
>>प्रा. आशुतोष पाटील
जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठ अशी ख्याती असणारे नालंदा विद्यापीठ, ज्याचे अवशेष बिहारच्या भारगावजवळ सापडतात. प्राचीन बौद्ध शिक्षणाचे केंद्र असणाऱया या स्थळावर झालेल्या पुरातत्वीय उत्खननात इ.स. पूर्व पाचव्या शतकापासूनचे अवशेष आपल्याला सापडतात.
इ.स. सातव्या शतकात युवान श्वांग नावाचा चिनी प्रवासी भारतात आला तो ज्ञानाच्या शोधात. तो केवळ प्रवासी नव्हता, तर एक बौद्ध भिक्षू होता, जो बुद्धांचा धम्म समजून घेण्यासाठी, ते प्रत्यक्ष राहिले त्या जागा पाहण्यासाठी व जे ज्ञान लिखित साधनांमध्ये आहे ते संग्रही करण्यासाठी आला होता. त्याने आपल्या आयुष्यातील 14 वर्षे भारतभ्रमण केले आणि त्याबद्दल एक पुस्तक लिहिले, ज्याचे नाव होते ‘सी यु कि’. त्याने आपल्या या प्रवासवर्णनात अनेक बुद्ध विहारांबद्दल लिहिलेले आहे आणि त्यातील महत्त्वाचे विहार म्हणजे ‘नालंदा महाविहार’. नालंदा हे बुद्ध विहार तर होतेच, पण त्याचबरोबर ते एक विद्यापीठही होते, जिथे जगभरातून विद्यार्थी विविध विषय शिकण्यासाठी येत असत, तिथल्याच विहारात राहत असत. त्यांना शिकण्यासाठी काही ठरावीक वेळ नसे. शिक्षक आणि विद्यार्थी ज्ञानार्जनाचे काम सातत्याने करत राहत. विद्यापीठात शिस्तीचे पालन होत असे. या विद्यापीठाबद्दलची ही सर्व माहिती आपल्याला सांगितली ती प्रत्यक्षदर्शी असलेल्या युवान श्वांग याने. त्याच्यानंतरही असे 11 विविध चिनी आणि कोरियन प्रवासी या विद्यापीठाला भेट देऊन गेले. इ त्सिंग हा प्रवासी म्हणतो तीन हजारांहून अधिक भिक्षू या नालंदा महाविहाराच्या परिसरात राहत असत. त्यांना पूर्ण दिवसाचं वेळापत्रक असे व त्यानुसारच ते राहत. हे एक व्यापक शैक्षणिक केंद्र होते, जिथे खगोलशास्त्र, तत्त्वज्ञान, चिकित्सा, मेटाफिजिक्स इत्यादी विषय शिकवले जात होते.
असे हे अद्भुत नालंदा विद्यापीठ होते बिहारमध्ये. आज भारगावच्या जवळ त्याचे अवशेष आहेत. बौद्ध आणि जैन लिखित साधने सांगतात की, बुद्ध आणि महावीर अनेकदा या ठिकाणी येऊन राहत असत. या ग्रंथांनुसार इ.स.पू. सहाव्या शतकापूर्वीही नालंदा हे मोठे शहर होते, पण उत्खननात आपल्याला इ.स.पूर्व पाचव्या शतकाच्या पूर्वीचे काही अवशेष मोठय़ा प्रमाणात सापडत नाहीत, पण असे असू शकते की, येथे काही ठिकाणांवर इ.स.पू. सहाव्या शतकापासून वस्ती असावी, पण महाविहार आणि विद्यापीठाची निर्मिती इ.स. पाचव्या शतकाच्या नंतर झाली. पाचव्या शतकाच्या सुरुवातीला आलेल्या फा हियान याने त्याच्या लिखाणात नालंदाचा उल्लेख केलेला असला तर महाविहाराबद्दल त्याने लिहिलेले नाही.
19व्या शतकात ब्रिटिश प्रशासक डॉ. फ्रान्सिस बुकॅनन-हॅमिल्टन यांनी 1811-12 मध्ये या ठिकाणाची ओळख करून दिली. त्यानंतर सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी 1860च्या दशकात पहिले अधिकृत सर्वेक्षण केले. येथे 1915 ते 1938 आणि 1974 ते 1982 अशा दोनवेळा झालेल्या उत्खननात अनेक पुरावशेष मिळाले. डेव्हिड स्पूनर, हिरानंद शास्त्राr आणि पेज या पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली या उत्खननामुळे नालंदाचे खरे स्वरूप उघडकीस आले. उत्खननात मुख्य स्थळ क्रमांक 3 (महास्तूप), अकरा विहार आणि चौदा चैत्य मंदिरे सापडली. तिथे एका ठिकाणी बौद्ध प्रार्थनास्थळांची संपूर्ण रांग मिळाली ज्याच्या विरुद्ध बाजूला भिक्षूंना राहण्यासाठी विहार होते. या दोघांमध्ये काहीशी मोकळी जागा होती. येथील काही उत्खननात शिडय़ांचे अवशेषही सापडले आहेत जे दर्शवतात की, येथील काही इमारती या द्विमजली किंवा त्याहून उंचदेखील होत्या. येथील प्रार्थनास्थानाच्या परिसरात अनेक बुद्धमूर्तीदेखील प्राप्त झाल्या. येथे विहारात असलेल्या खोल्या या सारख्याच असून बहुतांश दक्षिणमुखी आहेत आणि येथील सांडपाण्याचा निचरा हा पूर्वेकडे होत असे. येथील अनेक प्रार्थनास्थळे व विहारे अनेक वेळा सुधारली गेली व नवीनही बांधण्यात आली. हे महाविहार अपल्याला बौद्ध भिक्षूंच्या आयुष्यासंबंधी बरीच माहिती देते.
येथील उत्खननामध्ये बुद्धांच्या अनेक मूर्ती सापडल्या. त्यातील काही मृण्मयमूर्ती, काही दगडी मूर्ती तर काही ब्रॉन्झच्या मूर्ती आहेत. येथे दगड, तांबे, विटा या सर्वांवर लिहिलेले शिलालेखदेखील सापडलेले आहेत, ज्यामध्ये मुख्यत दिलेल्या दानांचा उल्लेख आहे. नालंदा महाविहार व नालंदा विद्यापीठाचे आपले स्वतंत्र सीलही होते, जे मातीचे बनवलेले होते. ज्यावर मध्ये चक्र व बाजूने बसलेल्या हरिणी दाखवलेल्या असत. त्याच्या खाली ‘नालंदा महाविहार’ असे लिहिलेले असे. या सीलवर दाखवलेले हे दृश्य बुद्धांच्या सारनाथला दिलेल्या पहिल्या उपदेशाला धरून अंकित केलेले आहे.
येथे अनेक भिक्षू राहत असल्याने या उत्खननामध्ये त्यांच्या दैनंदिन वापरातील अनेक वस्तूदेखील सापडल्या आहेत. वेगवेगळे भांडय़ांचे सापडलेले तुकडे, लोखंड आणि तांब्याच्या वस्तू, धान्य बारीक करण्यासाठी दगडी जाते, धातू आणि मातीचे दिवे, हाड आणि हस्तिदंतापासून बनवलेल्या खेळाच्या सोंगटय़ा या वस्तू येथील वस्तीची साक्ष देतात. येथील एका प्रार्थनास्थळाजवळ तर उत्खननकर्त्यांना धातुकाम होत असल्याचे अवशेषही सापडले. येथे सापडलेल्या ब्रॉन्झ धातूच्या मूर्ती कदाचित याच ठिकाणी बनत असाव्यात. उत्खननात पाचशेहून अधिक कास्य मूर्ती सापडल्या आहेत. या बहुतेक आठव्या ते बाराव्या शतकातील आहेत. भिक्षूंच्या खोल्यांमध्ये सापडलेल्या या लहान मूर्तींचा उपयोग वैयक्तिक उपासनेसाठी होत असे. नालंदाच्या कास्य कलेने नेपाळ, तिबेट, म्यानमार आणि आग्नेय आशियाच्या कलेवर मोठा प्रभाव टाकला. हे नालंदा पुरातत्त्व स्थळ एकूण 23 हेक्टरच्या क्षेत्रावर पसरलेले आहे.
येथे अनेक स्तूप सापडले, ज्यातील एक हा सारीपुत्त, जो गौतम बुद्ध यांचा शिष्य होता, त्याचा आहे व बाकी इतर अनेक विद्वानांचेदेखील स्तूप येथे सापडलेले आहेत. असे अनेक वस्तू व वास्तूंचे अवशेष नालंदा येथे सापडले आहेत. इ.स. 13 व्या शतकापर्यंत भरभराटीला असलेल्या या महाविहाराला आणि आदर्श विद्यापीठाला उतरती कळा लागली, मध्ययुगीन आक्रमणकर्त्यांनी ही वास्तू उद्ध्वस्त केली. जगातील एक सर्वात प्राचीन आणि भव्य ग्रंथालयाचा नाश झाला. ज्ञान जाळले गेले. त्यानंतर नालंदा पुन्हा पूर्वीसारखे उभे राहू शकले नाही. 2016 साली युनेस्कोने सर्वेक्षण करून या स्थळाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. या स्थळाच्या इतिहास व पुरातत्त्वावर अजून खोलात जाऊन काम होणे गरजेचे आहे.
(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)
[email protected]




























































