दिवाळीचे ऋण…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अशोक हांडे

कलाक्षेत्रात स्वत:ला आजमावताना दिवाळी सणाचं महत्त्व आजही तितकंच अबाधित आहे. माझ्या प्रत्येक नवीन कार्यक्रमाचा शुभारंभ दिवाळीच्या निमित्ताने व्हावा आणि त्याला हाऊसफुलच्या रूपाने प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभावा हे समीकरण आजही कायम आहे. अगदी भयंकर अशा कोरोनाकाळानंतर कार्यक्रमाची सुरुवात दिवाळीनिमित्त व्हावी हा शुभसंकेतच. अशा या यशदायी दिवाळीचं ऋण कायम माझ्यावर राहील.

दिवाळी सण मोठा आनंदा नाही तोटा. जवळजवळ वीस दिवस चालणारा हा सण. त्यातून प्रत्येक दिवस वेगळी संकल्पना घेऊन येतो. आमच्या गावी शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम संपून साधारण रब्बी हंगामाची सुरुवात. या मधल्या काळात शेतकरी थोडा निवांत आणि निश्चिंत झाला की, आनंदाने दिवाळी साजरी करायचा. गाय म्हणजे दूध आणि दूध म्हणजे पूर्ण अन्न, म्हणून गाय म्हणजे अन्नपूर्णा. म्हणून तिची पूजा करायची म्हणून वसुबारस. धनतेरस या दिवशी आमच्या गावी रुपया-आठ आण्याची नाणी आणि त्याचबरोबर बाजरीची कणसं या धनाची पूजा व्हायची. नरक चतुर्दशीला नरकासुराचा वध करण्यासाठी आम्ही भल्या पहाटे उठायचो. अंगणात सगळीकडे पणत्यांची आरास बघून अचानक आपण वेगळ्याच दुनियेत आलो आहोत असा भास व्हायचा. लक्ष्मीपूजनाला केरसुणीची पूजा अगदी आवर्जून व्हायची. ‘जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी’ हा संदेश त्यातून असेल.

दिवाळी पाडवा म्हणजे स्त्रियांच्या नटण्याचा दिवस, मग ओवाळणी झाली की देवाला नैवेद्य. भाऊबिजेला बैलगाडी घेऊन येणारे भाऊ, त्यांची ओवाळणी. पौर्णिमेला तुळशीच्या लग्नाची लगबग. पर्यावरणाचा संदेश देणारा हा सण. गावी फटाके कमी उडत, पण टिकल्या फुलबाज्यांना तोटा नसे. आमच्या गावी या काळात लेझीम खेळण्याची प्रथा होती. गावाकडची दिवाळी म्हणजे वेगळाच आनंद. तिथं दिवाळीच्या निमित्ताने माणसं माणसांना भेटत होती. घराघरांतील फराळ आपसांत वाटत होती. माझे आजोबा लोहार, सुतार, चांभार, महार अशा बलुतेदारांना बोलावून धान्याच्या पेंढ्या देत आणि त्यांच्या पाया पडत. ते सगळे आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहेत अशी त्यांची भावना होती. त्यानंतर आम्ही मुंबईच्या रंगारी बदक चाळीत आलो. तिथे अठरापगड मराठी माणसे एकत्र नांदत होती. घाटावरच्या लोकांचे लाडू, तर कोकणी घरातील करंज्या, जास्त चविष्ट. गरिबी होती, पण मनाची श्रीमंती होती. तुटपुंजे का होईना पण रात्रभर फटाके वाजत. फटाके आपल्याजवळच पाहिजेत असा अट्टहास नव्हता. कोणीही लावले तरी आनंद मिळत होता.

दिवाळीच्या काळात रंगारी बदक चाळीत आवर्जून कीर्तनं होत. हभप लक्ष्मणबुवा निजामपूरकरांचं ‘पांडुरंग हरी वासुदेव हरी’ म्हणून सुरू झालेलं कीर्तन दिवाळी सूरमय करीत असे. ‘दांगट न्यूज पेपर्स’चे बुवा दांगट माझे आजोबा. त्यांच्याकडून मी दिवाळी अंक होलसेलमध्ये विकत घेऊन आमच्या एरियात रिटेलमध्ये विकत असे. सगळ्या दिवाळी अंकांना खाकी कव्हर घालून त्यांची लायब्ररी चालवीत असे. या व्यवसायाबरोबरच सगळे दिवाळी अंक आपोआप वाचून होत. दिवाळीला कंदील किंवा चांदण्या बनवण्याची मोठी चढाओढ असे. एका चाळीतील सगळ्या खोल्यांना एकसारखे कंदील बनवायचे, दुसऱ्या चाळीपेक्षा आपल्या चाळीचे कंदील अधिक चांगले व्हावेत ही ईर्षा आणि त्यातून मिळालेले समाधान. आम्हाला आकर्षण असे त्या दिवशी आंघोळीसाठी मिळणाऱ्या साबणाचं. फार फार तर ‘लाइफबॉय’ किंवा ‘हमाम’ मिळत असे. त्यावर येणारा फेस म्हणजे दिवाळीच्या आनंदाचे बुडबुडे होते.

आमचा आंब्याचा व्यवसाय. त्यामुळे दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चोपड्या पुजायच्या आणि दुसऱ्या दिवसापासून त्यावर लिहायला सुरुवात करायची असा रिवाज. चोपडी पूजनाच्या अगोदर त्यावर श्री गणेशाय नमः? श्री सरस्वतेय नमः? श्री गुरुभ्योय नमः? श्री कुलदैवताय नमः? श्री महालक्ष्मेय नमः? असे लिहायचे. मग खाली मधोमध स्वस्तिक काढून शुभ लाभ, लाभ सवाई असं लिहायचं. मी एक दिवस वडिलांना हे असं का लिहायचं? असं विचारलं. ते म्हणाले “हे बघ कुठलंही काम सुरू करायचं ते गणेशाचं नाव घेऊन म्हणून श्री गणेशाय नमः? कुठलंही काम करायचं असेल तर त्यासाठी अभ्यास हवा म्हणून श्री सरस्वतेय नमः? अभ्यास करायचा असेल तर गुरू पाहिजे म्हणून श्री गुरुभ्योय नमः? एकदा का अभ्यास झाला की कुलदेवतेचं स्मरण करून पाऊल उचलायचं म्हणून श्री कुलदैवताय नमः? आणि एकदा का अशा प्रकारे मन लावून काम केलं की लक्ष्मी प्रसन्न झालीच पाहिजे, त्याबद्दल श्री महालक्ष्मेय नमः? त्याशिवाय जो काही नफा होईल तो चांगल्या मार्गाने होऊ दे म्हणून शुभ लाभ आणि तो नफा सवाई होवो म्हणजे जास्तीत जास्त पंचवीस टक्के होईल एवढीच अपेक्षा ठेवायची.’’ त्यांचं हे म्हणणं मी मनावर कायमचं कोरून ठेवलंय. पाडव्याला क्रॉफर्ड मार्पेटमध्ये सर्व व्यापारी एकमेकांना भेटून नववर्षाच्या शुभेच्छा द्यायेच अगदी माथाडी कामगार, हमालही त्यात सामील व्हायचे.

मी ‘मंगलगाणी’ सुरू केलं ते तोट्यातच चाललं होतं. 1988 साली पुण्याहून डॉ. सतीश देसाईंचा फोन आला. दिवाळीनिमित्त त्यांना पुण्याला शो पाहिजे होता. शो ठरला, पण बालगंधर्व किंवा टिळक स्मारक या दोन्ही नाट्यगृहांत रात्रीची वेळच मिळेना. सकाळ, दुपारही मिळेना. म्हटलं, आता थिएटरच मिळत नसेल तर आपण पहाटेच शो करायला पाहिजे आणि ही माझी कल्पना त्यांनी उचलून धरली. आम्ही रात्रीच बालगंधर्वला पोहचलो. पहाटे सनईच्या सुरांनी सुरुवात केली. गेटवर महिलांना सुगंधी गजरे दिले. संपूर्ण बालगंधर्व परिसरात कंदील लावले. मध्यंतरात लाडू आणि चकली असा फराळ ठेवला. सगळेजण आम्हाला हसत होते की दिवाळीला घरचं सोडून कार्यक्रमाला कोण येणार? पण रसिकांनी सगळे अंदाज खोटे ठरवले. तो प्रयोग ऑव्हरपॅक गेला आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर ‘मंगलगाणी’ जोरात चालू लागला. माझ्या ‘आवाज की दुनिया’ या हिंदी कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग 4 नोव्हेंबर 1994 रोजी म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशीच झाला.

‘आवाज की दुनिया’ देखील सुपरहिट झाला आणि त्याचा हाऊसफुल्लचा बोर्ड कधीही उतरला नाही. आम्ही सातत्याने दिवाळी पहाटचे कार्यक्रम करीत होतो. कोजागिरी पौर्णिमनिमित्त गगनगिरी महाराजांच्या आश्रमासाठी ‘मराठी बाणा’ हा नवीन कार्यक्रम केला. प्रत्यक्ष गगनगिरी महाराजांच्या उपस्थितीत 16 ऑक्टोबर 2005 या दिवशी केला. अगदी दहा-बारा दिवसांत बसवलेल्या ‘मराठी बाणा’ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. जणू महाराजांनीच आशीर्वाद दिला. बस्स मी तिथल्या तिथे निर्णय घेतला की आता दिवाळी पहाटला ‘मराठी बाणा’च.

मी 1 नोव्हेंबर 2005 लक्ष्मीपूजन ही तारीख मास्टर दीनानाथ नाट्यमंदिर, विलेपार्ले इथे बुक केली. कार्यक्रम व्यावसायिक रंगभूमीवर आणायचा होता आणि आमच्या हातात फक्त पंधरा दिवस होते. सेट, लायटिंग, कॉस्च्युम, निवेदन आणि बरेचसे बदल करायचे होते. 24 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर आमचा ‘आजादी 50’ चा छत्तीसगड दौरा होता. आम्ही 31 ऑक्टोबरला मुंबईला पोहचलो. रात्री सेट लावायला थिएटरवर गेलो तर तो सेट दीनानाथमध्ये बसेनाच. पहाटेचे तीन वाजले होते. सेट बसत नाही तर काय करायचं? अशा हताश अवस्थेत बसलो असताना अचानक कल्पना सुचली (गगनगिरी महाराजांची कृपा) सगळ्या विंगा काढून टाकल्या तर? आणि सगळा सेट व्यवस्थित बसला. प्रयोग पहिल्या दोन दिवसांतच हाऊसफुल्ल झाला होता. त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षेचं ओझं प्रचंड होतं. बरोबर 6.30 ला तिसरी घंटा झाली, पडदा बाजूला सरकला आणि प्रचंड टाळ्या वाजल्या. बस्स, तिथे सुरू झालेल्या त्या टाळ्या आज 16 वर्षे अविरत चालू आहेत. तो हाऊसफुलचा बोर्ड 2000 प्रयोगांनंतरही अजून उतरला नाही. खरोखर दिवाळी या सणाचा मी
कायम ऋणी आहे.

[email protected]