परीक्षण – शांत, समंजस जहाज-आख्यान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण म्हात्रे

‘अनंत अमुची ध्येयासक्ती
अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला!’

कविवर्य कुसुमाग्रजांनी दर्यावर्दी जवानाच्या गौरवार्थ लिहिलेले हे सूक्त केवळ खलाशांसाठी नाही, तर जगण्याच्या संघर्षात प्रत्येक तुफानाशी दोन हात करीत टिकून राहिलेल्या सर्व लढवय्यांसाठी आहेत. मला मात्र या ओळींची सतत याद आली ती प्रथम रामदास म्हात्रे यांचे सृजनसंवाद प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले ‘सातासमुद्रापार’ हे बोटीवरच्या अनुभवांचे कधी थरारक, कधी सुखकारक असे रसाळ कथन वाचताना.

एखादे रसभरीत प्रवासवर्णन वाचावे असे मला वाटते आहे आणि प्रत्येक प्रकरणागणिक काहीतरी अद्भुत, काहीतरी विलक्षण वेगळे वाचायला मिळेल या आशेने पान-पान उलटतो आहे. प्रथमच्या लेखणीत एक सुबोध संवाद आहे, तो याला कारणीभूत आहेच, पण या व्यवसायातील बारीकसारीक तपशील देत वाचकाला तिथे घेऊन जाण्याची एक विशेष हातोटी प्रथमच्या कथनात आहे, ती दाद देण्यासारखी आहे. यातले एकही प्रकरण ना चुकवावेसे वाटते, ना पान पलटून पुढे निघावे असे वाटते. साऱया लाटा अंगावर घ्याव्यात तसे लेखन फारसे येत नाही, आलेले नाही. मराठीत तर हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा लेखकांनी या समुद्राच्या पाण्याला स्पर्श केलाय. प्रथमच्या या लेखनाचं वैशिष्टय़ असं की, त्यांनी लेखक वगैरे म्हणून पोझ घेऊन हे लिहिले नाही. या अफाट अनुभवाने तोही आवाक झालाय, भारावून गेला आहे आणि त्याच भारावल्या स्थितीत त्यानं हे अनुभव भराभर डायरी लिहावी तसे लिहिलेत. लिहिताना त्याच्या मनात ना याचे पुस्तक करण्याचे होते ना आपण लेखक वर्गात जाऊ अशी कल्पनाही त्याला नसेल. त्यामुळेच त्याचे हे लेखन इतके पारदर्शी, इतके सुबोध, इतके वाचनीय आणि वाचणाऱयाला थेट बोटीवर घेऊन जाणारे झाले आहे.

फार वर्षांपूर्वी विश्राम बेडेकर यांची ‘रणांगण’ ही कादंबरी, मग आमचे मित्र, कादंबरीकार अनंत सामंत यांची ‘एमटी आयवा मारू’ ही कादंबरी आणि अलीकडे वाचायला मिळालेले ‘समुद्रायन’ हे कॅप्टन वैभव दळवी यांचे समुद्रावरील त्यांच्या प्रवासाच्या अनुभवांचे कथन हाच समुद्रावरील अनुभवांचा आपला संबंध. एरवी हे जग संपूर्ण मराठी विश्वाला अपरिचित. प्रथमच्या लेखनाने पुन्हा एकदा मराठी लेखनविश्वाचे समुद्रद्वार किलकिले केले आहे आणि तेही एखाद्या प्रथितयश लेखकाच्या थाटात!

प्रथम हा आमच्या कुटुंबातील बहुतेक पहिला माणूस जो मर्चंट नेव्हीच्या माध्यमातून सातासमुद्रापार आणि तेही बोटीवरून गेलेला. खूपदा अशी कामात व्यग्र आणि तत्पर असलेली माणसे लेखनाकडे वळत नाहीत. आपले काम बरे नि आपण बरे अशी एक वृत्ती त्या लोकांत असते. प्रथम मात्र बोटीवरचे ते सारे अनुभव घेता घेता त्याच्या नीट नोंदी मनात करीत होता आणि निगुतीने त्या लिहूनही काढत होता. सर्व जग हे चारही बाजूंनी समुद्राने वेढलेले जरी असले तरी साहित्यात हे ‘चहुकडे पाणी’ आणि विचारपूर्वकता ही चकित करणारी आहे. समुद्र आपल्याला कसे विशाल बनवतो, खोल बनवतो आणि तरंगांसारखे तरल करतो याचा वस्तुपाठ म्हणजे प्रथमचे ‘सातासमुद्रापार’ हे आत्मकथन. हे काही आत्मचरित्र नाही किंवा हे प्रवासवर्णनही नाही. हे आहे प्रथमचे ‘समुद्र आख्यान’ किंवा ‘जहाज आख्यान’!

खरं तर ही काही कादंबरी नाही. त्यामुळे कादंबरीत जशी पात्रे उभी करतात, तशी पात्रे उभी करण्याचे लेखकाला बंधन नाही. आणि इथे तर सारी माणसे खरी, अस्तित्वात असलेली, पण प्रथम त्यांचे तपशील देताना इतक्या सूक्ष्मपणे त्यांची माहिती देतो की, त्याचे कथन विश्वासार्ह वाटेल अशी पात्रे उभी करतात, उभी राहतात आणि ही पात्रे उभी करण्यासाठी लागणारी पात्रांविषयीची आत्मीयता, जवळीक आणि त्यांचे-लेखकांचे अदृश्य नाते ही या पात्रांशी प्रथमला जोडणारी भावना आहे हे आपल्याला जाणवते. या पुस्तकाच्या सर्व प्रकरणांत ही आत्मीयता, ही सहानुभूती आणि मित्रत्वाची भावना दिसते. बोटीवरचा सर्व परिवार प्रथमबरोबरच आपल्या सोबत प्रवास करीत आहे असेच आपल्याला वाटते. प्रथमच्या लेखनात जो एक चित्रदर्शीपणा आहे, त्याची मजा त्याचे हे लेखन सलग वाचल्यावर लक्षात येते. जहाजावरची फिल्म पहावी तसे हे लेखन आहे. प्रथम आपणांस इंजिन रूममध्ये, बोट केबिनमध्ये, डेकवर, त्याच्या स्वतःच्या रूममध्ये, इतकेच काय, रेस्क्यू बोटीत पण घेऊन जातो. कथनाची ही विलक्षण प्रभावी पद्धत आहे.
हे लेखन वाचताना मनात सतत येत राहिले की, प्रथम्सोबत काम करणाऱया माणसांविषयीही प्रथमने जे लिहिले आहे ते त्यांची व्यक्तिमत्त्वे उभी करणारे आहे. , पण ज्या एका अनुबंधाने प्रथम त्या माणसांशी जोडला गेला ते अनुबंध आपल्यालाही त्यांच्याशी जोडून घेतात. पुस्तक वाचताना त्यातील माणसे, त्यातील स्थळे आणि त्यातील वातावरण याची वाचकांशी जवळीक होणे महत्त्वाचे असत. या पुस्तकाचे मुखपृष्ठ मंदार नेने यांनी साकारले असून समर्पक अशी रेखाचित्रे गीतेश शिंदे यांनी रेखाटली आहेत.

सातासमुद्रापार (ललित लेखसंग्रह)
लेखक ः प्रथम रामदास म्हात्रे
प्रकाशक ः सृजनसंवाद प्रकाशन
पृष्ठs ः 192, मूल्य ः रुपये 250/-