
>> अभिपर्णा भोसले
गतवर्षीपासून वैद्यकीय तज्ञांनी हायड्रॉक्सिक्लोरीक्वीन, रेमडेसिवीर, आयव्हरमेक्टीन या औषधांच्या कोरोनावरील उपचारातील परिणामकारकतेविषयी विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे या औषधाचे उत्पादन आणि आयात-निर्यातीसोबतच साठेबाजीसारख्या समस्याही निर्माण झाल्या होत्या. पण यातील कोणतेही औषध अधिकृतपणे अँटी कोविड – 19 आहे, असे जाहीर करण्यात आले नव्हते. ती घोषणा सर्वप्रथम 2-डीजी या नवीन औषधासंदर्भात करण्यात आली आणि आपत्कालीन उपचारांसाठी हे औषध वापरण्याची परवानगी ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाने दिली.
राष्ट्रीय औषध नियामक असलेल्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने 1 मे रोजी कोरोना संक्रमित गंभीर रुग्णांवर आपत्कालीन उपचार करण्यासाठी 2-डीजीच्या वापराची परवानगी दिली होती. सध्या या औषधाच्या वापराची परवानगी आपत्कालीन स्थितीसाठी देण्यात आली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी या औषधाच्या उत्पादनात विक्रमी वाढ करेल आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत 2-डीजी प्रत्येक रुग्णालयात उपलब्ध असेल, असे सूतोवाच या कंपनीने केले. या औषधाच्या पहिल्या बॅचमध्ये दहा हजार डोस पुरवले जातील. इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन ऍण्ड अलाइड सायन्सेस येथील वैज्ञानिक डॉ. सुधीर चंदना यांनी दिलेल्या माहितीनुसार औषधाची किंमत औषध निर्मिती करणारी उत्पादन संस्था डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी ठरवेल आणि ती सर्वसामान्यांना परवडेल अशी निश्चित केली जाईल.
मे 2020 मध्ये ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने 2-डीजीच्या क्लिनिकल चाचण्यांना परवानगी दिली. या औषधाची सुरक्षितता आणि कार्यक्षमता तपासण्यासाठी कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये दुसऱया टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या. डीआरडीओ आणि उद्योग भागीदार डॉ. रेड्डीज लॅबॉरेटरी यांनी गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर दरम्यान 110 कोरोना संक्रमित रुग्णांवर दुसऱया टप्प्यातील चाचणी घेतल्याचे सरकारने सांगितले. यातील 2 ए या टप्प्यातील चाचण्या देशातील सहा रुग्णालयांत तर 2 बी टप्प्यातील चाचण्या अकरा रुग्णालयांमध्ये करण्यात आल्या. कोविड-19 ने बाधित असलेल्या रुग्णांसाठी 2-डीजी सुरक्षित असल्याचे आढळून आले आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे. औषधाच्या कार्यक्षमतेचा विचार करता 2-डीजी उपचार घेतलेल्या रुग्णांनी पारंपरिक उपचारांच्या (स्टॅण्डर्ड ऑफ केअर) तुलनेत लक्ष्यित लक्षणांवर प्रभावी उपचार केले. 2-डीजी औषधामुळे रोगाच्या मध्यकाळातील लक्षणांची तीव्रता कमी होण्यासाठी लागणारा कालावधी पारंपरिक उपचारांपेक्षा अडीच दिवसांनी कमी होतो. त्यामुळे रुग्ण सामान्य अनुकूल स्थितीत, पूर्वस्थितीत येण्यास मदत होते. या रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी इतर रुग्णांच्या तुलनेत लवकर निगेटिव्ह येते, असेही निरीक्षण आहे.
दुसऱया टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्याने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने नोव्हेंबर 2020 मध्ये 2-डीजीच्या तिसऱया टप्प्यातील चाचण्यांना परवानगी दिली. डिसेंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामीळनाडू या राज्यांतील 27 रुग्णालयांत 220 रुग्णांवर तिसऱया टप्प्यातील क्लिनिकल चाचणी पार पडली. तिसऱया टप्प्यातील क्लिनिकल चाचणीसंदर्भात सरकारने दिलेल्या सांख्यिकीय माहितीवरून असे दिसून आले की 2-डीजी औषधामुळे रुग्णांच्या लक्षणाचे प्रमाण सुधारले आणि पारंपरिक उपचारांच्या तुलनेत ऑक्सिजन पुरवठय़ावरील अवलंबित्व तिसऱया दिवसापर्यंत 42 टक्क्यांवरून 31 टक्क्यांवर आले. 2-डीजी हा सामान्य रेणू असून ग्लुकोज वर्गातील असल्याने त्याचे मोठय़ा प्रमाणावरील उत्पादन आणि उपलब्धता सहज शक्य आहे. 2-डीजी पावडरच्या रूपातील औषध असून ते पाण्यात विरघळवून सेवन करता येते. हे औषध विषाणू संक्रमित पेशीमध्ये प्रवेश करते आणि विषाणूची संश्लेषण तसेच ऊर्जानिर्मिती प्रक्रिया बंद पाडते. फक्त विषाणूजन्य पेशींमध्ये प्रवेश करण्याच्या वैशिष्टय़ामुळे 2-डीजी इतर औषधे आणि उपचारप्रक्रियांपेक्षा वेगळे आणि अधिक परिणामकारक ठरते. त्यामुळेच कोरोनाच्या नवीन म्युटेशन्सवर उपचार करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. या औषधाचे फायदे लक्षात घेता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्य मंत्री डॉ. हषवर्धन यांनी 17 मे रोजी स्वदेशी विकसित केलेल्या या ‘2-डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ म्हणजेच 2-डीजी या ऍण्टी-कोविड 19 औषधाच्या पहिल्या बॅचच्या अनावरणाची घोषणा केली. हे औषध डीआरडीओ आणि खासगी भागीदारीचे यशस्वी फलित आहे, असे सिंह म्हणाले.
इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन ऍण्ड अलाइड सायन्सेसचे डिरेक्टर डॉ. अनिल मिश्रा यांनी ऑल इंडिया रेडिओला दिलेल्या मुलाखतीनुसार कोरोनाच्या विषाणूची जलद गतीने होणारी वाढ शरीराची ऑक्सिजनची मागणी वाढवते, त्यामुळे विषाणूच्या ऊर्जा निर्मितीची आणि पर्यायाने वाढीची प्रक्रिया थांबवल्यास ऑक्सिजन पुरवठय़ाची समस्या आपोआप सुटेल. विषाणूचे विविध म्युटेशन्स आणि त्यातून निर्माण झालेले अधिक हानिकारक असे नवीन व्हेरियन्टस यांवर उपचार करण्यासाठी हे औषध प्रभावी ठरेल का, याबद्दल अधिक माहिती देताना डॉ. मिश्रा असे म्हणाले की, विषाणूचा व्हेरियन्ट कोणताही असला तरी ऊर्जानिर्मितीसाठी आणि नवीन विषाणू तयार करण्यासाठी तो ग्लुकोजवरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे व्हेरियन्ट कितीही हानिकारक असला तरी डीजी-2 ची परिणामकारकता तसूभरही कमी होणार नाही. दुसऱया कोरोना लाटेतील गंभीर स्थिती, वैद्यकीय सुविधांची अनुपलब्धता आणि ऑक्सिजन पुरवठय़ाअभावी होणारे मृत्यू या दुर्दैवी पार्श्वभूमीवर डीजी-2 हे औषध दिलासादायक आह,s असे म्हणता येईल.
डीजी-2 ची कार्यपद्धती
एप्रिल 2020 मध्ये कोरोनाची पहिली लाट सुरू असताना हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर ऍण्ड मॉलिक्युलर बायॉलॉजीच्या सहकार्याने इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन ऍण्ड अलाइड सायन्सेस आणि डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी केलेल्या प्रयोगांमध्ये सार्स-कोव्ह-2 च्या विरोधात प्रभावीपणे कार्य करणारे 2-डीजी रेणू आढळले. सार्स कोव्ह-2 या विषाणूमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होतो आणि प्रयोगशाळेतील निष्कर्षानुसार 2-डीजी रेणू या विषाणूची वाढ रोखतात. या रेणूंचा वापर प्रामुख्याने टय़ूमर आणि कॅन्सर पेशींवर उपचार करण्यासाठी केला जातो. हे रेणू दिसायला सामान्य ग्लुकोज सदृश असले तरी ते ग्लुकोज नाहीत. शरीरात वेगाने वाढणाऱया विषाणूला संवर्धनासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी तो विषाणू ग्लुकोजचा वापर करतो. अर्थात, विषाणू ग्लुकोजसारख्या दिसणाऱया पदार्थासही ग्लुकोज समजून त्याचे सेवन करू शकतो. ग्लुकोजच्या सेवनानंतर विषाणू जलदगतीने वाढतो आणि शरीराची ऑक्सिजनची मागणी वाढू लागते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या शरीरात विषाणूचा प्रवेश झाला आहे त्या व्यक्तीला जगण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन विषाणू काबीज करतो आणि त्यामुळे बाहेरून ऑक्सिजनचा पुरवठा केल्याशिवाय कोरोना रुग्णावर उपचार करता येत नाहीत. ज्यांनी टेस्ट उशिरा केली किंवा उपचार उशिरा घेण्यास सुरुवात केली त्यांच्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा ही निकड होऊन बसते. कोरोना संक्रमित रुग्णाच्या शरीरात 2-डीजी या ग्लुकोज सदृश पदार्थाने प्रवेश केल्यास तो कोरोना संक्रमित पेशींमध्ये प्रवेश करेल, विषाणू या रेणूला ग्लुकोज समजून त्याचे सेवन करेल, त्याला अपेक्षित असणारी ऊर्जा मिळण्याऐवजी त्याची वाढ खुंटेल आणि परिणामी विषाणू नष्ट होईल, अशी या औषधाची कोरोना संक्रमित मानवी शरीरातील कार्यपद्धती असेल.
– [email protected]
(लेखिका दिल्ली विद्यापीठात कायद्याच्या विद्यार्थिनी आहेत)





























































