>> अश्विन बापट
अँड द ऍवॉर्ड गोज टू… एखाद्या पुरस्कार सोहळ्यात हे तीन शब्द उपस्थितांची उत्कंठा ताणून धरतात. नाव घोषित होतं आणि झळाळती ट्रॉफी विजेत्याच्या हातात सन्मानाने दिली जाते. अशा असंख्य पुरस्कार सोहळ्यांमध्ये ज्या ट्रॉफीज प्रदान केल्या जातात त्याचे निर्माते आहेत मुंबईकर विजय सोनवणे. त्यांची जन्मभूमी, कर्मभूमी सर्व काही मुंबईच.
आज 55 वर्षे या व्यवसायात पाय रोवून ते कणखरपणे उभे आहेत. याच क्षेत्रात त्यांनी आधी नोकरी केली आणि परिस्थितीनुरूप असा निर्णय घ्यावा लागला की, त्यांनी काही वर्षांत स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज गोरेगावात त्यांची ‘द ऍवॉर्ड गॅलरी’ दिमाखात उभी आहे. तीन ते चार लोकांपासून सुरू केलेल्या या व्यवसायात आता त्यांच्याकडे सुमारे 60 कर्मचारी आहेत.
या व्यवसायाबद्दल विजय सोनवणे म्हणाले, या व्यवसायात पाऊल ठेवताना मी पहिली ट्रॉफी बनवली ती ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्या ‘पाताल भैरवी’ सिनेमाची. सिनेमा वितरक रमेश सिप्पींनी ती बनवून घेतली. या क्रिएशननंतर आपण मागे वळून पाहिलं नाही. फिल्मफेअर, आयफासह पुरस्कार सोहळे असोत किंवा मग कॉर्पोरेट इव्हेंट्स, आमच्या ऍवॉर्ड गॅलरीत तयारी झालेली ट्रॉफी या सोहळ्यांची शान वाढवत असते.
पूर्वी सिनेमाचे मुहूर्त असोत वा एखाद्या सिनेमाचा महोत्सवी सोहळा…ट्रॉफीज, स्मृतिचिन्हांचे वितरण नियमित केले जात होते. आता ती पद्धत काहीशी कमी झालीय.
अलीकडेच लोकप्रिय झालेल्या ‘कटय़ार काळजात घुसली’ सिनेमासाठी आम्ही या सिनेमाच्या टीमकरिता ट्रॉफीज बनवल्या होत्या. तसंच पंढरपूरला जाणाऱया वारकऱयांसाठीही आम्ही विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा विविध मूर्तींची निर्मिती केली आणि या मूर्ती वारकऱयांना भेट म्हणून देण्यात आल्या. ट्रॉफी निर्मिती असो वा एखादी भेटवस्तू, क्रिएटिव्हिटी आणि वैविध्य यांचा संगम साधण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमच्या फॅक्टरीमध्ये ट्रॉफींशिवाय स्मृतिचिन्ह, मेडल्स, टेबलटॉप आयटम्स आदींची निर्मिती केली जाते.
विजय सोनवणे यांनी बनवलेल्या ट्रॉफी दक्षिण आफ्रिका, मलेशिया, यूकेमध्येही तिथल्या कार्यक्रमाचे देखणेपण वाढवतायत. आता वयानुरूप त्यांनी व्यवसायाची धुरा विभाष आणि विनीत या दोन्ही मुलांच्या हाती दिली आहे. ते दोघंही मेहनतीने हा व्यवसाय आणखी फुलवण्यासाठी प्रयत्न करताहेत, असेही विजय सोनवणेंनी आवर्जून सांगितलं.
(लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसर-सीनिअर न्यूज अँकर आहेत.)




















































