्यांनी नोंदवला.

बाकी छोटय़ा छोटय़ा गल्लीबोळांतून फिरताना पुण्यात दोन-तीन महिन्यांपूर्वी धुमाकूळ घालणाऱया कोरोनाला पुणेकरांनी गर्दीत कसा चिरडून चिरडून मारले आणि सुरक्षेच्या, आरोग्याच्या नियमांसह त्यालाही पायदळी तुडवले, त्याचीही नोंद एका गटाने घेतली. आता जम्बो सेंटर्सही ओस पडली असल्याच्या बातमीने पुणेकर आनंदी असावेत असे अनुमान त्यांनी काढले. अभ्यास पूर्ण झाला. एकच एक निष्कर्ष निघाला नाही. समितीचे सगळे सदस्य एकत्र आले आणि गाडीने पुण्याबाहेर पडत असताना प्रत्येक चौकात ट्रफिकमध्ये अडकले. खिडकीतून सहज बाहेर डोकावले असता सिग्नल तोडून पुढे जाणारे काही आनंदी पुणेकर त्यांना दिसले. ते ज्या गाडय़ांना ‘कट’ मारून जात होते, त्या गाडय़ांचे चालकही आपण कसे भारी निसटलो या भावनेने आनंदी होते. वाहतूक पोलीस झाडांच्या आडबाजूला उभे राहून चालकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगत होते. काही चालक उजवा इंडिकेटर दाखवून डावीकडे वळत होते, काही जण इंडिकेटर न दाखवताच वळून ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळत होते. चौकाचौकांत आडोशाला, झाडांच्या सावलीखाली तरुण-तरुणी टिकटॉकच्या अभ्यासात आणि पुणेकर अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधूनही आनंद शोधतात. म्हणूनच ते आनंदी आहेत या निष्कर्षावर समितीच्या सगळ्या सदस्यांचे एकमत झाले आणि आनंदी मनाने समितीने गाडीतूनच आपला रिपोर्ट सादर करून टाकला!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या