माणूस जागा होईल का?

>> अॅड. गिरीश राऊत

पृथ्वीतलावरील नैसर्गिक अविष्कार हा खरं तर मालकी हक्काचा विषय नाही. मात्र माणसाने त्याच्या स्वार्थासाठी पृथ्वीवरील झाडे, डोंगर, खनिज संपत्ती, पाणी अशा सर्वच गोष्टींवर मालकी हक्क प्रस्थापित केला. पक्षी आणि पक्ष्यांची घरे ही एक अत्यंत साधी नैसर्गिक प्रक्रियादेखील माणसाच्या या हव्यासातून सुटलेली नाहीत. गवतच नष्ट झाले तर सुगरण पक्षीही नष्ट होईल. माळढोक पक्षी, चिमण्या, पेंग्विन अशा अनेक प्रजाती निसर्गावरील मानवी आक्रमणामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. खरं तर जी वेळ माळढोक, सुगरण, चिमणी आदींवर आली आहे ती नजिकच्या भविष्यात माणसावरही येऊ शकते. मात्र माणूस जागा होईल ही बहिणाबाईंची अपेक्षा पूर्ण होईल का?

सुगरण पक्षी गवताची पाती विणून घरटे बांधतो. गवत गेले तर सुगरणही जाईल. इतर पानांचा वापर त्याला करता येणार नाही, हे नाते इतके नाजुक आहे. त्या त्या पक्ष्यांची, घरटय़ांची व अंडे घालण्याची पद्धतही वैशिष्टय़पूर्ण आहे. तितर पक्षीण जमिनीवर अंडे घालते. एक मीटर उंच माळढोकची मादी, आसपासच्या माळरानाच्या रंगात मिसळून जाणारे व सहज ओळखू न येणारे फक्त एकच अंडे वर्षातून घालते. बुलबुल व इतर पक्ष्यांच्या घरटय़ांची पद्धत, झाडे, अधिवास व साहित्यही वेगवेगळे आहे. ध्रुव प्रदेशातील ‘ऍडली’ व ‘एम्परर’ हे तीन ते पाच फूट उंच, पेंग्विन आणि अल्बेट्रॉस, आर्क्टिक टर्न आदी पक्षी खडकांमधील बशीसारख्या खड्डय़ांमधे अंडी घालत. तापमान बहुतेक काळ शून्याखाली असल्याने तेथे पाऊस किंवा बर्फ पडत नसे.

केवढी विविधता होती, पण माणसाने यंत्र व पाठोपाठ सिमेंट बनवले. एक साधी रासायनिक प्रक्रिया आणि पक्ष्यांची घरे, अधिवास आपण उद्ध्वस्त करत सुटलो. सोलापूरमधील माळरानं शहरीकरणात जाताहेत आणि आपण थंडपणे माळढोकांचे नामशेष होणे पाहत आहोत. ध्रुव प्रदेशातील तापमान आता वर्षातील बहुतेक काळ शून्यावर राहू लागले. आता अंटार्क्टिकावर मुसळधार पाऊस व बर्फ पडतो. पेंग्विन व इतर पक्ष्यांना खडकांच्या खळग्यांत अंडी उबवणे शक्य नाही. प्रजनन संपुष्टात आले. शंभर वर्षांपूर्वी पृथ्वीवर पशु, पक्षी, कीटक, मासे, वनस्पती अशांच्या सुमारे वीस कोटी प्रजाती नांदत होत्या. सूक्ष्मजीव जिवाणूंच्या सुमारे चाळीस कोटी प्रजाती होत्या. औद्योगिकरण, शहरीकरणामुळशंभर वर्षांत सुमारे 75 टक्के जीवसृष्टी गमावली आहे.

तापमानवाढीच्या आजच्या काळात रोज हजारोंच्या संख्येने प्रजाती नष्ट होत आहेत. आपण जैविक विविधता कायद्याबाबत अलिप्तपणे बौद्धिक परिसंवाद आयोजित करत आहोत. आपण त्यांचे उच्चाटन करत आहोत. आपलेही उच्चाटन सुरू झाले आहे तरी आपल्याला वाटत नाही की आता थांबावे.

डार्विनच्या संशोधनामुळे व उक्रांती वादाच्या सिद्धांतामुळे पृथ्वी आणि सजिवांच्या जडणघडणीचा परस्पर संबंध आहे, हे कळले होते. मग, जेम्स वॅटच्या वाफेच्या इंजिनाच्या रूपाने आलेल्या स्वयंचलित यंत्राला, नंतरच्या तंत्रज्ञानाच्या शोधांना व डार्विनच्या सुमारास होत असलेल्या एडिसनच्या विजेचा दिवा व इतर शोधांना पृथ्वीवर मोकळे रान का दिले गेले? सृष्टीचे नियम सूत्ररूपात मांडणारे विज्ञान त्याच अमूर्त रूपात राहणे जरूर होते. त्यांना जड, भौतिक, उपयोजित रूपात प्रत्यक्ष जीवनात आणणे ही चूक झाली. डार्विनच्या ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’चा ‘बळी तो कान पिळी’ असा, अगदी चुकीचा अर्थ जगात प्रसृत केला गेला. हे सतत चालू राहिले व मानव जातीची दिशाभूल होत राहिली.

बहिणाबाई म्हणतात, ‘सुगरण पक्ष्याची चोच हीच हात, तीच दात, तीच ओठ. माणसा, तुला दोन हात व दहा बोटे देवाने दिली.’ (दात, ओठ तर आहेतच.) मग ते वापरण्याऐवजी माणूस यंत्र का वापरत आहे? आता दिसणारे जीव तसे आहेत, यामागे उक्रांती तत्त्वाचे करोडो वर्षांचे अविरत कार्य आहे. खुद्द माणसात झालेले बदल हे माणसाचे स्वतःचे कर्तृत्व नाही.

माणसाने त्याचा, पृथ्वीच्या जडणघडणीशी असलेला संबंध लक्षात न घेता अडीचशे वर्षांपूर्वी स्वयंचलित यंत्र आल्यावर ऊर्जेसाठी, जळाऊ लाकडासाठी युरोपची जंगले कापणे सुरू केले. कोळशासाठी पृथ्वीला खोदणे सुरू केले. यंत्रावर करोडो वस्तू अल्प काळात निर्माण होऊ लागल्या. म्हणून खनिजांसाठी डोंगर व इतर भूमी, पृथ्वीचे कवच, भूगर्भ उखडण्यास सुरुवात केली. सन 1824 मध्ये प्रथम सिमेंट तयार केले व पृथ्वीची कबर बांधण्यास सुरुवात झाली. यंत्रासाठी वाफ, वाफेसाठी पाणी, सिमेंटसाठी, सर्व औद्योगिक उत्पादन प्रक्रियेसाठी, वीजनिर्मितीसाठी असा ‘पाणी’ या जीवनाचा मूळ आधार असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या द्रवाचा बेछूट गैरवापर सुरू केला. झाडावर, डोंगरावर, खाजणावर किंवा पृथ्वीच्या कोणत्याही आविष्कारावर ‘मालकी हक्क’ ही संकल्पनाच चूक आहे. ही गोष्ट लवकरच नष्ट होत असल्याची जाणीव झाल्यावर मानव जातीला कळेल. जर आधी, आताच कळले तर कदाचित नष्ट होणे टळेल. बहिणाबाईंना अपेक्षित असा माणूस जागा होईल अशी अपेक्षा आहे.

(लेखक भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळीचे निमंत्रक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या