>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]
जम्मूतील हवाई दलाच्या तळावर 27 जून रोजी दोन स्फोट झाले. हा दहशतवादी हल्ला ड्रोनने करण्यात आला होता. ड्रोन पाकिस्तानातून आले होते. देशात पहिलांदाच ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला झाला आहे. तपासाची सूत्रे एनआयकडे देण्यात आली आहेत. जम्मू एअरफोर्स स्टेशनच्या टेक्निकल एरियाजवळ स्फोट झाल्यामुळे हवाई दलाच्या दोन जवानांना किरकोळ जखम झाली आहे. 5 मिनिटांच्या अंतराने पहिला स्फोट कॅम्पस इमारतीच्या छतावर आणि दुसरा खाली झाला. हा स्फोट क्षेत्रात उभ्या असलेल्या विमानांना बरबाद करण्याकरिता होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू- कश्मीरमधील सर्वपक्षीय नेते म्हणजे ‘गुपकार’शी चर्चा केली. त्यानंतर 72 तासांच्या आत जम्मू-कश्मिरात हिंसाचार व दहशतवादी हल्ले सुरू झाले आहेत. जम्मू विमानतळ हिंदुस्थान-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेपासून केवळ 14 किलोमीटर अंतरावर आहे. माल वाहतुकीसाठी वापरले जाणारी बहुतांशी हेलिकॉप्टर्स आणि अनेक मोहिमा या बेसवरून राबवल्या जातात. जम्मू एअरफोर्स स्टेशन ही हेलिकॉप्टर्स ठेवण्याची सर्वात महत्त्वाची जागा आहे. चेतक आणि एमआय -17 हेलिकॉप्टरही इथं असतात. कोणत्याही एअरफोर्स बेसचे दोन प्रमुख भाग असतात. टेक्निकल एरिया आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया, या ठिकाणी सर्व सुटे भाग, एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर, सर्व हार्डवेअर ठेवलं जातं. जम्मू एअरफोर्स स्टेशन या परिसरात सैन्याला मदत पोहोचवण्याचं प्रमुख माध्यम आहे.
सीमा भागातील दुश्मनांच्या हवाई हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जम्मू येथील हवाई दल बेस येथे रडार यंत्रणा बसविण्यात आली आहे. ही यंत्रणा असतानाही हवाई तळावर बॉम्ब फेकणाऱया ड्रोनना का शोधू शकली नाही? पाकिस्तानच्या बाजूने आलेले ड्रोन आपल्या रडारने पाहिले का नाही? आपल्याकडील निरीक्षण रडार ही महत्त्वाच्या ठिकाणी लावलेली असतात. तीसुद्धा युद्धजन्य परिस्थितीत काम करत असतात. संपूर्ण साडेचार हजार किमी पाकिस्तानी सीमेवर किंवा 7 हजार 600 किलोमीटर या समुद्री सीमेवर कायम लक्ष ठेवणारी सिस्टिम आपल्याकडे नाही. कारण ही सिस्टिम अतिशय महागडी असते. पाकिस्तानने आपल्याविरुद्ध कमी पैसे लागणाऱया ड्रोन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने दहशतवादाचा नवीन आयाम सुरू केला आहे. शिवाय ड्रोन्स कमी उंचीवरून उडतात. ते कोणत्याही दिशेने येऊ शकतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एअर डिफेन्स सिस्टम लावणे सोपे नाही.
ड्रोनचे तंत्रज्ञान आणि त्यांची निर्मितीही सोपी आहे. जर ड्रोनच्या मदतीने सीमावर्ती भागात शस्त्र किंवा स्फोटक पदार्थ किंवा अमली पदार्थ पाठवले जात असतील तर आपले रक्षण कसे करायचे? आपली रडार सातत्याने सुरू ठेवणे खर्चिक असते. म्हणजे काही ड्रोन्स सीमेवरून घुसल्याने आपण हजारो कोटी रुपये खर्च करून रडार कव्हरेज देण्याचा विचार करणे अव्यवहार्य आहे. म्हणून कमी खर्चात आपले स्वसंरक्षण कसे करता येईल यावर अधिक लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आपल्या देशामध्ये अनेक मोठी शहरे आहेत. त्यात विविध महत्त्वाच्या संस्था म्हणजे तेल कारखाने, न्युक्लिअर रिऍक्टर वगैरे आहेत. या सर्वांचे ड्रोनपासून रक्षण करणे महागडे ठरते. आपण एस-400 नावाची अत्याधुनिक हवाई संरक्षण व्यवस्था रशियाकडून विकत घेत आहोत. परंतु ती केवळ एखाद्या शहराचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहे. ती देशाच्या सर्व जमिनी सीमा किंवा सागरी सीमा यांचे रक्षण कधीही करू शकत नाही. अमेरिकेने तयार केलेल्या क्षेपणास्त्रविरोधी पॅट्रिऑट क्षेपणास्त्राची किंमत 2.4 अब्ज डॉलर आहे. एवढय़ा महागडय़ा सिस्टिम असूनही छोटय़ा ड्रोनच्या मदतीने केलेले हल्ले त्यांना थांबवता आले नाहीत. महागडी विमाने, प्रचंड महागडय़ा एअर क्राफ्ट कॅरिअर्स किंवा मोठी जहाजे यांचे स्वस्त ड्रोनपासून रक्षण करणे सोपे नाही.
स्मॉल आर्म्स, लाइट मशीनगनचा वापर करून हवाई सीमेचे रक्षण, हिंदुस्थानी पायदळाच्या बटालियन लढाईमध्ये शत्रूंच्या विमानाविरोधात त्यांच्याजवळ असलेली स्मॉल आर्म्स, लाईट मशीनगन यांचा वापर करून हवाई सीमेचे रक्षण करतात. अशाच प्रकारची संकल्पना सीमा संरक्षणासाठी आपल्याला वापरावी लागेल. सीमेवरती असलेल्या सीमा सुरक्षा दल, नौदल,तटरक्षक दल आणि शहरात पोलीस किंवा सैन्याने अशा प्रकारची वाहने हवेतून येताना दिसली तर त्यांच्यावर फायर करून त्यांना तिथेच पाडण्याची योजना राबवू शकतील.
स्मॉल आर्म्स, लाइट मशीनगन शस्त्रांचा वापर करून जर ड्रोन्सनी महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला केला तर त्यांना पाडावे लागेल. मात्र, येत्या काळात ड्रोनच्या विरुद्ध रक्षण करण्यासाठी कमी किंमतीची एअर डिफेन्स सिस्टम तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यासाठी लक्ष केंद्रित केले पाहिजे.
संशयास्पद ड्रोन्सना लगाम घालण्यासाठी स्काय फेन्स, ड्रोन गन, ड्रोन कॅचर, स्कायवॉल 100 यांसारखे तंत्रज्ञान जगात आहे. कुठलाही पर्यायच काही महत्त्वाच्या ठिकाणीच वापरला जाऊ शकतो; कारण ही सगळी महागडी शस्त्रs आहेत. हिंदुस्थानलाच काय, पण इतर विकसित देशांना सुद्धा परवडण्यासारखी नाहीत. म्हणूनच येणाऱया काळात ड्रोनविरोधात आपल्याला स्वस्त शस्त्र आणि तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. तोपर्यंत आपल्याकडे असलेली संरक्षण व्यवस्थाच वापरावी लागेल.
स्वस्त असल्यामुळे व चीनकडून मिळत असल्यामुळे ड्रोन्स दहशतवाद्यांनी वापरली. चीनकडे याच्या अनेक पटीने जास्त क्षमता असलेले ड्रोन्स आहेत जे ते पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना पुरवत आहेत. ते हिंदुस्थानविरुद्ध 365 दिवस अविरत हायब्रिड युद्ध लढत आहेत. त्यांनासुद्धा प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. स्वार्म ड्रोन्स म्हणजे 60-70 एकत्र ड्रोन्सच्या मदतीने आपण चीनवर प्रतिहल्ला करू शकतो का? याशिवाय आपल्याला पाकिस्तानला इशारा द्यावा लागेल की, अशा प्रकारचे ड्रोन हिंदुस्थानात पाठवण्याचा प्रकार केला तर आम्हीही ड्रोन पाठवून तुमचे नुकसान करू शकतो. स्वसंरक्षण करणे अत्यंत खर्चिक आहे. त्यापेक्षा अशा कडू औषधाची चव पाकिस्तानला देऊन स्वसंरक्षण करण्यास भाग पाडले पाहिजे. याशिवाय आपल्या देशात तयार होणारे ड्रोन्स आणि त्यांचे महत्त्वाच्या आस्थापनांजवळ उड्डाण करणे यावरही नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कमी खर्चात दहशतवादी हल्ले हिंदुस्थानवर करून पाकिस्तान आपल्या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न करत आहेत. म्हणून ड्रोनविरुद्धची लढाई आता आपल्याला पाकिस्तानच्या आत न्यावी लागेल. आक्रमक कारवाया, कमी खर्चिक उपाययोजना यासोबतच अतिशय कल्पकतेने ड्रोन दहशतवादाविरोधात हिंदुस्थानला वापरावे लागेल. ड्रोनहल्ला हा पाकिस्तान सरकारपुरस्कृत दहशतवादी हल्ला आहे. हिंदुस्थानी हवाई दल केव्हा कठोर प्रत्युत्तर देते ते भविष्यात दिसेलच.





























































