
>> अस्मिता प्रदीप येंडे
मराठी खाद्य संस्कृतीची ओळख व्हावी, आपले पारंपरिक पदार्थ नव्या पिढीपर्यंत संक्रमित होत राहावे यासाठी एक आगळं वेगळं पाककृतीचं पुस्तक आपल्या भेटीला आले आहे. लेखिका – निवेदिका वृंदा दाभोलकर लिखित ‘पदार्थायन’ हे पाककृतीचं पुस्तक. हे पुस्तक नवनवीन पदार्थ आवडीने करू पाहणाऱया, गृहिणी, लेकी, सुना, आपल्या घरापासून लांब असलेल्या, पदार्थ बनवण्याची आवड असणारी पुरुष मंडळी, शेफ तसेच अस्सल खवय्येगिरी करणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक उपयोगी पडेल. या पुस्तकात नेहमीचे न्याहारीचे पदार्थ, गोड पदार्थ, शाकाहारी जेवणापासून ते मांसाहारी पदार्थांपर्यंतच्या पाककृती समाविष्ट आहेत.
‘पदार्थायन’ हे पुस्तक फक्त पाककृतीचं नाही तर त्या पदार्थांशी जोडलेल्या आठवणींची सरमिसळ आहे. या पदार्थांशी त्या त्या जागेच्या, माणसाच्या स्मृती जोडल्या गेल्या आहेत. या पुस्तकाला ललित लेखनाचा जो काही तडका लेखिकेने दिला आहे, त्यामुळे अगदी गोष्ट कथन करत त्या पदार्थांची निर्मिती, त्याची प्रक्रिया लेखिका या पुस्तकाद्वारे सांगत आहे.
आपल्या शरीराला जी पोषक तत्त्वे आवश्यक असतात ती तत्त्वे असलेल्या पदार्थांचा समावेश आपल्या जेवणात असणे गरजेचे आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन वृंदा दाभोलकर यांनी ‘पदार्थायन’च्या माध्यमातून अशा पाककृती यात दिलेल्या आहेत. जे पदार्थ खाणे शरीरासाठी आवश्यक आहेत. पाककृतीसोबतच कोणत्या भाज्या-कडधान्यातून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, तसेच खनिजे मिळतात, याची माहितीसुद्धा दिली आहे. सर्वसामान्य टपरीवरचा चहा ते फाइव्ह स्टारमधला चहा किंवा अन्य टी स्टॉलवरील चहा… ज्याच्याशिवाय सगळं अपूर्ण वाटते अशा चहाची कहाणी ‘चहा आणि बरेच काही’ लेखातून सुरेख कथन केली आहे. आठवडय़ातून एक-दोनदा बनवल्या जाणाऱया उपमा, पोहे या जगजाहीर पदार्थांची गंमत आणि त्याचं आपल्या न्याहारीतलं स्थान अढळ असल्याचं ‘सर्वमान्य पोहे’ आणि ‘प्रेमाचा उपमा’ लेखातून जाणवतं. थालीपीठ, मिसळ यांच्या चवीचं काwतुक तरी किती करावे नाही का? पुस्तकातील पदार्थांची नुसती नावे वाचली तरी तोंडाला पाणी सुटते. या पुस्तकातील पाककृती या सात्त्विक, संतुलित आहारांनी पूर्ण, आवश्यक पोषण तत्त्वांनी युक्त आहेत. लेखिका बटाटय़ाला ‘सौभाग्यवती बटाटा’ का म्हणते यासाठी ‘बटाटा माहात्म्य’ नक्की वाचाच. दोडका, वांगी, कारली, भोपळा, सुरण तसेच विस्मरणात गेलेली केळफुलाची भाजी ह्या पाककृती सुरेखपणे मांडल्या आहेत. आपली संस्कृती जपण्यासाठी, पारंपरिक पदार्थ नव्या पिढीला माहीत व्हावेत यासाठी लेखिकेने यात पारंपरिक कोकणी पदार्थही समाविष्ट केले आहेत.
जीवनातील व्यस्ततेमुळे, फास्ट फूडच्या ओढीने झटपट बनवण्याच्या विचाराने किंवा वेळेच्या अभावामुळे आपले पारंपरिक पदार्थांकडे थोडं दुर्लक्ष होताना दिसत आहे. पण ‘पदार्थायन’ हे पुस्तक आपल्या पारंपरिक, रुचकर आणि पोषक पदार्थांचं महत्त्व अधोरेखित करत आहे. पुस्तकाला डॉ. विठ्ठल कामत सरांची प्रस्तावना म्हणजे ‘दुधात साखरच.’
पदार्थायन
लेखिका : वृंदा दाभोलकर
प्रकाशक: उद्वेली बुक्स
मूल्य : रुपये 400/-



























































