
>> अरुण इंगवले
अॅड. विलासराव पाटणे यांनी लिहिलेले रामशास्त्रींचे चरित्र हा त्यांचा साहित्यिक कारकिर्दीचा महत्त्वाचा टप्पा आहे. ऐतिहासिक व्यक्तिरेखांसंबंधी लिहिण्यासाठी प्रचंड व्यासंग, चिकाटी, धाडस आणि सर्जनशीलतेची फार मोठी पुण्याई गाठीशी असावी लागते. अॅड. पाटणे यांनी हे सर्व संभावित धोके स्वीकारून रामशास्त्राRसारखा चरित्रनायक निवडला यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत.
हे चरित्र केवळ रामशास्त्रींचे चरित्र राहत नाही तर पेशवाईचा सामाजिक, धार्मिक, राजकीय असा भव्य पट ते कवेत घेते. शब्द प्रकाशनाने अतिशय देखण्या स्वरुपात पुस्तक प्रकाशित करून या लिखाणाला न्याय दिला आहे. विक्रम परांजपे या कवी हृदयाच्या जाणत्या चित्रकाराच्या चिंतनातून साकारलेले आशयघन देखणे मुखपृष्ठ या पुस्तकाच्या वैभवात आणखी भर घालते.
संसद/विधिमंडळे, न्यायपालिका, प्रशासन, पत्रकारिता हे लोकशाहीचे चार स्तंभ समजले जातात. यातील एक पाय जरी कमी पडला किंवा सडला तर लोकशाहीची भक्कम इमारत डगमगू लागते. राजव्यवस्थेवर आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम न्यायपालिका आणि पत्रकारितेने करावे, अशी अपेक्षा असते. एक विधिज्ञ म्हणून न्यायपालिकेचे महत्त्व जाणणारे अॅड. पाटणेंसारखे लेखक रामशास्त्राr केवळ चरित्र म्हणून मांडणे शक्य नसते. वर्तमानाच्या कालपटावर रामशास्त्रीच्या चरित्राचा आढावा घेऊन त्यांना नवा आदर्श समाजासमोर उभा करायचा असतो. रामशास्त्राRची निर्भीडता, न्यायनिष्ठूरता, स्पष्टवत्तेपणा, निःपक्षपातीपणा, निर्मोहीपणा हे गुण पुन्हा एकदा समाजासमोर आणून देदीप्यमान इतिहास सांगता सांगता नकळत काही आदर्शांची पेरणी समाजात करावी हा या लेखनप्रपंचामागचा अंतस्थ हेतू असू शकतो. आपल्या कारकिर्दीत रामशास्त्री ही व्यक्तिरेखा दंतकथा होऊनच वावरत होती. माहुली गावच्या जोसकिचे व काwलकर्णीपणाचे हक्क असणाऱया विश्वनाथ भट्टांचा अतिशय उनाड आणि व्रात्य मुलगा अशी रामशास्त्रीची ओळख झाली होती. आईवडील अकाली निवर्तल्यावर दांडगाई, मारामारी, उडाणटप्पूपणा करणाऱया रामला चुलत्यांनी हाकलून दिले. किशोरवयीन रामशास्त्रीच्या स्वभावाचा एक छान पैलू लेखकाने चितारला आहे. सातारच्या अनगळ सावकारांकडे पाणक्या आणि सांगकाम्या म्हणून राम काम करू लागला. एकदा अनगळ सावकार बहिर्दशेवरून आल्यावर त्यांच्या हातावर पाणी घालताना रामचे लक्ष त्यांच्या कानातल्या मोत्यांच्या भिकबाळीवर स्थिरावले आणि धार चुकू लागली. सावकारांनी रामचा अपमान केला ‘अरे यःकश्चित पाणक्या तू, आणि भिकबाळीकडे काय पाहतोस? तुझी लायकी आहे काय?’ हे वर्मी बसलेले शब्द रामच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. शागीर्दाचा शास्त्री होऊन दाखविन तरच मुलुखात तोंड दाखविन अशी प्रतिज्ञा केलेला राम अध्ययनासाठी काशीस गेला आणि रामशास्त्राr होऊनच परतला. त्यांच्या ज्ञानामुळे नानासाहेब पेशव्यांनी त्यांच्यावर धर्म खात्याची जबाबदारी सोपवली. धर्म खाते सांभाळताना रामशास्त्रींच्या तर-तम बुद्धीवर प्रकाश टाकणारा महत्त्वाचा प्रसंग लेखकाने या चरित्रात सांगितला आहे. श्रीमंत कर्नाटक मोहिमेवर असल्याने रमण्याची जबाबदारी रामशास्त्रींवर होती. भिक्षुकांचे ज्ञान पारखुन ते दक्षिणा कमी जास्त देत असत. काही भिक्षुक कुजबुजले ‘तुम्ही दक्षिणेत हात आखडता का घेता, श्रीमंतांसारखे औदार्य दाखवा.’ रामशास्त्रींनी त्या क्षणीच त्यांना फटकारले ‘ही दक्षिणा विद्वत्तेचा, ज्ञानाचा आदर करण्यासाठी आहे, जातीचा नव्हे.’ तोतया प्रकरण, बारभाई कारस्थान, निजामाकडून झालेली पुण्याची लूट या प्रसंगी रामशास्त्रींनी दाखवलेला समतोलपणा, न्यायीपणा, धिरोदात्तपणा लेखकाने प्रभावीपणाने मांडला आहे. नारायणरावांच्या खुनाचा प्रदीर्घ तपास करून राघोबाला सुनावलेला देहान्त हा तर रामशास्त्रींच्या आयुष्यातील अत्यंत तेजस्वी प्रसंग. रामशास्त्राRच्या निर्भीडता, स्पष्टवत्तेपणा, न्यायनिष्ठूरता, निःपक्षपातीपणा, निर्मोहीपणा या गुणांना लेखकाने अतिशय प्रभावीपणे वाचकांसमोर पेश केले आहे.
वाचकांच्या सोयीसाठी काही कठीण शब्दांचे स्पष्टीकरण देणारे परिशिष्ट पुस्तकात जोडले आहे. रामशास्त्रीसंबंधिचा पत्रव्यवहार आणि महत्त्वाची पत्रे अशी दोन स्वतंत्र प्रकरणे या पुस्तकात अंतर्भूत आहेत. आणि शेवटी दिलेल्या 22 संदर्भ ग्रंथांच्या यादीने या पुस्तकाचे महत्त्व आणि अधिकृतपणा अधोरेखित केला आहे. इतिहासप्रेमींसोबतच न्याय व्यवस्थेतील व्यक्ती आणि सर्वसामान्य वाचकांनाही समाधान मिळवून देणारे हे पुस्तक आहे.
रामशास्त्री
लेखक ः अॅड. विलास पाटणे
प्रकाशक ः शब्द प्रकाशन
मूल्य ः रुपये 150/-





























































