
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन n [email protected]
कॅनडात होणाऱया हिंदुस्थानविरोधी खलिस्तानी कारवायांवर लक्ष ठेवून त्याला विरोध व्हायला हवा. दुसऱया देशामध्ये हिंदुस्थानविरोधी कारवाया करणाऱयांविरोधात कारवाई अनेक स्तरांवर करावी लागेल. इस्रायलचे गुप्तहेर खाते देशाच्या शत्रूंना इतर देशांत जाऊन पकडते, तसे आपण करू शकतो का? मुत्सद्देगिरीच्या जोरावर अशा देशांना हिंदुस्थानविरोधी कारवायांवर लक्ष ठेवून त्या त्या देशातील कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल.
गेल्या वर्षी 2020 नोव्हेंबर महिन्यात स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी ‘सीख फॉर जस्टिस’ व अन्य अतिरेकी संघटनांनी ‘सार्वमत-2020’ नावाने मोहीम उघडली होती. या मोहिमेनुसार मतदान घेऊन वेगळ्या खलिस्तानची मागणी करण्याचा, पंजाबी-शीख समुदायाचे समर्थन मिळवण्याचा व हिंदुस्थान सरकारवर दबाव आणण्याचा संबंधितांचा मनसुबा होता. मात्र कॅनडाच्या सरकारने ‘सार्वमत-2020’ किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही मोहिमेला आम्ही पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच कॅनडाने आम्ही हिंदुस्थानच्या एकता, अखंडता व सार्वभौमत्वाचा सन्मान करतो, असे प्रतिपादनही केले. कॅनडाला आपले दुसरे घर केलेल्या खलिस्तानवाद्यांना यामुळे दणका मिळाला. मात्र काही दिवसांत पुन्हा कॅनडात खलिस्तान उग्रवाद्यांच्या कारवाया सुरू झाल्या.
खलिस्तानच्या मागणीला मागील साडेतीन दशकांचा इतिहास आहे. पाकिस्तानसह ‘आयएसआय’देखील खलिस्तानच्या मागणीला पाठिंबा देत रसद पुरवठा करते. नंतरच्या काळात इंदिरा गांधींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने खलिस्तान आंदोलन मोडून काढले, पण यादरम्यान 20 हजार जणांचा बळी गेला. पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्याही त्यातूनच झाली, मात्र त्यांच्या हत्येनंतर शीखविरोधी दंगलीत मृतांची संख्या 8 हजारांहून जास्त होती. शीखविरोधी दंगली व त्यानंतरच्या सरकारी कारभारातून आपल्यावर अन्याय झाल्याचे शीख समुदायाला वाटते आणि याचाच फायदा घेऊन फुटीरतावादी मूठभर लोक शीख समुदायाच्या जखमांवरील खपल्या काढत राहतात. अशा प्रकारच्या कृत्यातून शीख समुदायाला डिवचले, चिथावले, भडकावले जाते आणि स्वतंत्र खलिस्तानची मागणी होत राहते.
अर्थातच, अशा लोकांना देशात स्थान नसल्याने या प्रकारची मागणी कॅनडा, अमेरिका, युनायटेड किंगडमसह अन्य देशात गेलेल्या काही अतिरेकी शिखांकडून केली जाते. परदेशात अशा संघटना सक्रिय असून तिथे ते खलिस्तानच्या मागणीसाठी कार्यक्रम-उपक्रम राबवत कारवाया करतात. या अतिरेकी संघटनांनी आपल्या प्रचार-प्रसारार्थ ‘येस टू खलिस्तान. ओआरजी’, ‘दिल्ली बनेगा खलिस्तान.सीए’ यांसारख्या वेबसाइटही तयार केल्या आहेत. आपल्याला 1984 सालच्या दंगलीचा बदला घ्यायचा असून दिल्लीवर खलिस्तानचा झेंडा फडकवायचा असल्याचे यावेळी सांगण्यात येते, मात्र सर्वसामान्य शीख समुदायाचा या मागणीला अजिबात पाठिंबा नाही . ज्यावेळेस खलिस्तान दहशतवाद चळवळ हिंदुस्थानात सुरू झाली त्यावेळी एक प्रमुख नेते व समर्थक कट्टवादी जगजीतसिंह हे कॅनडात राहत होते व अनिवासी हिंदुस्थानी होते. कॅनडामध्ये एका हिंदुस्थानी मंत्र्याचा खून करण्यात आला आणि आपले एक विमानही पाडले होते.
जसे आपण हिंदुस्थानात राहून कॅनडा, अमेरिका अथवा युनायटेड किंगडमच्या सार्वभौमत्वाविषयी सार्वमत घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे कोणीही हिंदुस्थानबाहेर राहून हिंदुस्थानबाबत असा प्रकार करू शकत नाही.
कॅनडाची लोकसंख्या 3 कोटी 71 लाख आहे. या लोकसंख्येत 12 लाख 60 हजार हिंदुस्थानी स्थलांतरितांनी कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. नुकतीच एक ताजी आकडेवारी समोर आली असून ‘एक्सप्रेस एंट्री स्कीम’नुसार कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारण्यामध्ये हिंदुस्थानी स्थलांतरित आघाडीवर असल्याचे दिसून येते. त्यामुळे आगामी काळात हिंदुस्थानींची संख्या जास्त वेगाने वाढणार आहे. मात्र यामुळे खालिस्तानी उग्रवाद्यांची संख्या तर वाढणार नाही?
खलिस्तानवाद्यांना पाकिस्तानातील अनेक संस्थांकडून आर्थिक मदत मिळत आहे. अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर जगातील सर्वच राष्ट्रांनी दहशतवादाच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला. त्यानंतर या खलिस्तानवाद्यांनी आपला पवित्रा बदलून स्वतंत्र राज्याची उघड मागणी करण्याचे बाजूला ठेवले. त्याऐवजी ते शिखांवर होणारा अन्याय आणि अल्पसंख्याकांचे अधिकार याबद्दल बोलू लागले. त्यात पंजाबातील बेरोजगारी आणि ड्रगमाफियांचा उदय या समस्यांनी गेली 15 वर्षे थैमान घातले आहे. याचा फायदा घेऊन पाकिस्तान-पंजाबमध्ये दहशतवाद पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे. खलिद आवान हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडियन नागरिक ‘खलिस्तान कमांडो फोर्स’ला शस्त्र्पुरवठा केल्याचा आरोप सिद्ध होऊन अमेरिकेतील तुरुंगात 14 वर्षांची सजा भोगत आहे. तरीही तेथील सरकारे खलिस्तानवादी नियोजित सभेला अटकाव करण्याच्या हिंदुस्थानच्या विनंतीचा विचार करत नाहीत. परदेशात खलिस्तानी कारवाया कशा रोखायच्या, हे एक आव्हान आहे.
शिखांवर हिंदुस्थानात अन्याय होत असल्याची बातमी पसरवली जाते. या सर्वच घटनांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कॅनडात होणाऱया हिंदुस्थानविरोधी खलिस्तानी कारवायांवर लक्ष ठेवून त्याला विरोध व्हायला हवा. दुसऱया देशामध्ये हिंदुस्थानविरोधी कारवाया करणाऱयांविरोधात कारवाई अनेक स्तरांवर करावी लागेल. इस्रायलचे गुप्तहेर खाते देशाच्या शत्रूंना इतर देशांत जाऊन पकडते, तसे आपण करू शकतो का? मुत्सद्देगिरीच्या जोरावर अशा देशांना हिंदुस्थानविरोधी कारवायांवर लक्ष ठेवून त्या त्या देशातील कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल. आमच्यावर अन्याय होतो म्हणून जो दुःप्रचार केला जातो त्याविरोधात त्या देशातील स्थानिक माध्यमांतून लिहून हा विरोध मोडून काढण्याची गरज आहे. खलिस्तान समर्थकांना आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. हिंदुस्थानविरोधी कारवाया या परदेशी भूमीवर होत असताना त्यावर लक्ष ठेवून त्यावर हल्ला व प्रतिहल्ला करणे गरजेचे आहे. हिंदुस्थान सरकार परदेशातील हिंदुस्थानविरोधी कारवाया थांबवण्याचा प्रयत्न करेल का?




























































