प्रकाशमान कामगिरी

>> अश्विन बापट

लाइट्स, कॅमेरा, ऍक्शन…एखाद्या शूटच्या वेळचे हे परवलीचे शब्द. यातल्या कॅमेरा आणि ऍक्शनची आपली ओळख असते, पण लाइट्स म्हणजे नेमके काय याचा उलगडा फारसा कुणाला होत नाही. मात्र एखाद्या कलाकृतीची, इव्हेंटची, रिऑलिटी शोची उंची आणि सौंदर्य खुलवण्यात प्रकाश व्यवस्था अर्थात लाइट अरेंजमेंटची मोठी भूमिका असते.

मूळचे गिरगावकर असलेले उल्हास सहस्रबुद्धे गेली 36 वर्षे याच क्षेत्रात मराठी पताका दुमदुमत ठेवतायत. आपले वडील श्रीकृष्ण सहस्रबुद्धे यांच्याकडून या क्षेत्राचे पहिले धडे उल्हास यांना मिळाले. श्रीकृष्ण यांना या क्षेत्रात बंधू नावाने सारे ओळखत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत उल्हास यांनी हा व्यवसाय आणखी मोठय़ा उंचीवर नेला. त्यांनी केलेल्या इव्हेंट्सची यादी जर आपण पाहिली तर त्यांच्या कामाचा आवाका आपल्या लक्षात येईल. म्हणजे अमिताभ यांचे ‘केबीसी’ शोज, ‘आयफा पुरस्कार’, ‘फिल्मफेअर’, ‘फेमिना मिस इंडिया’, ‘मिस वर्ल्ड’, आतापर्यंत सादर झालेले ‘बिग बॉस’चे शोज, ‘नॅशनल गेम्स’, ‘आयपीएल स्पर्धेचे उद्घाटन सोहळे’ बंगाली, तेलुगु, मराठी, मल्याळम अशा भाषांमधील नॉन फिक्शन शोज, ‘नॅशनल गेम्स’ ही यादी न संपणारी आहे. अगदी अवघ्या जगात चर्चा झालेला ‘नमस्ते ट्रम्प’ हा इव्हेंटही त्यांनी साकारला.

उल्हास सहस्रबुद्धे यांनी सुरुवातीला 21-22 भाषांमध्ये नाटकांची प्रकाश व्यवस्था केली. 1990 साली त्यांनी भरत दाभोळकर, ऍलेक पदमसी यांची नाटके केली. अन्नू कपूर-दुर्गा जसराज यांच्या ‘अंताक्षरी’ कार्यक्रमाची प्रकाश व्यवस्था उल्हास यांनी केली होती. तिथपासून बच्चन यांच्या सध्याच्या ‘केबीसी’पर्यंतचा उल्हास यांचा प्रवास अचंबित करणारा आहे. अगदी अलीकडच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमासाठीही त्यांनी प्रकाश व्यवस्था केलीय.

उल्हास यांच्याशी बोलताना जाणवलेले त्यांचे कामाबद्दलचे पॅशन, त्यांची ऊर्जा, त्यांचा नावीन्याचा ध्यास हे पाहता त्यांच्या कारकीर्दीची ही ‘प्रकाश’ वाट आणखी उजळून निघेल हे निश्चित.

परदेशातही केले इव्हेंट्स
आज त्यांच्या ताफ्यात 275 माणसे काम करतात. ज्यामध्ये 13 इंजिनीअर्स आहेत, डिझाइनर्स आहेत, अशी अनेक मंडळी आहेत. परदेशातील कामांपैकी ढाक्यामध्ये शेख मुजिबर रेहमान यांच्या स्मरणार्थ आयोजित एक मोठा शो उल्हास यांनी केला. तसेच अबुधाबीत झालेल्या ‘आयफा पुरस्कारा’ची लाइट अरेंजमेंट हे त्यांच्या दृष्टीने चॅलेंजिंग होते. याचे कारण त्यांनी आठ कंटेनर भरून लाइट मटेरियल इक्विपमेंट्स तिकडे नेली होती. याशिवाय त्यासाठीचे मनुष्यबळ, त्यासाठी लागणाऱया परवानग्या हे सारे आव्हान पेलत त्यांनी हा शो साकारला होता.

 लाइट्स अरेंज करताना तो शो लाइव्ह आहे की रेकॉर्ड होतोय, दिग्दर्शकाची मागणी काय, कार्यक्रमाची संकल्पना काय आदी बाबी विचारात घेऊन काम केले जाते, असे उल्हास सांगतात. जवळपास 25 ते 30 देशांमध्ये जाऊन इव्हेंट्स करत उल्हास सहस्रबुद्धेंनी मराठीचा झेंडा देशाबाहेरही डौलाने फडकवलाय. एलईडी स्क्रीन्ससह अन्य टेक्नॉलॉजीचा कुशल तसेच प्रभावी वापर ही उल्हास आणि त्यांच्या टीमची खासीयत आहे.

(लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसर-सीनिअर न्यूज अँकर आहेत.)