
>> भूषण कोरगावकर
संगीत बारी कला केंद्राचं विश्व दर्शवणारा संगीतबारीचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर आता लावणी या कलेला तिच्यातल्या उत्स्फूर्त शृंगारासकट प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा आणि सच्च्या कलाकारांची भेट घडवणारा हिंदी-दखनी नाटय़प्रयोग म्हणजे लव्ह अॅण्ड लावणी.
मराठी पांढरपेशा वर्गाचा लावणीकडे पाहायचा दृष्टिकोन नेहमीच गढूळलेला राहिला आहे. अश्लील, ग्राम्य अशी लेबलं लावून अभिजन वर्गाने तिचं नाटय़-कला क्षेत्रातलं मानाचं स्थान नाकारलं. मराठी चित्रपटांनी तिचं एक सुंदर रूप समोर आणलं खरं, पण ते अगदीच एकसुरी होतं. शिवाय त्यातली बाई नेहमी दुय्यमच राहिली. परिस्थितीनं पीडित, शोषित किंवा पुरुषांना लुबाडणारी, बनेल अशा दोन अतिरंजित रूपातच ती लोकांसमोर येत राहिली. त्यातल्या त्यात ढोलकी फडाच्या तमाशातली लावणी आणि कलाकार थोडेतरी माहीत झाले, पण संगीत बारी कला केंद्रांच्या वाटय़ाला मात्र अधिकतर उपेक्षा किंवा बदनामीच आली. हे सगळे गैरसमज दूर करून इथल्या विश्वाचं थेट दर्शन व्हावं या हेतूने लिहिलेलं ‘संगीत बारी’ हे माझं पुस्तक 2014 साली राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित झालं आणि तेव्हापासून याच नावाचे आमचे प्रयोगही धडाक्यात सुरू झाले. एप्रिल 2022 पर्यंत आम्ही तब्बल 110 प्रयोग केले. या सर्व प्रयोगांना मराठी प्रेक्षकांइतकाच अमराठी प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. आणि तेव्हाच ‘लव्ह अॅण्ड लावणी’ या हिंदी-दखनी नाटकाचा जन्म झाला.
संगीत बारीच्या खासगी बैठकांतून तुफान यश कमावलेल्या शबानाबाई अश्टुरकर यांची प्रेमकहाणी ‘बी स्पॉट प्रॉडक्शन्स’च्या ‘लव्ह अॅण्ड लावणी’ या प्रयोगातून आम्ही रंगवतो. अनिता दाते आणि संभाजी ससाणे यांच्या सशक्त अभिनयातून आणि पारंपरिक कलाकारांच्या खणखणीत लावण्यांमधून गोष्ट पुढे सरकत राहते. गोष्ट हिंदीत असली तरी लावण्या अर्थात मराठीतच आहेत. यातल्या लावणी कलाकारांची ही थोडक्यात ओळख.
खर्जातला दमदार आवाज लाभलेल्या लताबाई वाईकर गेली तीस वर्षं लावणी गात आल्या आहेत. इथल्या कला केंद्रांमध्ये माईक नसतात. त्यामुळे पेटी, तबला, ढोलकी आणि एकेकीच्या पायातले पाच-पाच किलोंचे घुंगरू यांच्या आवाजावर मात करत गावं लागतं. यांच्याकडे पायपेटी असते जिचा आवाज हातपेटीपेक्षा खूप मोठा असतो. यांचे घुंगरूही आकाराने मोठे आणि पितळी कडय़ात ओवलेले असतात. हरहुन्नरी गौरी जाधवला अभिनयात आणि सर्व प्रकारच्या नाचकामात गती असली तरी लावणी हे स्वतŠचं मुख्य कार्यक्षेत्र म्हणून तिने निवडलंय. तिच्या खानदानी कलेचा चाहता वर्ग मोठा आहे. करियर ऐन भरात असताना 2014 साली एका अपघातात ती जबर जखमी झाली. उपचारात एक वर्ष वाया गेलं. तरीही कलाकार आई सुहासिनी जाधव यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे लावणी, नाटक आणि टीव्ही सिरियल अशी तिची घोडदौड सुरू आहे.
पुष्पा सातारकर ही अशीच एक अष्टपैलू कलाकार. स्वतŠ गाऊन नाचही करते आणि तेही दमसास लागू न देता. तिचा आवाज ऐकण्यासाठी, नाच अनुभवण्यासाठी लोक तासन्तास वाट बघत असतात. अनेक वर्षांच्या दांडग्या अनुभवानंतर आता ती मोठय़ा बहिणीला, सावित्री सातारकर यांना घेऊन पुण्याच्या आर्यभूषण थिएटरला स्वतŠची पार्टी लावतेय. या निमित्ताने एक काळ गाजवलेल्या अफाट आवाजाच्या गायिका सावित्राबाई तब्बल पंचवीस वर्षांनंतर पुनरागमन करणार आहेत.
लावणी सम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर यांना तर लावणीचं विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. नृत्य, अभिनय, अदाकारी आणि गायन अशा सर्वच आघाडय़ांवर त्या तरबेज आहेत. नसानसात कला असणं म्हणजे काय याचा जणू त्या वस्तुपाठ आहेत. ‘हायवे’ आणि ‘मी वसंतराव’मधून त्यांच्या अभिनयाची झलक पहायला मिळाली. ‘ढोलकीच्या तालावर’च्या परीक्षक म्हणूनही त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सध्या ‘लव्ह अॅण्ड लावणी’ व्यतिरिक्त त्यांचं लावणीची वर्कशॉप्स घेण्याचं काम सुरू आहे. आता मुलगी श्रद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून या क्षेत्रात पदार्पण करतेय.
इथल्या पुरुष कलाकारांची खंत मात्र जगावेगळी. पेटी, तबला, ढोलकी वाजवणं, नवीन लावण्या बसवणं, वेगळ्या चाली शोधणं, स्वतŠ गाणी म्हणणं, प्रसंगी मुलींना नाच शिकवणं अशी सगळी कामं लीलया करूनही ते स्त्र्ायांच्या वलयामागे काहीसे झाकोळून जातात. परंतु ‘लव्ह अॅण्ड लावणी’च्या माध्यमातून यातल्या प्रत्येकाला स्वतŠचं हुनर दाखवायची संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं हे त्यांना शिकवावं लागत नाही. त्यामुळेच पेटीमास्तर चंद्रकांत लाखे जेजुरीकर, तबला वस्ताद व गायक विनायक जावळे आणि ढोलकी वस्ताद सुमित कुडाळकर हे तिघेही जण सर्व स्त्र्ााr-कलाकारांच्या तोडीस तोड प्रेक्षकांच्या मनावर ठसतात. लावणी या कलेला तिच्यातल्या उत्स्फूर्त शृंगारासकट प्रतिष्ठा प्राप्त करून देणं आणि हे सच्चे कलाकार व शहरी रसिक यांची गाठभेट घालून देणं या हेतूनी सुरू केलेला हा प्रयोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा हीच आमची इच्छा आहे.


























































