पंचांग विदुषी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनिकेत कुलकर्णी

हिंदू संस्कृतीत पंचांगाला महत्त्वाचे स्थान आहे. नागपूरहून प्रसिद्ध होणारे वैदर्भीय पंचांग या गुढीपाडव्यात शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. मुख्य म्हणजे पंचांगाचे गणित करण्यापासून तिथी, नक्षत्र, योग आणि राशीफल या सर्व जबाबदाऱया विद्याताई राजंदेकर सांभाळतात… महाराष्ट्रातील एकमेव पंचाग विदुषी म्हणून विद्याताई यांचे काम महिला सबलीकरणाचे उदाहरण म्हणता येईल…

आपल्या संस्कृतीमध्ये पंचांगास अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंचांग हे केवळ कालवाचक नाही. फक्त तारीख वार, संवत्सर, तिथी, नक्षत्र हे जाणून घेणे हाच पंचांग करण्यामागचा उद्देश नसतो. पंचांगामध्ये दिनमानासोबत दिनचर्या कशी असावी, नीतिनियमांचे पालन कसे करावे याचेही ज्ञान दिले जाते. म्हणूनच आपल्या घरात पंचांग एवढे आवश्यक झाले आहे की, ते आपले एक अंग बनले आहे. नागपूरहून प्रसिद्ध होणारे वैदर्भीय पंचांग हे अशा पंचांगांपैकी एक आहे. पंचांगांच्या सर्व वैशिष्टय़ांनी अलंकृत असलेले हे पंचांग यंदाच्या गुढीपाडव्यास 100 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या पंचांगाचे एक वैशिष्टय़ असे की, ते पंचांग विद्याताई अरुणराव राजंदेकर या संचलित करतात. महाराष्ट्रातल्या त्या एकमेव महिला पंचांगकर्त्या असून पंचांगाचे गणित करण्यापासून तिथी, नक्षत्र, योग आणि राशीफल हे सर्व जबाबदाऱया विद्याताई सांभाळतात.

शंभरीत पदार्पण करणाऱया या पंचांगाची सूत्रे विद्याताईंनी 1970 मध्ये आपल्या हाती घेतली. त्यांचे आजेसासरे हरिहर सीताराम राजंदेकर यांनी 1911 मध्ये महाराष्ट्रीय पंचांग या नावाने हे वैदर्भीय पंचांग सुरू केले. हरिहर सीताराम राजंदेकर हे निष्णात वैद्य होते. त्यांना आयुर्वेदाचे ज्ञान होते. आयुर्वेदीय उपचार हे दिनमान, प्रहर, घटिका यावर अवलंबून असतात. त्यामुळे आपसूकच ऍस्ट्रॉलॉजीचा अभ्यास व त्यायोगे पंचांग विद्या शिकून पंचांगाची निर्मिती केली. हरिहररावांनंतर त्यांचे चिरंजीव वामन हरिहर राजंदेकर म्हणजे विद्याताई राजंदेकरांचे सासरे यांनी महाराष्ट्रीय पंचांगाचे काम हाती घेतले. गणिताची आवड असल्यानेच वडिलोपार्जित पंचांग कलेविषयी त्यांना आवड निर्माण झाली. त्यांनी वैदर्भीय महाराष्ट्र पंचांगासोबत भारतवर्षीय राशीभविष्य हे प्रकाशन सुरू केले. ही विद्या पुढच्या पिढीने विकसित करावी या हेतूने त्यांनी त्यांच्या स्नुषा विद्याताई राजंदेकर यांना यात तरबेज केले. आपल्या या विद्यार्जनाबद्दल विद्याताई अगदी भरभरून बोलतात. 1970 मध्ये विद्याताईंचा विवाह वामनरावांचे चिरंजीव प्रसिद्ध सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) अरुणराव राजंदेकर यांच्याशी झाला. लग्नानंतर विद्याताईंना पंचांग निर्मितीत प्रोत्साहन दिले ते त्यांच्या सासूबाई पद्माबाई राजंदेकर यांनी. विद्याताईंना या विषयाची गोडी होतीच. पंचांग विद्या आत्मसात करण्यामागचा कल ओळखून त्यांच्या सासुबाई पद्माबाईंनी विद्याताईंसाठी प्रयत्न केले. जातकबोध कार्यालयात ज्योतिष विद्या व पंचांगविद्या शिकण्यासाठी त्यांनीच पाठपुरावा केला. विद्याताईंची ग्रहण शक्ती लक्षात घेऊन वामनरावांनी त्यांना पंचांग विद्येचे ज्ञान दिले. विद्याताईंनीही अत्यंत मनŠपूर्वक पंचांगविद्या आत्मसात केली आणि वामनरावांनीही उदार मनाने विद्याताईंना पंचांग निर्मितीतील सर्व बारकावे शिकविले. त्यावेळी वामनरावांचे नांदेड येथे स्थायिक झालेले बंधू श्रीपादराव राजंदेकर हे पंचांगांचे गणित करण्यात वामनरावांना मदत करीत असत. विद्याताईंनी त्यांच्याकडूनही पंचांगाच्या गणिताचे धडे घेतले.

विद्याताईंनी संसार आणि घर सांभाळत पंचांगविद्या आत्मसात केली. त्यांचे पती अरुण यांनी महाराष्ट्रीय पंचांगाचा विस्तार विदर्भातून महाराष्ट्रभर केला. आज त्याला महाराष्ट्रातूनच नव्हे, तर परराज्यातूनही मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. विद्याताईंनी हे क्षेत्र स्वतŠपुरते मर्यादित न ठेवता यात सुनेलाही सहभागी करून घेतले आहे. पंचांगविद्येचा प्रसार व्हावा आणि ही कला अधिकाधिक विकसीत व्हावी या उद्देशानेच विद्याताई सुनेस पंचांग व ज्योतिष विद्येत पारंगत करीत आहेत. महाराष्ट्रातील एकमेव महिला पंचांगकर्त्या म्हणून विद्याताईंनी केलेले हे कार्य महिला सबलीकरणाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणायला हवे.

– [email protected]