रिमेक आणि बॉलीवूड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. अनिल कवठेकर

 रिमेक केवळ चित्रपटांचाच होतो असे नाही तर तो वास्तूंचा, नाटकांचासुद्धा होतो. कारण रिमेक ही एक अत्यंत अभ्यासपूर्ण, वेळखाऊ, क्रिएटिव्ह, झोकून देऊन काम करावी लागणारी अशी ती कृती आहे. ती जर जमली तर ठीक, नाही तर फसगत होऊ शकते.

रिमेक हा मानवी स्वभाव आहे. जे सुंदर, भव्य आहे. अगदी तसंच आपणही निर्माण करावं, असं वाटणं हे स्वाभाविक आहे.  ‘मेरा नाम राजू घराना अनाम… ’ राज कपूरचं हे गाणं आणि ‘गाईड’मधली देव आनंदचा ‘राजू गाईड’ ही व्यक्तिरेखा लोकप्रिय  झाल्या. 1965 नंतर जन्मलेल्या प्रत्येक दहा मुलांमध्ये एकाचं नाव तरी राजू असायचं. कारण त्या गाण्यातल्या निर्मितीला, चित्रपटातल्या अभिनयाला, त्या कलाकृतीला पसंतीची पावती देण्याचे जे विविध पर्याय असतात त्यापैकी एक म्हणजे आपल्या मुलाला नायकाचे नाव देणे.

तसंच सिनेमाचा रिमेक करणे हादेखील दाद देण्याचा एक पर्याय आहे. रिमेक केवळ चित्रपटांचाच होतो असे नाही तर तो वास्तूंचा, नाटकांचासुद्धा होतो. कारण रिमेक ही एक अत्यंत अभ्यासपूर्ण, वेळखाऊ, क्रिएटिव्ह, झोकून देऊन काम करावी लागणारी अशी ती कृती आहे. ती जर जमली तर ठीक, नाही तर फसगत होऊ शकते.

वि. वा. शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’ नाटक हे शेक्सपियरच्या ‘किंग लियर’ या नाटकावरून घेतलेले आहे. शिवाय ‘नटसम्राट’मधली प्रमुख व्यक्तिरेखा गणपतराव बेलवलकर पहिल्यांदा डॉ. श्रीराम लागू, त्यानंतर दत्ता भट, मग यशवंत दत्त यांनी साकारली. म्हणजे प्रत्येक वेळी ते नाटक रिमेकच होते आणि या तिघांनी साकारलेले ‘‘गणपतराव बेलवलकर’’ अजरामर झालेले आहेत. ‘नटसम्राट’ नावाचे मराठीत दोन चित्रपट आले. एक मोहन जोशी यांचा आणि दुसरा नाना पाटेकरांचा. म्हणजे मूळ ‘किंग लियर’ नाटकातून रूपांतरित केलेला नटसम्राट, त्यानंतर त्याचे विविध अभिनेत्यांनी केलेले नाटय़ प्रयोग, त्यानंतर त्याचे तयार झालेले चित्रपट म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून या नाटकाचा रिमेक होत गेला.

    रिमेकची सुरुवात 1967 साली दिलीप कुमार यांच्या ‘राम और श्याम’ने झाली. मूळ तेलगू ‘रामडू भीमडू’ या चित्रपटाचा तो पहिला रिमेक  होता. हल्लीच्या काळात दाक्षिणात्य सुपरहिट  चित्रपटांचा रिमेक बनवण्याची जणु स्पर्धा सुरू झालेली आहे. काही रिमेक मूळ चित्रपटाइतकेच यशस्वी  झाले आहेत, तर काही त्यापेक्षा जास्त यशस्वी झालेले आहेत. जसे रावडी राठोड, गजनी, सिंघम, दृश्यम… या चित्रपटांचा तर तेलगु, मल्याळम आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये रिमेक झालेला आहे.

आपल्या देशात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. दुसऱयाच्या विचारांचा सन्मान करून ते विचार जर आपल्याला आवडले नसतील वा मान्य नसतील तर ते योग्य शब्दात मांडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. त्या विचारांचा विरोध करण्याचेही स्वातंत्र्य आहे. पण काही व्यक्तींना देशातील लोकशाहीबाबत फारशी आस्था नसल्याने आम्ही सांगू तेच खरे असे हुकूमशाहीचे धोरण अवलंबले आहे. ही मंडळी साहित्य, चित्रपट, नाटक… या सगळय़ांवर सेन्सर कमिटीच्या बाहेरचा अंकुश लावण्याचे काम करत असतात आणि ते लोकशाहीला घातक आहे.

देशातील बेकारी, महागाई या विषयावर आंदोलन करण्याच्या ऐवजी ही मंडळी सध्या ‘लालसिंग चढ्ढा’ या चित्रपटावर बहिष्कार टाकून आंदोलन करत आहेत. जिथे सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली आहे त्या सेन्सॉर बोर्डावर यांचा विश्वास नाही. म्हणजेच या देशातील  लोकशाहीवर त्यांचा विश्वास नाही याचा असाच अर्थ होतो.

   मुळात चित्रपट हा मनोरंजनासाठी आहे. जर प्रेक्षकांना आवडला नाही तर तो बॉक्स ऑफिसवर चालणार नाही. पण तो आपटलाच पाहिजे ही कृती मात्र निंदनीय आहे. ‘फॉरेस्ट गम्प’ हा इंग्रजी चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाला होता. जगातल्या दहा सर्वेत्तम चित्रपटांपैकी एक. त्याचा रिमेक करावा, असे जर सृजनशील अभिनेत्याला वाटणे साहजिकच आहे. हॉलीवूड चित्रपटाचा रिमेक करताना त्याला देशी टच देणे गरजेचे असते. कथेच्या गरजेनुसार रिमेकमध्येही लालसिंग भारतीय सैन्यात भरती होतो. युद्धावर जातो. तो स्लो लर्नर असतो. त्यामुळे त्याला सैन्यात दाखवून तुम्ही सेनेचा अपमान केला आहे. या मुद्यावर आम्ही बहिष्कार करत आहोत आणि काही वर्षांपूर्वी आमिर खानने एका हिंदू लेखक व हिंदू निर्मात्यासोबत बनवलेल्या एका चित्रपटात देवी-देवतांचा अपमान केला म्हणून आम्ही आज त्याचा बहिष्कार करत आहोत.

पण चित्रपट हे वास्तव आहे. ते सत्य आहे. तोच इतिहास आहे आणि  हे तर आपण केव्हापासून स्वीकारले आहे. तुम्ही चित्रपट पहा. तुम्हाला हवी तशी त्याची समीक्षा लिहा. ते स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच. ‘‘हकीकत’’ नावाच्या युद्धपटातही एका सैनिकाला प्रचंड खोकला झालेल्याचं दाखवले होते. म्हणजे त्याला काही आजार होता तरी तो युद्धावर होता. मग आजारी सैनिक दाखवला म्हणून त्या चित्रपटावर बहिष्कार टाकणार असं कोणी त्या काळात म्हटलं नव्हतं.

‘पुष्पा, द फायर’मध्ये पोलीस पुष्पाला काठय़ा तुटेपर्यंत मारतात. इतके मारतात की मारून मारून पोलीस थकून जातात. पण पुष्पा हसत असतो. पुढे पुष्पा स्वतŠच्या मुठीत पिस्तुलातून गोळी झाडतो. हे सर्व वास्तव असू शकते का? पण चित्रपटात दाखवले गेले. तो चित्रपट आहे म्हणून ते स्वीकारलेही गेले. मग ‘‘लालसिंग चढ्ढा’’ची समीक्षा करताना समीक्षकांना हे का मान्य नाही? कारण त्याचा नायक आमिर खान आहे म्हणून…

‘‘लालसिंग चढ्ढा’’मधला जो प्रेरणादायी भाग आहे त्याकडे जाणीवपूर्वक समीक्षक दुर्लक्ष करत आहेत. लालसिंगच्या आईला माहीत आहे की आपल्या मुलाला चालण्यात अडचणी आहेत. शिकायला वेळ लागतो. तरीही त्याला स्वतŠचे काम स्वतŠच करायला ती भाग पाडते. तू अपंग नाहीस, हा आत्मविश्वास ती वेगवेगळ्या दृश्यातून त्याला देताना दिसते. त्याची आई त्याला सकारात्मक ऊर्जा देते. ‘बेटा जीवन आश्चर्य से भरा है, कब क्या होगा पता नही…’ आईची जबाबदारी या संदेशातून दिसते. काहींचा यावरही आक्षेप आहे. ज्याला चालता येत नाही, तो धावतो कसा आणि यशस्वी होतो कसा? अमेरिकेची अॅथलिट विल्मा रुडोल्फची कथा तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. जिला लहानपणी पोलिओ झाला होता, पण त्यावर मात करून तिने ऑलम्पिकमध्ये यशाचा मोठा इतिहास रचला आहे. विल्माची आई ही तिला कधीही तू अपंग आहे असे म्हणत नसे. ती तिला नेहमी तू धावू शकत असं सांगायची. त्यामुळेच या आत्मविश्वासाने ती पुढे धावली. यशस्वी झाली. अगदी तसाच आत्मविश्वास लालसिंगची आई त्याला देताना  दिसते. आपल्या दुबळ्या मुलाला जगण्याची जिद्द देणारी आई. यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा. कारण चमत्कार होतात. विल्मा रुडोल्फ एक पोलिओ असणारी मुलगी आपल्या पोलिओवर मात करून ऑलिंपिक जिंकू शकते हा चमत्कारच आहे. बहिष्कार करून किंवा चित्रपटांचे प्रमोशन करून चित्रपट चालत नसतात की आपटत नसतात. नाहीतर ‘पृथ्वीराज’चे प्रमोशन देशाच्या गृहमंत्र्यांनी करूनही तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटलाच होता. धाकड, बच्चन पांडे, समशेरा, हिरोपंती, जयेश भाई जर्सी या चित्रपटांचा कोणीही बहिष्कार केला नव्हता तरीही ते चित्रपट आपटलेच.

लोकशाहीत चित्रपट पाहायचा की नाही, हे प्रेक्षकांनी ठरवायचे आहे. बहिष्कार केल्याने फार तर दहा ते पंधरा टक्के फरक पडत असेल, पण प्रेक्षकांना आवडलेला चित्रपट हा यशस्वीच होतो.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)