भकास डिजिटल धूसरपणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अतुल कहाते

वरवर आपण एकदम स्थिर वाटतो. आपल्या मोबाईलमध्ये ‘घुसलेले’, त्यावर नाजूकपणे आपल्या हाताची बोटं फिरवणारे आपण घरी, दारी, बागेत, चालताना, मैदानावर, जेवताना, इतरांशी बोलताना, गाडी चालवताना, कार्यक्रमांमध्ये असताना, ‘फ्रेश होताना’ – सगळीकडे असेच ‘स्थिर’ असतो. प्रत्यक्षात मात्र त्या पडद्यावर आणि आपल्या मनामध्ये पडद्यावरच्या मजकुरासंबंधीचे असंख्य विचार यांचं नुसतं थैमान सुरू असतं. आपण जिथे असतो तिथे आपण नसतोच. आपण आपल्या शरीराचा फक्त हाताची बोटं आणि डोळे इतकाच उपयोग करतो की काय; अशी भीती आता वाटते. 

आपल्या सभोवताली विलक्षण वेगानं गोष्टी घडत असतात. मोबाईल फोनमध्ये तर जवळपास काहीच स्थिर नसतं. समाजमाध्यमं, व्हाट्सऍप, इंटरनेट या सगळ्यामध्ये क्षणाक्षणाला काहीतरी घडत असतं. काही घडलं नाही तर आपण अस्वस्थ व्हावं आणि विनाकारण मोबाईलच्या पडद्यावर काहीतरी चाळे करावेत अशी परिस्थिती असते. आपण काही पोस्ट केलं किंवा संदेश पाठवला तर त्याला उत्तरं, प्रतिक्रिया, लाइक्स वगैरे गोष्टींची रांग लागते. आधुनिक जगामधलं आयुष्य वेगवान असतं हे आपल्याला आधीपासून ठाऊक होतंच; पण आता ते अतिवेगवान आणि अतिचंचल झालेलं आहे.

आर्थिक जगतामध्ये सध्या लाडक्या असलेल्या कंपन्या बघितल्या तर ‘10 मिनिटांत घरपोच किराणामाल’, ‘एका मिनिटात कर्ज’, ‘30 मिनिटांत पिझ्झा’ अशा सुविधा पुरवणाऱया कंपन्यांचा बोलबाला दिसतो. मागणी किंवा इच्छा आणि तिची पूर्तता यांच्यामधला एक ठरावीक काळ पूर्णपणे मिटवून टाकणारी ही जादू अनेक जणांना चक्रावून सोडताना दिसते. याच्याच जोडीला अनेक जण खरोखरच याची काही गरज आहे का? असा रास्त सवालही विचारतात. कधी कधी आपल्याला अडचणीच्या प्रसंगी अशा प्रकारच्या सुविधा म्हणजे दिवा घासल्याबरोबर आपली इच्छा पूर्ण करून देणाऱ्या अल्लाऊद्दीनच्या गोष्टीची आठवण करून देतातही; पण सरसकट अशा सुविधांची आपल्याला घरज भासते का? पण हे खरं म्हणजे फक्त सध्याच्या डिजिटल, गतिमान, मती गुंगवून सोडणाऱ्या युगाचं एक प्रतीकच झालं. वेग आणि सतत काहीतरी घडलं पाहिजे असं वातावरण हे या युगाचे मूलमंत्र आहेत. कित्येकदा हे नेमकं कुणाला हवं आहे? असा प्रश्न आपल्याला बुचकळ्यात टाकू शकतो; पण जणू सगळ्यांनीच यामध्ये सामील झालं पाहिजे अशा प्रकारे त्याकडे बघितलं जात असल्यामुळे एकूण आयुष्यच धुरकट, हातात न सापडणारं होत चालल्याची अनेक जणांची भावना होताना दिसते.

‘मार्केटिंग’च्या तंत्रामधले तज्ञ संतोष देसाई यांनी याचं अतिशय सुरेख विवेचन केलेलं आहे. मानवी मन हे निर्बंधमुक्त असतं. आपल्या कल्पनांच्या भराऱया कल्पनेपलीकडच्या वेगानं सुरू असतात. कुणाच्या मनात काय सुरू आहे हे आपण सांगू शकत तर नाहीच; पण आपल्या स्वतःच्या मनावर तरी आपला ताबा कुठे असतो? असंख्य विषय, अनेक इच्छा-आकांक्षा, स्वप्नं, भावनांचे हेलकावे यात आपलं मन हेलकावे घेत असतं. या सगळ्याच्या केंद्रस्थानी असणं, आपल्याला जेव्हा जे हवं आहे ते आपण मिळवू शकणं, एका गोष्टीतून कुठल्याही क्षणी अगदी वेगानं दुसऱ्यात जाणं या मानवी मनाच्या पैलूंना उचलून धरणारं आणि प्रोत्साहित करणारं तंत्रज्ञान आता उपलब्ध झालं आहे. चंचल मनाचा स्वैरपणा या डिजिटल जगानं पुरेसा ओळखून त्याला साजेशी, पूरक अशी जोड दिलेली आहे.

आपल्या सभोवताली विलक्षण वेगानं गोष्टी घडत असतात. मोबाईल फोनमध्ये तर जवळपास काहीच स्थिर नसतं. समाजमाध्यमं, व्हॉट्सऍप, इंटरनेट या सगळ्यामध्ये क्षणाक्षणाला काहीतरी घडत असतं. काही घडलं नाही तर आपण अस्वस्थ व्हावं आणि विनाकारण मोबाईलच्या पडद्यावर काहीतरी चाळे करावेत अशी परिस्थिती असते. आपण काही पोस्ट केलं किंवा संदेश पाठवला तर त्याला उत्तरं, प्रतिक्रिया, लाइक्स वगैरे गोष्टींची रांग लागते. आधुनिक जगामधलं आयुष्य वेगवान असतं हे आपल्याला आधीपासून ठाऊक होतंच; पण आता ते अतिवेगवान आणि अतिचंचल झालेलं आहे.
आता वाचण्याचंच उदाहरण घेऊ. वाचन करत असताना आपण कृती करत असायचो; आपण हालचाल करायचो. उदाहरणार्थ आपण वाचत असलेलं पुस्तक किंवा वर्तमानपत्र स्थिर असायचं. त्यामध्ये कसलेही बदल घडणं किंवा त्यात कुठलीही हालचाल जाणवणं अशा गोष्टींचा प्रश्नच नव्हता. जगामधल्या इतर कुठल्याही गोष्टींशी ते जोडलेले नसायचे. आपली नजर मजकुरावरून फिरत राहायची. आपल्याला हवं असेल तेव्हा आपण पान उलटायचो. आपल्याला हवं तेव्हा आपण नुसतंच आरामात बसून आता जे वाचलेलं असेल त्याची रवंथ करत बसू शकत होतो. या सगळ्याचा वेग आपण ठरवू शकत होतो. आता मात्र असं घडत नाही. मजकूर आणि आपलं चित्त हे दोन्ही स्थिर नाहीत. त्यांच्यामध्ये सतत बदल होत जातात. डिजिटल मजकूर सतत अद्ययावत होत असल्यामुळे तो एखादा ओला साबण हातातून सतत निसटत राहावा अशा प्रकारचा असतो. क्षणोक्षणी नवं काहीतरी आलेलं असल्यामुळे ‘हाजीर तो वजीर’ असं मजकुराकडे आपण देत असलेल्या लक्षाविषयी बोलता येईल. अक्षरशः शेकडो संदेशांची बरसात होत असल्यामुळे धडाधड स्क्रोल करत राहणं हीच मुख्य कृती बनते. जरा आरामात बसून काहीतरी चवीनं वाचणं हा प्रकार आता इतिहासजमा झाला आहे. तेवढी चैन कुणाला परवडत नाही आणि तसं करावं असं म्हटलं तर आपलं मन आपल्याला ते करू देत नाही. त्याला सतत बदल हवा असतो. त्याला सतत नवं काय घडलं आहे याची उत्सुकता असते.

आपण आता एका विषयातून, एका चर्चेतून, एका मुद्दय़ातून दुसरीकडे कुठेही क्षणार्धात भरकटतो. तिथून आणखी भलत्या कशामध्येही आपली उडी अशीच पुढच्या क्षणी पडते. तसं केलं नाही तर आपण बेचैन होतो. टीव्हीवरही एक कार्यक्रम बघता बघता आपोआप चॅनेल बदलून वेगळंच काहीतरी काही वेळ बघून पुन्हा तिसरंच काहीतरी करणं हे त्याचंच कारण ठरतं. आपण आता कशात फार काळ रमूच शकत नाही! या वेगामध्ये आपणही आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी सतत धडपडतो. तसं केलं नाही तर आपण एकटे पडू अशी विचित्र भीती आपल्याला सतावत राहते. शिवाय हे केलं नाही तर दुसरं काय करायचं? असा अत्यंत भीषण प्रश्न अनेक जणांना पडतो. साहजिकच या प्रवाहात स्वतःला झोकून दिल्यावरही आपल्याला न संपणारी अस्वस्थता आणि असमाधान या गोष्टी पुरत्या ग्रासून टाकतात. समाजमाध्यमं ही अशा प्रकारे आपल्याला असमाधानकारक वाटणंच या माध्यमांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. म्हणूनच आपण यातून समाधान मिळवण्याच्या फोल आशेपायी स्क्रोल करत राहतो, करत राहतो आणि थकून जातो.

सर्वसाधारणपणे ‘निर्मिती’ आणि त्यानंतर तिचा ‘आस्वाद’ या दोन निरनिराळ्या प्रक्रिया असतात असं आपण मानत होतो. इंटरनेटवर मात्र या दोन गोष्टींची इतकी भन्नाट आणि बेमालूम सरमिसळ होते की, त्यांच्यामधला फरक आता संपून गेला आहे. पडद्यावर काहीतरी वाचणं, स्वतः काहीतरी पोस्ट करणं, ‘लाइक्स’ मिळवणं, इमोजी पाठवणं हे सगळं एकमेकांमध्ये मिसळून जातं.

म्हणूनच ‘स्लो मूव्हमेंट’, ‘गॅजेटबंदी’ अशा गोष्टी पुन्हा मूळ धरायला लागतात. आपलं दैनंदिन आयुष्य जणू एक धूसर पट्टा असावा आणि आपणच त्याकडे हताशपणे बघत राहावं अशा भकास मानसिकतेमधून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार तज्ञांकडे जायची वेळ येते. नैराश्य आणि व्यसन अशा टोकाच्या पातळ्या गाठण्यापर्यंत डिजिटल तंत्रज्ञान आपल्याला फरफटत नेतं. ‘विचार करायला वेळ आहे कुणाकडे?’ असं आपण हताशपणे पुटपुटत राहतो. मागच्या पानावरून कहाणी पुढे जात राहते.

(लेखक माहिती तंत्रज्ञानाचे तज्ञ आहेत.)
 [email protected]