
>>संजय मोने
मामा म्हणजे मानाजी माधव आणि इंदपकर म्हणजे इंदप नावाच्या गावचे रहिवासी. सध्या वय पासष्टच्या आसपास. तब्येत उत्तम. डोळय़ाला चष्मा नाही, कुठल्याही गोळय़ा घ्याव्या लागत नाहीत. सकाळी भरपूर फिरायचा व्यायाम मग मैदानाच्या कोपऱयात असलेल्या उघडय़ा व्यायामशाळेत मेहनत. वरळीला समुद्रकिनाऱयालगत आलिशान पाच खोल्यांची दोन घरं असणाऱया मामांना खरी साथ दिली ती त्यांच्या सहचारीने.
मामा म्हणजे मानाजी माधव आणि इंदपकर म्हणजे इंदप नावाच्या गावचे रहिवासी. सध्या वय पासष्टच्या आसपास. कोणीतरी सांगितली ती जन्मतारीख सरकारी कागदांवर नोंदवली गेली म्हणून वय पासष्ट. तब्येत उत्तम. डोळय़ाला चष्मा नाही, कुठल्याही गोळय़ा घ्याव्या लागत नाहीत. सकाळी भरपूर फिरायचा व्यायाम अर्धा तास, मग मैदानाच्या कोपऱयात असलेल्या उघडय़ा व्यायामशाळेत अर्धा तास मेहनत. वरळीला समुद्रकिनाऱयालगत आलिशान पाच खोल्यांची दोन घरं. एकुलता एक मुलगा बेंगळुरूला व्यवसाय करतो, मामांनी सुरू केलेला. त्यांनीच तिथे हलवला. कॉम्प्युटरशी निगडित. सध्या ते काहीही करत नाहीत. त्यांच्या शब्दात सांगायचं तर बेडूक जसा थंडाव्यासाठी चिखलात लपतो तसा मी आहे. फक्त संध्याकाळी एका क्लबमध्ये जातात. त्यांचं एक ऑफिस आहे ते घरात आहे. ऑफिस घराचं स्वयंपाकघर आहे, ते पाऊण भाग व्यापेल इतकं मोठं आहे. इंदपकर पती-पत्नी तिथे असतात. काय काय तरी नवनवीन बनवून खातात. रोज क्लाएंटचे फोन येतात. ते गाडी पाठवून त्याला ऑफिसात बोलावतात. जेवून खाऊन काम झालं की, पुन्हा गाडी त्याला सोडायला जाते. मामी (हे मामा म्हणून त्या मामी. खरं नाव माहीत नाही.) उत्तम स्वयंपाक करतात. घरात त्यांच्या मदतीला एक बाई आहे. तिचे ग्रह फार उच्चीचे असावेत, कारण ती बसून असते. सगळं मामीच करतात. त्यावरून मामा आणि मामी यांची कचकून भांडणं होतात. दोघेही एकमेकांना उगाच जास्त कष्ट करता म्हणून वाद घालतात. मोठं भांडण झालं की, मग दोन-तीन दिवस बाई स्वयंपाक करते आणि मामा आपल्या कामाच्या भेटीगाठी बंद ठेवतात, पण लगेच दोघांना कंटाळा येतो. चौथ्या दिवशी मामी स्वयंपाकघराचा ताबा घेतात आणि मामांच्या भेटी सुरू होतात. मामा व्यायाम करतात तर मामी संपूर्ण घराची झाडलोट करतात. ‘‘तब्येत उत्तम राहते. ते जिमबीम काही खरं नाही. पदरचे पैसे खर्च करून दुसऱयांची वजन उचलणं म्हणजे मूर्खपणा हो!’’
‘‘मामी, पण व्यायामाने शरीर कसं बांधेसूद होतं.’’
‘‘नोकरी धंदा करणारे तुम्ही. हवेत कशाला ते, तुम्हाला ते सिक्स पॅक का काय ते आणि ते प्रोटिन शेक कशाला? चांगला आहार घ्यावा.’’ मामी फार फार तर एसएससी असतील, पण सगळी माहिती असते त्यांना. इंग्रजी छान बोलतात.
‘‘शिकून घेतलं पुस्तकं वाचून. मामा तुमचे कमी शिकलेले. व्यवसाय करायला घेतला तेव्हा इंग्रजी मस्ट होतं. यांची ततपपची बाराखडी सुरू व्हायची.’’
‘‘मग तुम्ही का नाही त्यांच्याबरोबर व्यवसाय केलात?’’
‘‘घर कोण सांभाळणार? सगळय़ात कठीण गोष्ट आहे ती.’’ मामा इंदपकर अशा वेळी मस्त मौन पाळतात.
इंदपकरांचं बालपण फार दारुण होतं. सहा भावंडं, एक मोठा तर चार लहान. वडील लवकर वारले अति कष्ट करून. त्यांचा मालक होता मोहिते पाटील किंवा नुसता मोहिते. बाप गेल्यावर त्याने आईला सांगितलं माझ्याबरोबर राहा, सगळं मिळतंय. मोठय़ा भावाच्या कानावर ही गोष्ट पडली. त्याने एका रात्री त्या माणसाचा खून केला. नंतर कुठे गेला माहीत नाही. मी शाळेत होतो. माझे मास्तर होते गोगटे नावाचे. त्यांनी माझ्या लहान भावंडांच्या शिक्षणाचा खर्च उचलला. आईने उरलेला सगळा भार उचलला. आम्ही सगळी भावंडं कुत्र्यासारखी मेहनत करायचो. अठरा-अठरा तास काम करायचो. मला लवकर लक्षात आलं, मोठय़ा शहरात जायला पाहिजे. मुंबईत आलो. घरच्यांना माहीत नाही, पाणी पिऊन तीन दिवस राहिलो. फुटपाथवर झोपलो होतो. एका टेम्पोचा अपघात झाला होता. लिंबाचा टेम्पो, त्यातली लिंबं रस्त्यावर पसरली होती. जमेल तेवढी गोळा केली आणि दुसऱया ठिकाणी जाऊन विकली. सोळा रुपयांचा फायदा झाला. एका दुकानासमोर विकायचो, त्याचा मालक भला होता. लिंबाची पाटी ठेवायला चटकन हो म्हणाला. शिवाय, राखण करायला म्हणून दुकानात झोपायला द्यायचा. पुढे एके दिवशी मामी भेटल्या. लग्न केलं. दुकान बघता बघता त्यांचा व्यवसाय लक्षात आला. मालक एकटा होता. सगळा व्यवसाय माझ्या लक्षात आला म्हटल्यावर त्याने तो मला देऊन टाकला. त्याला महिन्याचे पैसे दिले की उरलेला फायदा माझा. तो व्यवहार आणि इंग्रजी भाषा वगैरे मला कळायची नाही, पण जिगर होती माझी म्हणजे मामी. पुढे तिच्यामुळे जम बसला. नंतर स्वतःच्या मालकीचा व्यवसाय सुरू केला. आज खूप व्याप वाढलाय, पण कॉम्प्युटरमधलं मला फारसं कळत नाही.
‘‘मामा, काय सांगताय?’’
‘‘शपथ! पण धंदा करायचा म्हणजे कष्ट करावे लागतात हे नक्की. आपली मराठी माणसं कष्टाला थोडीशी घाबरतात. आपण बुडलो तर किंवा लोक काय म्हणतील ही भीती जास्त. धंद्यासाठी घेतलेलं कर्ज डोक्यावर घेऊन झोप लागली पाहिजे. अहो! पाण्यात बुडणारा माणूस मरायच्या आधी तीन वेळा गटांगळय़ा खाऊन वर येतो आणि चौथ्या वेळेला… धंद्यातसुद्धा तीन वेळा संधी मिळते. ती घट्ट धरून ठेवली की मग सगळं उत्तम होतं. माझ्या भावंडांचं शिक्षण मी केलं. त्यांना भागीदार करतो म्हटलं, पण त्यांना ती धडाडी नाही. सगळे मोठय़ा पदावर नोकरी करतात. कोणी मॅनेजर तर कोणी प्रोफेसर. बहिणींचे नवरेही. एक चेफ आहे. दुसरा वकील.’’
मामी त्यांची चूक सुधारतात, ‘‘शेफ आहेत.’’
मामा विषय पुढे रेटतात.
‘‘तेच ते. माझ्या चुका सुधारण्यासाठी हिनं लग्न केलं की लग्न केलं म्हणून चुका सुधारते देव जाणे!’’
त्यावर कुठल्याही श्रेष्ठ अभिनेत्रीला जमणार नाही इतक्या मस्त लाजतात.
‘‘तर सांगत काय होतो? सगळय़ा भावंडांत मी कमी शिकलेला, पण आज सगळय़ात जास्त कमावतो. कारण काय? कष्ट करायची आणि धोका पत्करायची तयारी आणि त्यात मामींची जबरदस्त साथ. एकदोनदा जरा कठीण परिस्थिती आली होती. गडबडलो थोडासा, पण मामी म्हणाल्या, लिंबं विकता येतील ना गरज पडली तर! पुन्हा उभारी धरली, दुप्पट पैसा मिळाला, पण त्याचा कैफ मला कधी चढला नाही. आजही साधी गाडी वापरतो. घर मात्र मोठं घेतलं, कारण भाऊ-बहिणी आले तर हॉटेलात राहायला लागता नये त्यांना. आईला इथे यायचं नव्हतं. ती गावालाच राहते. खूप विनंत्या केल्या, पण ती सोडून यायला तयार नाही. मामींनीसुद्धा खूप वेळा सांगितलं.
जन्माला आलो इथे तर मरणसुद्धा इथेच यायचा पाहिजे, असं आई म्हणाली. गावाला जाऊन धरणं धरून बसलो होतो. सगळय़ा भावंडांनी सांगितलं, समजावलं; पण एकदा ठरलं म्हणजे त्यात बदल नाही. आता ती हवी तेव्हा येते, आमच्यापैकी कोणाकडे तरी राहते. काळजी वाटत राहते, तरीही नव्वद वय आहे हो.’’ मामांच्या डोळय़ांच्या कडा सर्द होतात.
मग मामींनी खूण केली, मामा लगेच विषय गुंडाळून म्हणाले,
‘‘चला जेवूया! कलावंत येती घरा तोचि दिवाळी दसरा.’’
ज्यांच्या घरी कायम दिवाळीसारखा आनंद असतो त्यांना कलावंतांची गरज काय?
(लेखक ज्येष्ठ अभिनेते आहेत.)






























































